सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या माजी आमदाराला घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. सात अजामीनपात्र वॉरंट आणि पळून जाण्याच्या प्रयत्नानंतर या आमदाराला सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने रविवारी नवी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हरियाणा येथील काँग्रेसचे माजी आमदार धरमसिंग छोकर यांना १,५०० कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग घोटाळ्याप्रकरणी अटक केली.

रविवारी संध्याकाळी धरमसिंग छोकर याला अटक करण्यासाठी ईडीचे गुडगाव झोनचे सहसंचालक नवनीत अग्रवाल दिल्लीतील हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा आमदाराने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पकडण्यात ईडीला यश आले. त्यांच्या अटकेचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. १,५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे नेमके प्रकरण काय? कोण आहे अटक करण्यात आलेला माजी आमदार? जाणून घेऊ…

कशी झाली अटक?

ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “अटक होणार असल्याचे कळताच छोकर आणि त्याचा अंगरक्षक असे दोघेही बाहेरच्या दिशेने पळू लागले. बराच वेळ अग्रवाल यांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना ताब्यात घेतले. अटक करताना छोकर याने अधिकारी आणि हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा व इजा पोहोचवण्याचादेखील प्रयत्न केला. परंतु, अग्रवाल यांनी त्यांना अटक केली आणि ताब्यात घेतले. त्यांना ईडी कार्यालयात नेले जात असताना त्यांनी कारमधून बाहेर पडण्याचेदेखील अनेक प्रयत्न केले; परंतु त्यांचे सर्व प्रयत्न विफल ठरले.”

प्रकरण काय?

धरमसिंग छोकर हा हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांचा जवळचे सहकारी आहे. हा खटला गुडगावमधील छोकर याच्या रिअल इस्टेट कंपन्यांनी फ्लॅट, घरे व भूखंडांच्या वाटपात केलेल्या कथित घोटाळ्याशी संबंधित आहे. माजी आमदार छोकर आणि त्याच्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून ६१६ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली; परंतु त्याचे वाटप केले नसल्याचा आरोप आहे. मार्चमध्ये ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) एक तात्पुरता आदेश जारी केला आणि या प्रकरणांतर्गत दिल्ली, फरिदाबाद व पानिपत येथील सुमारे तीन एकर शेतजमीन, २,४८७ चौरस मीटर व्यावसायिक भूखंड आणि आठ निवासी फ्लॅट जप्त केले.

त्याच आदेशाचा एक भाग म्हणून ९६ लाख रुपयांच्या मुदत ठेवीदेखील जप्त करण्यात आल्या. मार्चमध्ये ईडीने धरमसिंग छोकर, त्यांचे पुत्र विकास b सिकंदर आणि त्यांची कंपनी ‘साई आयना फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्याशी संबंधित ४४.५५ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव केला. या प्रकरणात त्यांचा पुत्र विकास फरारी आहे आणि सिकंदर या प्रकरणात जामिनावर आहे. २०२४ मध्ये ईडीने त्याच चौकशीच्या संदर्भात कुटुंबाची ३६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

कोण आहेत धरमसिंग छोकर?

धरमसिंग छोकर दोन वेळा आमदार राहिला आहे. त्याने २००९ मध्ये गुज्जर बहुल समलखा येथून हरियाणा जनहित काँग्रेस (एचजेसी) च्या तिकिटावर पहिली विधानसभा निवडणूक जिंकली. २०१४ मध्ये हरियाणा जनहित काँग्रेसने भाजपाशी युती केली असता, त्यांनी समलखा येथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली; परंतु त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर समलखा येथून त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि ते निवडून आले. गेल्या वर्षी त्यांनी समलखा येथून पुन्हा निवडणूक लढवली.

त्यांच्या अलीकडील निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी शेती हा त्यांच्या उत्पन्नाचा प्राथमिक स्रोत असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांनी या प्रतिज्ञापत्रात फक्त एका फौजदारी खटल्याचा उल्लेख केला. त्यांनी त्यांची मालमत्ता ३.८६ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे दाखवले. त्यांचे दुसरे पुत्र सिकंदर गुडगावमध्ये रिअल इस्टेट व्यवसाय चालवतात. ते महिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. या कंपनीचे सात प्रकल्प कथित घोटाळ्यामुळे वादात अडकले आहेत. त्यापैकी सहा गृहनिर्माण प्रकल्प असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

२०२१ मध्ये ईडी आणि आयकर विभागांनी छोकर यांच्या समलखा, पानिपत, हिसार, गुडगाव व चंदिगड येथील मालमत्तांवर छापे टाकले. या छाप्यांमध्ये सिकंदर आणि त्याचा भाऊ विकास, तसेच इतर सहभागी १३ जणांवर गुडगावमध्ये फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आला होता. नोंदविण्यात आलेल्या एफआयआरनुसार, आरोपींनी प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (पीएमएवाय-यू) अंतर्गत गुडगावमधील १० एकर जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक केली होती. दुसऱ्या फसवणूक प्रकरणात, हरियाणा शहर आणि देश नियोजन विभागाने जुलै २०२३ मध्ये महिरा होम प्रायव्हेट लिमिटेडचा परवाना रद्द करण्याचे आणि प्रकल्पासाठी बनावट इमारत आराखडे सादर केल्याबद्दल रिअल इस्टेट एजंटविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले.

या आदेशानंतर कंपनी, कंपनीचे संचालक, संबंधित कंपन्या आणि कंपनीच्या अधिकृत स्वाक्षरीकर्त्यांविरुद्ध २०२२ मध्ये परवाना मिळविण्यासाठी बनावट योजना सादर केल्याबद्दल आणि २०२३ मध्ये अतिरिक्त परवान्यासाठी पुन्हा फेरफार केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला. जुलै २०२३ मध्ये छोकर याच्या मालकीच्या मालमत्तेवर छापे टाकताना ईडीला चार आलिशान वाहने, १४.५ लाख रुपयांचे दागिने व ४.५ लाख रुपयांची रोकड सापडली. ईडीने छोकरच्या समलखा येथील घरावर, पानिपतमधील कार्यालय व इंधन पंपावर आणि हिसार, गुडगाव व चंदिगडमधील मालमत्तांवर छापे टाकले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छापे टाकल्यानंतर ईडीने छोकर याच्याविरुद्ध पीएमएलए गुन्हा दाखल केला. मे २०२४ मध्ये गुडगाव न्यायालयाने या प्रकरणात छोकर यांना अटकपूर्व जामीन नाकारला. गेल्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ईडी आणि हरियाणा पोलिसांना छोकर याने २४ तासांच्या आत आत्मसमर्पण न केल्यास अटक करण्याचे आदेश दिले. अटक वॉरंट असूनही त्याने हरियाणामध्ये आपला प्रचार सुरू ठेवला.