संजीव कुळकर्णी
नांदेड : खासदार राहुल गांधी यांच्या यात्रेदरम्यान अनेक जण पुढे-पुढे करत असताना, काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या स्नुषा डॉ.मीनल यांना अधिक वाव मिळावा म्हणून राहुल यांच्यासह अन्य मान्यवरांपासून अलिप्त राहणे पसंत केले. खासदार गांधी यांच्या यात्रेचा मंगळवारच्या रात्रीचा मुक्काम शंकरनगर येथे खतगावकर परिवाराच्या शैक्षणिक संस्थेच्या परिसरातील कॅम्पमध्ये होता. तेथील निवास व भोजन व्यवस्थेचे संपूर्ण नियोजन डॉ.मीनल खतगावकर यांनी केले होते. भोजनाचा मंडप तर अत्यंत लक्षवेधी होता.
काँग्रेस सेवादलाचे ज्येष्ठ पदाधिकारी कृष्णकुमार पांडे यांच्या आकस्मिक निधनामुळे ‘भारत जोडो यात्रे’वर मंगळवारी शोककळा पसरली होती; पण बुधवारी सकाळी खा.राहुल गांधी आणि इतर यात्रींची पदयात्रा शंकरनगर येथून सुरू झाल्यावर नायगावपर्यंतच्या १० कि.मी. अंतराच्या पहिल्या टप्प्यात नेहमीचा उत्साह संचारला होता. ठिकठिकाणी राहुल यांचे स्वागत करण्यात आले. या टप्प्यात अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया तसेच चव्हाणांचे मेव्हणे, माजी खासदार भास्करराव खतगावकरांच्या स्नुषा डॉ.मीनल या दोघी हातात-हात घालून खा.गांधी यांच्यासोबत चालताना दिसल्या. त्यातून त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘हम साथ साथ है’चा संदेश दिला. या यात्रेच्या निमित्ताने श्रीजया चव्हाण यांच्या राजकीय पदार्पणावर शिक्कामोर्तब झाल्याचे खुद्द अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केले आहे.
हेही वाचा… कथा पाखराची, बातमी श्रीजयाची! भारत जोडो यात्रेत अशोक चव्हाण यांचा राजकीय वारस जाहीर
भारत जोडो यात्रेचे शंकरनगरला आगमन झाल्यानंतर खा.गांधी हे त्यांच्या मुख्य कॅम्पमध्ये दाखल झाले. तेथे त्यांची कोणाशीही भेट झाली नाही; पण बुधवारी सकाळी त्यांच्या पदयात्रेचा शंकरनगर ते नायगाव प्रवास सुरू झाल्यावर त्यांच्यासोबत चालण्याची-बोलण्याची संधी डॉ.मीनल यांना मिळाली. चव्हाण यांच्या कन्या श्रीजयाही त्यांच्यासोबतीला होत्या. विशेष म्हणजे श्रीजया यांनी बुधवारी साडी परिधान केली होती.
हेही वाचा… अकोला जिल्ह्यात शिवसेनेपुढे संघटनात्मक वाढीचे शिवधनुष्य; आदित्य ठाकरेंचा दौरा परिणामकारक ठरणार?
भारत जोडो यात्रेतील पाहुण्यांचा एक मुक्काम शंकरनगर परिसरात निश्चित झाल्यानंतर डॉ.मीनल यांनी आवश्यक त्या बाबींचे सूक्ष्म नियोजन करून भव्य तंबूंची उभारणी करून घेतली. आलेल्या सर्व पाहुण्यांना रूचकर जेवण मिळेल, अशी त्यांनी व्यवस्था केली होती. शंकरनगरच्या मुक्कामातील एकंदर व्यवस्थेची राहुल यांनी प्रशंसा केली. गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्टच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती राहुल यांना या भेटीत देण्यात आली.
हेही वाचा… राज ठाकरेंना आव्हान देणारे ब्रिजभूषण सिंह यांचा पुणे दौरा आणि मनसेची अडचण
शंकरनगर ते नायगाव या टप्प्यात पदयात्रा सुरू असताना, किनाळा, हिप्परगा माळ, नर्सी चौक येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले. नर्सी चौकात रवींद्र भिलवंडे यांचे स्वागत स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी अचानक तेथील नुरी फंक्शन हॉलला भेट दिली. तेथे त्यांनी थोडी न्याहरी केली. तेथून ही पदयात्रा खैरगावहून नायगाव शहरात दाखल झाली. हेडगेवार चौकात भारतयात्रींच्या स्वागतासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते; पण व्यासपीठावरील सर्व सोपस्कार टाळून राहुल गांधी विश्रांतीस्थळ असलेल्या कुसुम लॉन्सच्या दिशेने रवाना झाले.
हेही वाचा… अंबादास दानवे : संघटनेस आकार देणारा आक्रमक नेता
नायगाव विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असला, तरी या शहरावर काँग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे वर्चस्व असून पदयात्रा कुसुम लॉन्ससमोर आल्यानंतर तेथे सर्वांचे स्वागत करण्यात आले. सकाळच्या सत्रांमध्ये राहुल गांधीच्या पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माणिकराव ठाकरे, सतेज पाटील, जयराम रमेश या नेत्यांसह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे बुधवारी नांदेडहून नायगावला १० च्या सुमारास पोहचले.
हेही वाचा… एस.एम.जोशी सभागृहाची दुर्दशा काँग्रेसने फलक-रोषणाईने झाकली!
बुधवारी सकाळच्या सत्रातील पदयात्रेत खा.राहुल यांनी नेहमीप्रमाणे शाळकरी मुले, त्यांचे पालक यांच्याशी संवाद साधला. शहरी आणि ग्रामीण भागातील स्त्री-पुरूषांसह युवक-युवती व शालेय विद्यार्थी यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. ‘नफरत छोडो, भारत जोडो’ या घोषणेने १० कि.मी. चा परिसर बुधवारी दणाणून गेला होता.