यवतमाळ – Yavatmal Vidhan Sabha Election 2024 जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात २०० च्या वर उमेदवारांनी अर्ज दाखल केले. महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्य लढत होणाऱ्या १४ उमेदवारांमध्ये चारजण पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढत आहेत. इतर १० जणांनी यापूर्वी एक किंवा त्यापेक्षा अधिक वेळा निवडणूक लढविली आहे.

उमरखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे किसन वानखेडे आणि महाविकास आघाडीचे साहेबराव कांबळे हे दोन्ही उमदेवार राष्ट्रीय पक्षाकडून पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. या दोन्ही उमदेवारांसमोर पक्षांतर्गत बंडखोरीचे आव्हान आहे. पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे इंद्रनील नाईक यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे शरद मैंद या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच सक्रिय राजकारणात उतरले आहे. पतसंस्था आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला नवीन चेहरा म्हणून शरद पवार यांनी पुसदमध्ये केलेला प्रयोग महायुतीला भारी पडेल, असे चित्र निर्माण झाले आहे. आर्णी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत काँग्रेसकडून निवडणूक लढवित असलेले जितेंद्र मोघे हेसुद्धा पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवित आहे. यापूर्वी २०१४ आणि २०१९ मध्ये जितेंद्र यांनी वडील शिवाजीराव मोघे यांच्या निवडणुकीचे संपूर्ण नियोजन केले होते. त्यामुळे ते तेव्हा निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष नसले तरी निवडणूक कशी लढायची याचा पूर्वाभ्यास झालेला आहे. 

याशिवाय यवतमाळात भाजपचे मदन येरावार, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर, राळेगावमध्ये काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके, भाजपचे प्रा. अशोक उईके, दिग्रसमध्ये शिवसेना (शिंदे)चे संजय राठोड, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे इंद्रनील नाईक, आर्णीमध्ये भाजपचे राजू तोडसाम, वणीमध्ये शिवसेना उबाठाचे संजय देरकर, भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार हे उमेदवार यापूर्वीही विधानसभा निवडणूक लढले आहेत.

हेही वाचा >>> निवडणुकीच्या मैदानात तिरंगी-चौरंगी लढतीची रंगत; अकोला वाशीम जिल्ह्यातील आठही मतदारसंघात चुरस

या निवडणुकीत उमरखेड, पुसद, आर्णी मतदारसंघातील हे चार नवखे चेहरे मतदारांवर आपला प्रभाव कसा पाडतात, हे २३ नाव्हेंबरला स्पष्ट होईल. मात्र सध्या सर्वच उमदेवारांनी प्रचारावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. नवखे असले तरी राष्ट्रीय पक्षाचे उमदेवार असल्याने पक्षाचे संघटन, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते सोबत असल्याने पहिल्यांदाच विधानसभेचा गड पार करण्याचा प्रयत्न हे उमेदवार करत आहेत.

हेही वाचा >>> सर्वपक्षीय बंडखोरांचा सुळसुळाट; भाजपाला सर्वाधिक फटका, मविआ-महायुतीची रणनीती काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवाळीमुळे प्रचार थंडावला विधानसभा निवडणुका ऐन दिवाळीच्या काळात आल्याने उमेदवारही धास्तावले आहेत. दिवाळीचे चार दिवस कार्यकर्ते, जनता दिवाळीच्या कामात व्यस्त असल्याने प्रचाराला हवी तशी साथ मिळेनाशी झाली आहे. लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या तीन दिवसांतही प्रचाराला वेग येण्याची शक्यता नाही. शिवाय शहरी लोक दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी फिरायला जातात. ग्रामीण भागातील महिला माहेरी जातात. शाळा, महाविद्यालये ११ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे ११ ते १८ हे आठ दिवसच खऱ्या अर्थाने प्रचाराची रंगत वाढविणारे आहे. दिवाळीतील ही निवडणूक उमेदवारांना घाम फोडणारी ठरत आहे.