सांंगली : खानापूर:आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत विट्याचे माजी नगराध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी पलूसच्या सभेत दिले. यामुळे लोकसभेनंतर होणारी विधानसभेची निवडणूक महायुतीच्यादृष्टीने जोखमीची व कसोटीची ठरण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. सत्तेत असूनही मित्रपक्षांतील घटकांना आपले अस्तित्व राखण्यासाठी मोठा संघर्ष अनिवार्य दिसत असून यामध्ये लोकसभेवेळी गोळाबेरीज आणि रूसवे फुगवे काढताना भाजप नेत्यांचाही कस लागणार आहे.
खानापूर व आटपाडी या दोन तालुक्यांचा एक विधानसभा मतदारसंघ असून याचे नेतृत्व सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनिल बाबर यांच्याकडे आहे. दोन तालुके असल्याने तालुक्याची अस्मिताही महत्वाचा मुद्दा या निवडणुकीत ठरण्याची चिन्हे आहेत. कारण यापुर्वी १९९५ च्या निवडणुकीवेळी या मतदारसंघातून आटपाडीच्या राजेंद्रअण्णा देशमुख यांनी संघर्ष करून विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर आटपाडीच्या देशमुख गटाला सत्तेच्या राजकारणात फारसे यश मिळाले नाही, तथापि, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता होती, त्यावेळी अमरसिंह देशमुख यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर आटपाडीतील देशमुख गटाची राजकीय क्षेत्रात काहीशी पिछेहाट झाली असून सांगली जिल्हा बँक, बाजार समिती निवडणुकीनंतर झालेल्या माणगंगा साखर कारखाना निवडणुकीतही राजकीय खेळीत देशमुख गटाची पिछेहाट झाली. या पार्श्वभूमीवर सध्या आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती पुढचा आमदार आटपाडीचाच असेल असे सांगत राजेंद्रअण्णा देशमुख यांना पुढे केले आहे. तथापि, देशमुख वाड्यातही सध्या पूर्वीचा एकोपा राहिला आहे का हाही महत्वाचा प्रश्न आहेच. आटपाडीच्या अस्मितेचा मुद्दा पुढे येत असताना खानापूर तालुक्यातील विटा शहरातून आमदारकीसाठीचा संघर्ष पुन्हा जोर धरत आहे.
माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी सध्या मौन स्वीकारले असून पुत्र तथा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी अजितदादा गटात प्रवेश केल्यानंतर आपण मूळच्या गटाबरोबरच म्हणजेच शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे जाहीर केले. मात्र, सांगलीत झालेल्या थोरल्या साहेबांच्या दौऱ्यात ते उपस्थित नव्हते. मात्र, त्यांचे पुत्र अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार बाबर यांनी सांगलीच्या पवारांच्या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थिती दर्शवली. राजारामबापू पुतळा अनावरणाचा कार्यक्रम जरी महापालिकेचा म्हणजेच शासकीय असला तरी प्रामुख्याने उपस्थिती राष्ट्रवादीतील नेत्यांचीच होती. कोंग्रेस व राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. काँग्रेसचे स्थानिक नेते उपस्थित असले तरी त्यांची उपस्थिती नाममात्रच होती. अशा स्थितीत आमदार बाबर यांचे व्यासपीठावर आगमन होताच, काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी त्यांच्यासाठी खुर्चीची आवर्जुन व्यवस्था केली.
आता डॉ. कदम यांच्या मतदारसंघातच विट्याच्या पाटलांनी आमदारकीसाठी आपण मैदानात उतरणार असल्याचे स्पष्टच सांगितले. जर महायुतीमध्ये जागा वाटपात खानापूर-आटपाडीची जागा अजितदादा गटाला मिळाली नाही तर मैत्रीपूर्ण लढत देण्याची आपली तयारी आहे असे त्यांनी आवर्जुन सांगितले. यामुळे लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेसाठी महायुतीमध्ये घटक पक्षांची होत असलेली गर्दी पाहता पक्षश्रेष्ठींच्या अडचणी वाढणार आहेत. अजितदादांना सांगली जिल्ह्यात आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याचे वेध लागले आहेत. यासाठी आमदार जयंत पाटील यांच्याबरोबर असलेल्या शिलेदारांना खेचण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
हेही वाचा – ठाकरे – शिंदे गटातील लढतीत कोण बाजी मारणार ?
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ५ फेब्रुवारी रोजी सांगली दौरा निश्चित झाला आहे. या दौऱ्यामध्ये विटा आणि जत येथे शेतकरी मेळाव्याचे नियोजन केले जात आहे. म्हणजे राजकीय चर्चा आणि मोर्चेबांधणी या ठिकाणी अटळ आहे. वैभव पाटील यांनी अजितदादांचा दौरा विधानसभा निवडणूक समोर ठेवूनच आयोजित केला आहे. यामुळे महायुतीतील घटक पक्षात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. आमदार बाबर यांची आजही मतदारसंघातील ग्रामीण भागात चांगली ताकद आहे. तर शहरात त्यांना फारशी संंधी दिसत नाही. तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळातील गावातही खासदार संजयकाका पाटील यांची ताकद आहे. लोकसभेसाठी आमदार बाबर यांनी युती धर्माचे पालन केले तर विधानसभेवेळी हा धर्म खुंटीला टांगून ठेवला जाण्याचीच जास्त शक्यता सध्या दिसत आहे. मैत्रीपूर्ण लढत हा बोलण्यासाठी सकारात्मक शब्द असला तरी सर्वच गटाची अस्तित्वासाठीची लढाई असल्याने अटीतटीचा संघर्ष पाहण्यास मिळणार यात शंका नाही.