मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरकारचा मंत्रालयातील कारभार गुंडाळण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सर्व मंत्र्यांची दालने रिकामी करावीत आणि संबंधित मंत्र्याकडील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपल्या मूळ विभागात परत जावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यातील विद्यामान महायुती सरकारचा पाच वर्षांचा कालावधी २६ नोव्हेंबर रोजी संपला. त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे य़ांनी आपल्या पदाचा राजीमाना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सरकारचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सचिवालय, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांची दालने रिकामी करावीत. कार्यालयातील नस्ती संबंधित विभागाकडे जमा कराव्यात. अन्य कागदपत्रे नष्ट करावीत आणि दालने सामान्य प्रशासन विभागाच्या ताब्यात द्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>नागपुरात मंत्रिपद शहराला की ग्रामीणला?

नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तयारी सुरू

● राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे सरकार कोणाच्या नेतृत्वाखाली असेल, मंत्रिमंडळात कोणाला स्थान असेल हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी नव्या सरकारच्या शपथविधीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

● नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी वानखेडे स्टेडियम अथवा शिवाजी पार्क येथे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र वानखेडे स्टेडियम येथे क्रिकेट स्पर्धा सरू असून विवाह सोहळ्याच्या तारखाही ठरलेल्या आहेत.

● ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी शिवाजी पार्कवर तयारी सुरू आहे, तर आझाद मैदानावर मुस्लीम समाजाचा इज्तेमा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● या कार्यक्रमांसाठी ही मैदाने आरक्षित असल्यामुळे वांद्रे कुर्ला संकुलातही शपथविधी होऊ शकतो. मात्र प्रशासनाने सध्या शिवाजी पार्क आणि वानखेडे मैदानाची चाचपणी आणि तयारी सुरू केली आहे.