राजेश्वर ठाकरे

नागपूर : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात आलेला माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळा अनावरणास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नकार दिला असून यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त करीत राज्यपालांच्या हेतू आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पी.व्ही. नरसिंहराव हे भारताचे नववे पंतप्रधान होते. त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे १९८४ ते १९९१ या काळात प्रतिनिधित्व केले होते. ते संस्कृतचे अभ्यासक होते. महाराष्ट्राला संस्कृत शिकण्याची मोठी परंपरा आहे म्हणून स्वतंत्र विद्यापीठ असावे असा त्यांचा आग्रह होता. राव यांच्या पुढाकाराने आणि तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि संस्कृत पंडित डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या अथक परिश्रमाने रामटेक येथे विद्यापीठ स्थापन होऊ शकले. त्यामुळे विद्यापीठ परिसरात पी.व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळा उभारण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पुतळा अनावरणाची विनंती विद्यापीठाने केली होती. परंतु त्यांनी नकार दिल्याची माहिती आहे.

हेही वाचा: राज्यसभेला शाळा बनवू नका, सभागृह कसे चालवायचे तुम्ही मला सांगणार का?, सभापती धनखडांची सदस्यांना सज्जड समज

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी हा मुद्या सोमवारी विधानसभेत उपस्थित केला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यपालाच्या आदेश, निर्णयावर सभागृहात भाष्य करता येत नाही, असे नमूद करीत या मुद्यावर चर्चा नाकारली. मुद्दा कामकाजातून काढून टाकला. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेतले. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने अशाप्रकारे देशाच्या माजी पंतप्रधानांचा अपमान करणे शोभनीय नाही.

हेही वाचा: कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीत तरुण नेतृत्वाचा प्रभाव

पुतळा अनावरण पुढे ढकलले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामटेकच्या कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेला माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही. नरसिंह राव यांच्या पुतळा अनावरणाचा २० डिसेंबरला होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. तो आता जानेवारी २०२३ मध्ये होणार आहे. विद्यापीठाने यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक काढले आहे. ज्यांनी पुतळा उभारण्यासाठी मदत केली ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असल्याचे कारण विद्यापीठाने यासाठी दिले असले तरी .राज्यपालांनी पुतळ्याचे अनावरण करण्यास नकार दिल्याच्या मुद्यावरून वाद निर्माण झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे माहिती आहे.