गुजरात विधानसभा निवडणुकांच्या आधी काँग्रेसला एक मोठा झटका बसला आहे. गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिल्याचे ट्वीट करून जाहीर केले आहे. हार्दिक पटेल यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

खरेतर, राहुल गांधी यांच्या माध्यमातून हार्दिक पटेल यांची काँग्रेसमध्ये खास एंट्री झाली होती. काँग्रेस प्रवेशानंतर वर्षभरातच त्यांची नियुक्ती काँग्रेसच्या गुजरात कार्याध्यक्षपदी करण्यात आली. नुकताच पक्षात प्रवेश केलेल्या हार्दिक पटेल यांना इतके महत्त्वाचे पद दिल्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, कॉंग्रेसमध्ये सामील झाल्याच्या तीन वर्षांनंतरच “मला सर्व पर्याय खुले आहेत”, असे म्हणत हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला.

सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात हार्दिक यांनी काँग्रेसवर देश आणि समाजाच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पक्षाच्या प्रमुख नेतृत्वावर गुजरात आणि गुजरातींचा द्वेष केल्याचा देखील गंभीर आरोप केला आहे. एका वर्षापूर्वी ‘द इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पटेल यांनी अशाच तक्रारी केल्या होत्या. गुजरातमधील पाटीदार समाजाचा युवा नेता असणाऱ्या हार्दिक यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या दोन महिने आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०२० मध्ये हार्दिक यांना गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष करण्यात आले.

हार्दिक पटेल यांना राग का आला?

१) निर्णय प्रक्रियेत सहभाग नाही

हार्दिक पटेल यांनी असा दावा केला आहे की पक्षात ३ वर्षे काम करूनसुद्धा त्यांना कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले नाही. काँग्रेसने गुजरात विभागात काही नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. यापैकी एकाही नेमणुकीबाबत त्यांचे मत विचारात घेतले नाही. गेल्या वर्षी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तिकीट वाटपात त्यांच्या शिफारसी विचारात घेतल्या नसल्याचा उल्लेख केला होता.

२) पक्षाचे हायकमांड निर्णय घेत नाहीत

हार्दिक पटेल यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला त्यांनी बरीच पत्र लिहिली. पण हार्दिक यांच्या एकाही पत्राची दखल घेऊन कारवाई करण्यात आली नाही. याबाबत त्यांनी एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांची भेट घेतली होती. गुजरातमधील प्रमुख पाटीदार चेहरा असणारे नरेश पटेल यांच्याबाबतच्या निर्णयावर हार्दिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

3) स्थानिक नेतृत्वाने बाजूला केले

राहुल गांधी यांनी मागच्या दाराने हार्दिक पटेल यांना पक्षात आणले. त्यांना लगेचच कार्याध्यक्ष करण्यात आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत खासदार अहमद पटेल यांच्या व्यतिरिक्त स्टार प्रचारक दर्जा असणारे हार्दिक पटेल हे गुजरातमधील एकमेव नेते होते. प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरने प्रवास करण्याची मुभा त्यांना देण्यात आली होती. अचानक पक्षात प्रवेश, कार्याध्यक्ष पद, स्टार प्रचारक दर्जा या सर्व गोष्टींमुळे पक्षातील अनेक लोक अस्वस्थ झाले. त्यामुळेच स्थानिक नेतृत्वाने त्यांना बाजूला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

4) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये दुर्लक्ष

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी पक्षाने त्यांच्यासाठी वेगळ्या सभा किंवा रॅलीचे आयोजन केले नाही. त्यावेळी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की या निवडणुकीदरम्यान असलेले त्यांच्या दौऱ्यांचे स्वरूप हे पक्षाने नाही तर त्यांच्या वैयक्तिक पथकाने आखले होते. त्यांच्या प्रचाराचा खर्चदेखील पक्षाने उचलला नाही असे ते म्हणाले.

५) दाखल फौजदारी खटले लढताना पाठबळ नाही

 २०१५ च्या पाटीदार आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले फौजदारी खटले लढताना पक्षाने कुठलेही पाठबळ दिले नाही. खटले मागे घेण्याच्या आवाहनाला काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही. उलट भाजपा सरकारने दखल घेतली. हार्दिक पटेल यांच्यावर एकूण २८ गुन्हे दाखल आहेत. त्यात दोन फौजदारी गुन्ह्यांचा देखील समावेश आहे.