कोल्हापूर : राज्यातील जनता दलाचा टिकून राहिलेला एकमेव गड अशी ओळख असलेल्या गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत जनता दल, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांचे ऐक्य दिसत असताना आता महायुतीचा घटक असलेला जनसुराज्य शक्ती पक्षही जोडला जाण्याची चिन्हे आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील या नगरपालिकेत त्यांना एकाकी पाडण्याची हालचाली विरोधकांनी सुरू केल्या आहेत. यामुळे येथील नगरपालिकेतील निवडणुकीचे बदलते कंगोरे हे अधिकच संघर्षशील बनत चालले आहे.
गडहिंग्लज नगरपालिकेमध्ये पूर्वी विधान सभेचे अध्यक्ष बाबा कुपेकर, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष, दिवंगत आमदार श्रीपतराव शिंदे यांचा प्रभाव राहिला. पुढे या नगरपालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांनी लक्ष घातले. या शहरात लिंगायत समाजाची संख्या लक्षणीय प्रमाणात असल्याने त्याचा फायदा उठवण्याच्या हालचाली कोरे यांच्या होत्या. त्यातून विनय कोरे – श्रीपतराव शिंदे यांनी गडहिंग्लज नगरपालिका, गडहिंग्लज साखर कारखाना येथे दशकभराहून अधिक काळ सत्ता टिकवली. नंतर कोरे यांचे या शहराकडे तसे दुर्लक्ष झाले. श्रीपतराव शिंदे यांनी हसन मुश्रीफ यांच्याशी कधी जमवून घेतले तर कधी संघर्ष होत राहिला.
कोरेंच्या वेगवान हालचाली
शिंदे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या, माजी नगराध्यक्षा स्वाती कोर त्यांनी जनता दलाची मोर्चेबधणी करायची ठरवलेली. विधानसभा निवडणुकीच्या आधी जनता दलातील काही नगरसेवकांनी पक्षाला रामराम करून हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी जनता दल काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दिला होता. तो अमान्य करत स्वाती कोरी यांनी जनता दलाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा निर्णय कायम ठेवला. तेव्हा सतेज पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडून जनता दलाला आणि कोरी यांना पाठबळ देईल असे आश्र्वासित केले. काँग्रेस – जनता दल यांचे ऐक्य गडहिंग्लज मध्ये दिसत असताना आता विनय कोरे यांनी कोरी यांची भेट घेतल्याने जनता दल – जनसुराज्य शक्ती हे पक्ष एकत्र येण्याची चर्चा रंगत आहे. दोन महत्त्वपूर्ण लिंगायत नेते एकत्र येत असल्याचे चित्र यातून शहरात निर्माण झाले आहे. हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीच्या समर्थकांनी लगेचच कोरे यांची भेट घेतली आहे. कोरे यांच्यासारखा महत्त्वपूर्ण नेता राष्ट्रवादीला गमावणे येथे राजकीय दृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे कोरे हे महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीत लढणार की त्यापासून बाजूला राहून गडहिंग्लज मध्ये जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत राहणार निवडणूक लढवणार हे महत्त्वाचे ठरले आहे.
मुश्रिफांची बिकट वाट
या पातळीवर हसन मुश्रीफ यांच्यासमोरचे आव्हान वाढताना दिसत आहे. गडहिंग्लज मध्ये काँग्रेसचे सतेज पाटील, जनता जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे, जनता दलाच्या स्वाती कोरी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समरजित घाटगे अशा प्रमुख नेत्यांची मोट बांधली जात आहे. हे नवे राजकीय समीकरण गडहिंग्लज मध्ये आकाराला आले तर येथे हसन मुश्रीफ यांना चांगलेच झुंजावे लागेल हे निसंदेह. गोकुळ, जिल्हा बँक अशा सहकारात हसन मुश्रीफ – सतेज पाटील एकत्र असले तरी गडहिंग्लज नगरपालिकेत मात्र या दोघांमध्ये संघर्ष होऊ लागला आहे. जनता दलाला रामराम ठोकलेले माजी नगरसेवक घरवापसीच्या प्रयत्नात आहेत. गडहिंग्लज शहर हे कागल मतदार संघाशी जोडले गेले असल्याने येथील राजकारणावरील पकड गमावणे हसन मुश्रीफ यांना राजकीय दृष्ट्या अडचणीचे ठरू शकते. यातूनच गडहिंग्लज नगरपालिकेची निवडणूक अधिकच टोकदार होईल असे दिसत आहे. त्याला गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचे राजकारण, अर्थकारण, गाळप याही बाबी कारणीभूत ठरतील अशीही चर्चा आहे.