कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील तिहेरी उमेदवारीची गुंतागुंत अधिकच वाढत चालली आहे. शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आपली उमेदवारी नक्की असल्याचा दावा केला असला तरी भाजपने दावेदारी सोडलेली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रचाराला सुरुवात केली असली तरी सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाअभावी गाडे अडले आहे. याच वेळी ठाकरे सेनेकडून माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. तिरंगी लढतीत कोणाचा फायदा होणार याची गणिते सोयीने मांडली जात आहेत.

धैर्यशील माने यांच्या विरोधात मतदारांमध्ये नाराजी असल्याचा मुद्दा पुढे करून भाजपने उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी मागण्याचा सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना हक्क असला तरी ती आपणास मिळणार याबाबत माने हे निश्चित झाले असून मतदार संपर्कावर भर दिला आहे. त्यांच्या विरोधात राजू शेट्टी यांनी स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.

हेही वाचा – रायगडात महायुतीतील वाद चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

शेट्टींचे एकला चलो

शेट्टी यांनी दुसऱ्यांदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची मागणी केली. ठाकरे यांनी त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा घेऊन लढावे असे सुचवले आहेत. शेट्टी यांना मविआच्या उमेदवारी बंधनात अडकायचे नाही. त्यांनी बाहेरून पाठिंबा द्यावा असे शेट्टी यांनी सुचवले असले तरी त्यास मविआच्या नेत्यांची संमती नाही. दुसरीकडे केवळ स्वबळावरच मैदान मारणे हे शेट्टी यांच्यासाठीही वाटते तितके सोपे नाही.

हेही वाचा – भाजपने उमेदवारी नाकारताच माजी मंत्र्याच्या कन्येचा थयथयाट

इकडे, मविआचा पाठिंबा असेल तोच उमेदवार जिंकून येईल अशी समीकरणे आघाडी अंतर्गत मांडली जात आहेत. त्यातूनच शाहूवाडी पन्हाळ्याचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर व हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचे नावे पुढे येत आहेत. पैकी मिणचेकर यांना उमेदवारी देऊन सोशल इंजिनिअरिंगचे डावपेच लढवले जात आहेत. ते मागासवर्गीय असल्याने त्यांना या वर्गाचा तसेच वंचितांचे पाठबळ मिळू शकते. हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, पन्हाळा या विधानसभा मतदारसंघात मविआच्या तिन्ही पक्षांची ताकद चांगली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा येथून जयंत पाटील, मानसिंगराव नाईक या दोन्ही आमदारांची हुकमी ताकद उभी राहिल्याने फड मारणे शक्य आहे, असे यामागील गणित आहे.

हेही वाचा – सांगलीत प्रचारात रंग भरण्यापूर्वीच रुसवे-फुगवे सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे प्रश्न संघर्ष करून मार्गी लावल्याचा मुद्दा घेऊन मतदारांसमोर जात आहेत. यावर्षीचा हंगाम सुरू होत असताना ऊसाला प्रति टन अतिरिक्त १०० रुपये मिळवून देण्यासाठी त्यांनी आंदोलन केले पण अजूनही हे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. आंदोलनामुळे हंगाम महिनाभर पुढे गेल्याने ऊस अजूनही शिवारात असल्याने शेतकरी नाराज आहेत. हे मुद्दे प्रचारात मांडण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली असल्याने ते शेट्टी यांना अडचणीचे ठरू शकते. शिवाय, शेट्टी – शिवसेना या दोन्हींच्या उमेदवारीमुळे मत विभागणीचा फायदा माने यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. तुटेपर्यंत ताणण्याच्या वृत्तीमुळे ज्याच्यासाठी संघर्ष केला तेच शेट्टी – शिवसेनेच्या पदरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.