अकोला : राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षामध्ये फाटाफूट होऊन नवे गट तयार झाले. सत्तेत सहभागी या गटांमध्येच अंतर्गत गट-तटाचा वाद निर्माण होऊन स्थानिक नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याचे चित्र अकोला जिल्ह्यात आहे. प्रत्येक पक्षांतर्गतच विसंवाद असतांना महायुतीमध्ये समन्वय राखण्याचे मोठे आव्हान वरिष्ठांमध्ये राहणार आहे. विभाजीत गटांनाच एकत्रित ठेवण्याची मोठी कसरत महायुतीच्या नेत्यांना करावी लागणार आहे.

लोकसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले. राज्यात अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी भाजपसह महायुतीमध्ये तब्बल १५ पक्षांचा समावेश केला आहे. या सर्व पक्षांमध्ये समन्वय राहण्यासाठी १४ जानेवारीला सर्वच जिल्ह्यांमध्ये मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यामध्ये महायुतीतील घटक पक्षांचे स्थानिक नेते सुरात सूर मिळवतांना दिसले तरी प्रत्यक्षात नव्याने निर्माण झालेल्या गटांमध्येच अंतर्गत वाद कायम आहेत. राज्यात राष्ट्रवादीमध्ये ‘साहेब’ व ‘दादा’ असे दोन गट पडल्यावर जिल्ह्यातील पक्षामध्ये देखील त्याचा परिणाम दिसून आला. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अगोदरच गटातटाच्या राजकारणात बेजार होता. त्यातच वरिष्ठांनीच जाहिररित्या बंड केल्याने जिल्हा पातळीवरील नेत्यांनीही सोयीस्करपणे आपआपले गट निवडले. जिल्ह्यात सत्तेसोबत गेलेल्या अजित पवार गटामध्येच अंतर्गत अनेक गट निर्माण झाले आहेत. पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी व जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्यातील वाद व विसंवाद वारंवार चव्हाट्यावर येतो. अकोल्यातील शिवसेना शिंदे गटातील संदीप पाटील यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या स्वागत कार्यक्रमाला आमदार मिटकरींनी उपस्थिती लावली, तर जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी दांडी मारली. यानिमित्ताने पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली. या अगोदर शिवा मोहोड यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यावरून आमदार मिटकरींनी संताप व्यक्त करीत राजीनाम्याचा इशारा दिला होता. अजित पवार गटात वर्चस्वाच्या लढाईतून आमदार व जिल्हाध्यक्षांमध्ये शह काटशहाचे राजकारण रंगत असल्याची चर्चा आहे. अजित पवार गटातील इतरही नेत्यांनी आप-आपले स्वतंत्र गट तयार केले आहेत.

हेही वाचा : राहुल गांधी अन् सरमा यांच्यातील वादाला जुनी किनार? सरमा काँग्रेसमध्ये असताना नेमकं काय घडलं होतं?

जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये देखील चित्र काही फारसे वेगळे नाही. जिल्ह्यात शिंदे गटात सुद्धा नेत्यांचे तीन-चार गटतट असून त्यांच्यात कुरघोडी कायम असते. शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया व जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप पाटील यांच्यातून विस्तव जात नाही. पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांचे देखील सूर जुळत नाहीत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाप्रमाणेच शिंदे गट देखील गटातटात विभागलेला व विस्कळीत आहे. या दोन्ही गटाला जिल्ह्यात स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचे आव्हान असतांना या पक्षांचे नेते गटबाजी करण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येते.

महायुतीतील आणखी एक घटक पक्ष असलेल्या रिपाइं आठवले गटात देखील वाद नवा नाही. या गटात सुद्धा पदाधिकाऱ्यांचे आपआपले गट आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला. पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या, तर काहींनी पक्षाला सोडचिठ्ठी देखील दिली. वंचितच्या गडात रिपाइं आठवले गट मजबूत होण्याऐवजी वादात अडकला आहे. एकूणच घटक पक्षांमधील गटबाजी महायुतीसाठी डोकेदुखीची ठरणार असल्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : भाजप विरोधात शरद पवार गटाकडून तुल्यबळ लढतीची तयारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गटांमध्येच फोडाफोडी अन् पक्षांतर

महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट व अजित पवार गट एकत्र आहेत. जिल्ह्यात या गटांमध्ये फोडाफोडी आणि पक्षांतराचे राजकारण रंगले आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख संदीप पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. यामध्ये आमदार अमोल मिटकरींची महत्त्वपूर्ण भूमिका राहील. बाळापूर मतदारसंघाच्या राजकीय समीकरणातून हे पक्षांतर घडल्याचे बोलल्या जात आहे. महायुतीतील पक्षच एकमेकांना धक्के देत आहेत.