अमरावती : काँग्रेसचे प्रभावक्षेत्र असलेल्‍या अमरावती जिल्‍ह्यात वंचित बहुजन आघाडीने ‘लोकशाही गौरव महासभे’च्‍या माध्‍यमातून केलेल्‍या शक्तिप्रदर्शनामुळे आगामी काळातील राजकीय द्वंदाचे संकेत मिळाले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपपेक्षा काँग्रेसवर केलेला टीकेचा मारा, स्‍वबळावर लढण्‍याची दर्शविलेली तयारी, दलित मतदारांसोबतच मुस्लीम मतदारांना आकृष्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न यातून ‘वंचित’ने काँग्रेससमोरील अडचणी वाढवल्‍या आहेत.

येथील सायन्‍स कोर मैदानावर पार पडलेल्‍या जंगी जाहीर सभेतून प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांना थेट इशाराच दिला. ‘वंचित’ला ‘इंडिया’ किंवा महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्‍याविषयी अद्याप ठोस निर्णय होऊ न शकल्‍याने प्रकाश आंबेडकरांची अस्‍वस्‍थता जाहीर सभेत व्‍यक्‍त झाली. ‘वंचित बहुजन आघाडी कधीही सत्‍तेत नव्‍हती. त्‍यामुळे ईडी, सीबीआयची आम्‍हाला भीती नाही. वंचित बहुजन आघाडीशी युती केली, तरच राजकारणात टिकून राहाल, अन्‍यथा तुरूंगात जाण्‍याची वेळ येईल’, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांना दिला. त्‍यांचे दबावतंत्र कितपत यशस्वी होते, ‘वंचित’ला महाविकास आघाडीत स्‍थान मिळेल का, या प्रश्‍नांची उत्‍तरे येत्‍या काळात मिळतील, पण ‘वंचित’ने अमरावती जिल्‍ह्यातून निवडणुकीचे रणशिंग फुंकल्‍याचे चित्र दिसले.

हेही वाचा : उमेदवारीपेक्षा राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात यांच्या भूमिका महत्त्वाच्या, रामदास आठवलेही इच्छूक

गेल्‍या विधानसभा निवडणुकीत राज्यातील १० मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. याशिवाय राज्यातील जवळपास २१ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजयी आणि पराभूत उमेदवार यांच्या मतातील फरकाहून अधिक मते मिळाल्याचे दिसून आले. गेल्‍या लोकसभा निवडणुकीतही वंचित आघाडीमुळे राज्यातल्या सात ते आठ मतदारसंघांमध्‍ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला फटका बसल्‍याचे दिसून आले.

अमरावती जिल्‍ह्यात वंचित आघाडीने आठ विधानसभा मतदार संघांपैकी सहा जागांवर निवडणूक लढविली. चार ठिकाणी ‘वंचित’चे उमेदवार हे तिसऱ्या स्‍थानी होते. धामणगाव रेल्‍वे मतदार संघामध्‍ये काँग्रेसच्‍या उमेदवाराचा ९ हजार ५१९ मतांनी पराभव झाला होता, तर ‘वंचित’च्‍या तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला २३ हजार ७७९ मते प्राप्‍त झाली होती. ‘वंचित’चे हे उपद्रवमूल्‍य काँग्रेससाठी धोकादायक ठरले. त्‍यामुळे काँग्रेसचे नेते वंचित आघाडीला मनापासून स्‍वीकारण्‍यास तयार नाहीत.

हेही वाचा : नितीश कुमार, तेजस्वी यादव काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होणार, ‘सर्व काही आलबेल’चा संदेश देण्याचा प्रयत्न!

काँग्रेसची जिल्‍ह्यात रिपब्लिकन पक्षाच्‍या गवई गटासोबत परंपरागत युती राहिली. पण, अलीकडच्‍या काळात गवई गटाच्‍या राजकीय लढाईतील मर्यादा दिसून आल्‍या. गेल्‍या निवडणुकीत काँग्रेसने गवई गटाला सहकार्य केले नाही. दुसरीकडे, जिल्‍ह्यातील बसपची शक्‍ती क्षीण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्‍याचा वंचित आघाडीचा प्रयत्‍न आहे. जाहीर सभेत वंचित आघाडीच्‍या काही नेत्‍यांनी प्रकाश आंबेडकर यांच्‍या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षाच्‍या आठवले आणि कवाडे गटावर जोरदार टीका केली. पण, गवई गटाचा उल्‍लेख टाळला. जिल्‍ह्यातील दलित मतांच्‍या राजकारणात स्‍वत:चे स्‍थान अधिक भक्‍कम करण्‍याचा वंचित आघाडीचा प्रयत्‍न आहे.

हेही वाचा : काँग्रेसचे दोन नेते कोण, ज्यांनी अयोध्येतील राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला लावली हजेरी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमरावती लोकसभा मतदार संघात काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर अपक्ष नवनीत राणा या निवडून आल्‍या होत्‍या, पण त्‍यांनी केंद्रातील भाजप सरकारला लगेच पाठिंबा देऊन आपली दिशा स्‍पष्‍ट केली होती. त्‍यांच्‍या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, हे अद्याप ठरलेले नसताना, वंचित बहुजन आघाडीने शक्तिप्रदर्शन करून काँग्रेसची कोंडी केली आहे. अमरावतीहून वंचित आघाडीनेही निवडणूक लढण्‍याची तयारी केली आहे. येत्‍या काळात कोणता संघर्ष उभा ठाकतो, हे दिसून येणार आहे.