छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीपूर्वी दीड वर्षे झटून काम करणाऱ्या भाजपमध्ये सध्या सामसूम आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी औरंगाबाद लोकसभेची जागा शिंदे गटाला सुटेल असे सांगण्यात आले आणि भाजपचे कार्यकर्त्यांनी ‘दक्ष’ स्थिती सोडली. किमान उमेदवार कोण ते तरी कळू द्या, त्यानंतर काम करू असे ते सांगत आहेत. कधीच निवडणूक न लढलेल्या मतदारसंघात या वेळी दीड वर्ष पूर्वीपासून भाजप कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात आले होते. यामुळे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची चांगलीच निराशा झाली आहे.

औरंगाबाद मतदारसंघात उमेवारी मिळावी म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी खूप जोर लावला. शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. वित्त खात्याचे राज्यमंत्रीपद असल्याने विभागाशी संबंधित कार्यक्रम शहरात ठेवले होते. महायुतीत औरंगाबादची जागा मिळणारच या आशेवर ते होते. पण शिवसेनेच्या शिंदे गटाने ही जागा सोडण्यास ठाम नकार दिला. त्यातच भाजपने केलेल्या सर्वेक्षणातही औरंगाबादची पक्षाची जागा निवडून येण्याबाबत शाश्वती नसल्याचा अहवाल प्राप्त झाला होता.

हेही वाचा : काँग्रेसचे १६ हजार नेते-कार्यकर्ते भाजपात! काय चाललंय मध्य प्रदेशात?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. कराड यांनी अलिकडेच मुंबईत जाऊन भाजपला जागा सुटू शकते का, याची चाचपणी पुन्हा एकदा केली. मात्र, जागा शिंदे सेनेला सोडण्याचे नक्की झाल्याचे आता भाजपच्या नेत्यांनी सांगितले. शिंदे सेनेला मात्र अजूनही त्यांचा उमेदवार ठरवता आला नाही. त्यामुळे सत्ताधारी गटाकडे सक्षम उमेदवार नसल्याची चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली आहे. सक्षम उमेदवार हा निकष मानून जागेबाबतची बोलणी करावी, अशी भूमिका भाजपचे नेते घेत आहेत. वादग्रस्त ठरणाऱ्या ठाणे, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगरसह पाच जागांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मंगळवारी रात्रीही चर्चा झाल्याचे सूत्राने सांगितले.