scorecardresearch

जालना जिल्ह्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांत चलबिचल, पक्ष संघटनेतील मरगळ झटकणार कोण?

जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत चलबिचल आहे.

सातत्याने लोकसभा निवडणुकीत पराभव होत असल्याने या निवडणुकीच्या संदर्भात जालना जिल्हा काँग्रेसमध्ये गांभीर्य राहिले आहे की नाही, याबाबत काही कार्यकर्तेच अधून-मधून साशंकता व्यक्त करू लागले आहेत. जिल्ह्यातील जालना आणि परतूर वगळता अन्य तीन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची पूर्वतयारी नसणे, गेल्या अनेक निवडणुकांत जिल्हा परिषदेत दोनअंकी सदस्य संख्या नसणे, पक्षश्रेष्ठींकडून संघटनात्मक पातळीवर बळ मिळण्यात अडचणी या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत चलबिचल आहे. ती प्रत्यक्षात व्यक्त होत नाही इतकेच!

काय घडले काय बिघडले?

मागील सात निवडणुकांमध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा पराभव आणि भाजप उमेदवाराचा विजय झालेला आहे. जिल्हा परिषदेत दोन अंकी सदस्यही निवडून येऊ नयेत अशी या पक्षाची अवस्था आहे. मागील वेळेस जालना, परतूर आणि भोकरदन या नगरपरिषदांची अध्यक्षपदे काँग्रेसकडे होती. परंतु त्यामध्ये पक्षाप्रमाणेच स्थानिक नेतृत्वाची कामगिरी मोठी होती. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप पक्षांकडे ज्याप्रमाणे जिल्हापातळीवरील नेतृत्व आहे तसे काँग्रेसकडे दिसत नाही. निवडणुकीच्या राजकारणामुळे काँग्रेसमधील महत्त्वाची नेतेमंडळी विधानसभा मतदारसंघाच्या आणि नगरपरिषदेच्या पातळीवरच अधिक सक्रिय असल्याचे गेल्या अनेक वर्षांचे चित्र आहे.

 जालना लोकसभा मतदारसंघातील ६० टक्के भाग जालना जिल्ह्यात तर ४० टक्के भाग परभणी जिल्ह्यात येतो. १९९६ पासून आतापर्यंत झालेल्या जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकदाही काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही. १९९६ आणि त्यानंतर १९९८ मध्ये झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीत भाजपकडून उत्तमसिंह पवार निवडून आले होते. तर १९९९ पासून सलग पाच वेळेस रावसाहेब दानवे विजयी झालेले आहेत. यापैकी २००९ मध्ये भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार लढत झाली होती. परंतु तरीही भाजपचा जवळपास साडेआठ हजारांनी विजय झाला होता. सलग सात वेळा पराभव झाला तरी या मतदारसंघाची नव्याने पुनर्बांधणी करण्याचे प्रयत्न काँग्रेसमध्ये जाणवत नाही. दानवेंच्या विरोधात काँग्रेसने वेगवेगळे चार उमेदवार देऊन पाहिले, परंतु त्याचा उपयोग मात्र होऊ शकलेला नाही. लोकसभेच्या संदर्भात एकीकडे काँग्रेसचे असे चित्र आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील पाचपैकी तीन विधानसभा मतदारसंघांत पाय रोवून उभे राहू शकणारा नेता काँग्रेसकडे नाही. काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल सध्या जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आतापर्यंत तीन वेळेस जालना विधानसभेची निवडणूक जिंकणाऱ्या गोरंट्याल यांना अलीकडेच लोकनियुक्त प्रतिनिधींची मुदत संपलेली जालना नगरपरिषद काँग्रेसच्या ताब्यात आणण्यात यश आले होते. मावळत्या लोकनियुक्त जालना नगरपरिषदेत नगराध्यक्षांसह ६१ पैकी २८ नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते. माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्यामुळे परतूर तर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यामुळे भोकरदन नगरपरिषद काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आली होती. या तीनही नगरपरिषदांची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात येण्यामागे स्थानिक नेतृत्वचाची कामगिरी होती. मावळत्या जिल्हा परिषदेत तर ५६ पैकी पाचच सदस्य काँग्रेसचे निवडून आले होते. गेल्या अनेक जिल्हा परिषद निवडणुकांत काँग्रेसला विजयी उमेदवारांचा दोन अंकी आकडाही गाठता आलेला नाही.

सध्या जिल्ह्यात गोरंट्याल हे जालना विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले जिल्ह्यातील पाचपैकी एकमेव काँग्रेसचे सदस्य आहेत. आपला मतदारसंघ आणि स्थानिक नगरपरिषदेच्या राजकारणावर लक्ष ठेवून त्यांचा प्रामुख्याने राजकीय प्रवास सुरू असतो. जिल्ह्यात राजेश राठोड हे आणखी एक आमदार असून ते विधान परिषदेवर सदस्य आहेत. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असल्याने पक्षीय कार्यक्रमांशी गोरंट्याल यांचा संबंध बरा येतो, त्या तुलनेत आमदार राठोड यांचा संपर्क कमीच असल्याची तक्रार पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतून होत असते.एकदा विधान परिषद सदस्य आणि दोनदा विधानसभा सदस्य राहिलेले सुरेशकुमार जेथलिया यांचा गेल्या निवडणुकीत भाजपकडून पराभव झाला. नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपशी सामना करून काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आणण्यात त्यांना मागील वेळेस यश मिळाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यासाठी परतूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसमधीलच काही मंडळींकडे संशयाने पाहिले गेले. बदलते राजकीय संदर्भ आणि एकूणच ढवळून निघालेल्या सामाजिक वातावरणात विधानसभेची निवडणूक लढविताना जेथलियांच्या मर्यादा अप्रत्यक्षरीत्या अधोरेखित झाल्याचेच राजकीय वर्तुळात मानले जाते. जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावर काही काळ असताना त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न केलेही, परंतु त्यालाही मर्यादा पडलेल्या होत्या. सध्या भोकरदनचे राजाभाऊ देशमुख जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे कोणतेही महत्त्वाचे वैधानिक पद नाही. पक्षातील कार्यकर्ते सांभाळायचे किंवा नवीन महत्त्वाच्या मंडळींना पक्षात प्रवेश द्यायचा म्हटले तरी त्यासाठी पक्षश्रेष्ठींचे बळ असण्याची गरज असते. परंतु तसे चित्र काही दिसत नाही.

संभाव्य राजकीय परिणाम?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असून बदला नाही तर वाचणार नाही, हा चिंतन शिबिरातील संदेश जालना जिल्ह्याला तंतोतंत लागू पडतो. पण पक्षाचा संदेश स्वीकारून कोण काम करेल का, प्रश्न आहे. पण हे बदल करेपर्यंत स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांमध्ये पराभवच पदरी पडण्याची शक्यता दाट आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In jalna district who will increase confidence of paert workers pkd