लातूर : काँग्रेसच्या वाढीमध्ये आयुष्य वेचणाऱ्या शिवराज पाटील चाकुरकर आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची छायाचि़त्रे प्रचाराच्या फलकांवरुन गायब झाली आहे. अलीकडेच शिवराज पाटील यांच्या स्नुषा अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच चाकुरकरांचे कट्टर समर्थक बसवराज पाटील यांनीही भाजपची वाट धरली होती. असे असले तरी शिवराज पाटील यांनी मात्र आपण काँग्रेस सोडली नसल्याचा खुलासा केला आहे. असे असतानाही त्यांची छायाचित्रे प्रचार फलकांवरुन गायब झाली आहेत.

शिवराज पाटील यांचे पूुत्र शैलेश पाटील चाकूरकर यांनीही आपण काँग्रेस पक्षातच असल्याचे स्पष्ट केले आहे. एवढे होऊनही महाविकास आघाडीच्या वतीने प्रचाराचे बॅनर, पोस्टर यावरती यावर्षी पहिल्यांदाच शिवराज पाटील चाकूरकरांचे छायाचित्र वापरण्यात आलेले नाही. माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे छायाचित्रही या प्रचारात वापरण्यात आलेले नाही. केवळ विलासराव देशमुख यांचेच छायाचित्र काँग्रेसच्या फलकांवर दिसून येत आहे.

हेही वाचा : “राहुल गांधींचं हेलिकॉप्टर तपासता, मग मोदींचं का नाही?” काय आहेत नियम…

लातूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव पाटील निलंगेकर व शिवराज पाटील चाकूरकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे सुपुत्र अशोक पाटील निलंगेकर हे अतिशय हिरहिरिने काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात आहेत त्यांच्या वडिलांचे छायाचित्र का वापरण्यात आले नाही हे त्यांनाही माहिती नाही. चाकूरकर एवढे वर्ष निष्ठेने काँग्रेस पक्षात कार्यरत असताना केवळ त्यांची स्नुषा भाजपावासी झाली म्हणून त्यांचे छायाचित्र न वापरणे याबद्दलही काँग्रेसच्या निष्ठावानात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : Prestige fight: आसाममधल्या या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष

छायाचित्र न वापरणे हे अतिशय चुकीचे

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या बॅनर ,पोस्टरवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे छायाचित्र वापरण्यात आलेले नाही ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. निलंगेकर साहेबांचे योगदान अतिशय मोठे आहे. ही चूक अजाणतेपणे झाली की जाणीवपूर्वक करण्यात आली याचे शहानिशा करावी लागेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली आहे.

-अशोक पाटील निलंगेकर