मुंबई : महायुतीच्या जागावाटपात भाजपने वरचष्मा राखत शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जागा आपल्याकडे खेचल्या आहेत व काही जागांवर खेचाखेची सुरु आहे. तर पवार गटाला शिंदे गटाच्याच जागा देण्यात आल्या असून शिंदेंच्या आतापर्यंत सहाच खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप एकामागोमाग एक जागा काबीज करीत असून शिंदे गटाला मात्र केवळ १२-१३ जागांवर समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत.

भाजपने सातारा मंगळवारी छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली. या जागेवरुन भाजप आणि पवार गटामध्ये वाद होता. जागावाटपाच्या चर्चेच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसने सात तर शिवसेना नेत्यांनी १८ जागा मिळाव्यात, अशा मागण्या केल्या होत्या. पण सर्वेक्षण अहवाल आणि जिंकून येण्याची क्षमता असलेला उमेदवार यासह अन्य राजकीय मुद्द्यांचा आधार घेत भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची एक-एक जागा आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले. राषअट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या जागांपैकी बारामतीमधून रा सुनेत्रा पवार, रायगडमधून सुनील तटकरे, शिरुरमधून शिवाजीराव आढळराव-पाटील तर धाराशिवमधून अर्चना पाटील निवडणूक लढवीत आहेत. अर्चना पाटील या भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी असल्याने त्या भाजपनेच पाठविलेल्या उमेदवार आहेत.

हेही वाचा : Prestige fight: आसाममधल्या या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष

शिवसेना शिंदे गटातील खासदारांपैकी बुलढाणामधून प्रतापराव जाधव, मावळमधून श्रीरंग बारणे, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, हातकणंगलेतून धैर्यशील माने यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. शिवसेनेच्या विद्यमान खासदारांपैकी रामटेकमधून कृपाल तुमाने, यवतमाळमधून भावना गवळी आणि हिंगोलीतून हेमंत पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली. मात्र हेमंत पाटील यांची पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमधून शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली. रामटेकमधून काँग्रेसचे माजी आमदार राजू पारवे यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली. परभणीच्या जागेवरही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा होता. मात्र ती जागा भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना देण्यात आली.

हेही वाचा : “स्वत: आंबेडकर आले, तरी घटना बदलू शकत नाही”; या निवडणुकीत राज्यघटनेच्या मुद्यावरून एवढा वादंग का होतोय?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेची असून आमचा दावा कायम आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू व इच्छुक उमेदवार किरण सामंत अजूनही सांगत असले, तरी भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक लढविण्याची सूचना केली असून त्यांनी प्रचारासही सुरुवात केली आहे.