सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या ४० आमदारांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेत बोचऱ्या विशेषणांसह टर उडवत आक्रमक पवित्रा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे.

हेही वाचा… धुळ्यातील नागरी सुविधांच्या दुरावस्थेविरोधात वकिलवर्गही मैदानात; सत्ताधारी भाजपची कोंडी

आदित्य ठाकरे स्वत: आरोप करत नाहीत. पण त्या सभेतून मंत्र्यांचे वर्तन,कार्यकर्त्यांमध्ये असणाऱ्या त्यांच्या काळेबेऱ्यांची कुजबूज जाहीर व्हावी, अशी संवाद रचना केली जात आहे. रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी देशी दारूच्या दुकानाचे परवाने कसे मिळविले याची चर्चा घडवून आणण्यात आली. तर भूम मतदारसंघात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना शिवसैनिकांनी ‘खेकडे’ म्हणत शेलक्या शब्दांत वार केले. शेलक्या विशेषणातून शिवसैनिक चेकाळतात, खूश होतात, त्यातून शिवसेनेची बांधणी होते, हे नेत्यांना माहिती असल्याने तो विशेषणांचा डाव नव्याने मांडून पाहिला जात आहे. ‘खोके सरकार’, ‘राक्षसी महत्त्वाकांक्षी असणारा एकजण आणि ४० चोर’ या विशेषणांबरोबर ‘देता की जाता’ असा शब्दप्रयोग असताेच.

हेही वाचा… ‘भारत जोडो’चा प्रतिसाद पाहून यात्रेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांची सहभागासाठी आयत्यावेळी धावपळ

शेलक्या विशेषणांबराबरच टर उडवण्याची पद्धतही बदलली आहे. संदीपान भुमरे यांनी त्यांच्या घरातील व्यक्तीच्या नावे देशी दारूचा परवाना मिळविल्याची चर्चा शिवसेनेकडून आवर्जून केली जात आहे. या अनुषंगाने जाहीर आरोप मात्र कोणी केले नाहीत. काही शिवसेना नेत्यांकडे या परवान्याची कागदपत्रेही उपलब्ध आहेत. पण कुजबूज स्वरुपातील ही चर्चा नुकतीच भुमरे यांच्या मतदारसंघात आवर्जून करण्यात आली. आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आता कोणाला कोणते परवाने मिळतात हे तुम्हाला माहिती आहे.’ शिवसैनिक म्हणाले ‘ देशी, देशी’ त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले. एका मंत्र्याचे परवाने आणि दुसरा मंत्री म्हणतोय, ‘दारू पिता का ?’ या संवादामुळे दोन मंत्र्यांची टर तर उडवली पण आरोपही केला नाही. अशा संवाद शैलीतून शिवसेनची बांधणी सुरू आहे. आदित्य ठाकरे यांचा मराठवाड्याचा हा दुसरा दौरा सुरू आहे. ‘ बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षातील ४० आमदारांच्या मतदारसंघात ते आवर्जून जात आहेत. जेथे जातात तेथील नेत्यांची सहज टोपी उडवतात. पण टीकेच्या केंद्रस्थानी मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा… राहुल गांधी यांनी लहानग्यांना करून दिली संगणकाची ओळख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेतून काही विशेषणे आता गायब झाली आहेत. त्यात मराठवाड्याच्या सभेतून ‘ हिरवा साप’ हा उच्चारला जात नाही. मुस्लिम समुदायासाठी हा शब्द वापरला जात असे. बाभळी बंधारे पाणी महाराष्ट्राला देणार नाही म्हणून आंदोलन करणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांना बाळासाहेब ठाकरे ‘ चमकेश बाबू’ म्हणाले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणेसाठी ‘ कोंबडी चोर’ हे विशेषण ठाकरे यांनी १५ वर्षांपूर्वी वापरले होते. आदित्य ठाकरे यांच्या मराठवाड्यातील दौऱ्यात पुन्हा शेलक्या विशेषणांची रेलचेल दिसू लागली आहे.