नागपूर: पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी ही, भाजपची मनोमन इच्छा. पक्षाच्या आमदारांकडून ती जाहीरपणे व्यक्तही झाली. पण राज्यात महायुतीचे सरकार असल्याने स्वत:हून स्वबळाचा नारा देणे म्हणजे महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे पातक आपल्या अंगावर घेण्यासारखे असल्याने भाजपने या मुद्यावर भूमिका स्पष्ट केली नव्हती. पण आता मित्र पक्ष राष्ट्रवादीनेच आम्ही स्वबळावर लढू असे जाहीर करून भाजपचे काम हलके केले. राष्ट्रवादीची ही भूमिका भाजपच्या पत्थ्यावर पडणारी ठरली.

महापालिका निवडणुकी सप्टेबर महिन्यात होणार अशा प्रकारचे संकेत यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिले होते. तेव्हापासून सर्व पक्षात निवडणूक हालचाली सुरू झाल्या. राज्यात मुंबई-पुणे-नाशिकनंतर सर्वाधिक महत्वाची महापालिका म्हणजे नागपूर. येथे मागील पंधरा वर्षापासून भाजपची सत्ता आहे. ती पुढे कायम ठेवण्याचा या पक्षाचा मानस आहे. मुख्मंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

राज्यात महायुतीची सत्ता आहे. पण नागपुरात यातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही पक्षाची राजकीय ताकद येथे जवळजवळ शुन्य आहे. अशा परिस्थितीत भाजप या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढणार की स्वबळावर रिंगणात उतरणार हे पाहणे महत्वाचे होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांचा कल स्वब‌ळावर लढण्याचा आहे. महायुती करून निवडणूक लढली तर या दोन पक्षांसाठी जागा सोडाव्या लागतील. त्यासाठी स्थानिक नेत्यांची तयारी नाही. कारण दोन्ही पक्षाचे मागच्या निवडणुकीतील संख्याबळ प्रत्येकी एक होते.एक जागा दिली तर हे पक्ष स्वीकारणार नाही त्यामुळे भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी व गरज पडली तर निवडणुकीनंतर मित्र पक्षांना सोबत घ्यावे, असे नेत्यांना वाटते.

दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली.राष्ट्रवादीने तर थेट ४० जागांची मागणीही केली . शिंदे गटाने जागांबाबत अद्याप आकडा जाहीर केला नाही, पण त्यांना भाजपसोबत निवडणूक लढण्याची इच्छा आहे. एकूणच मित्र पक्षांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे तर दुसरीकडे भाजपला मित्र पक्षाची साथ नको आहे. राज्यात महायुती असल्याने मित्र पक्षाला जाहीरपणे झिडकारताही येत नाही, अशी भाजपची कोंडी आहे. या पार्श्वभूमीवर या पक्षाने थांबा आणि वाट पहा अशी भूमिका घेतली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे मागच्या निवडणुकीत ज्यांच्या जितक्याजागा होत्या तेवढ्या जागा दिल्या जातील, असे भाजपने सांगणे सुरू केले. २०१७ च्या निवडणुकीत भाजपकडे १५१ पैकी १०८ जागा होत्या. तेवड्याच जागा भाजप लढवेल, असे भाजपने स्पष्ट केले. याचा भाजपला अपेक्षित असा परिणाम दिसून आले. भाजपकडून प्रतिसाद मिळत नसल्याने राष्ट्रवादीने महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार अशी घोषणा केली. ही घोषणा भाजपसाठी ‘सुठे वाचून खोकला गेला’ अशी ठरली आहे.