नाशिक: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळवून देण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) हे पक्ष पुढे सरसावले आहेत. अर्ज भरून देणे, कागदपत्रांची जुळवणी, दाखले मिळवून देणे आदी कामांसाठी खास कक्ष स्थापन करुन संबंधितांनी आगामी विधानसभा, महानगरपालिका निवडणुकांसाठी पद्धतशीरपणे मतपेरणी सुरू केल्याचे चित्र आहे.

महायुती सरकारने योजना जाहीर केल्यानंतर अल्पावधीत भाजपचे आमदार, माजी नगरसेवक, शिंदे गटाचे माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात संगणक, भ्रमणध्वनी व तत्सम साधनांची व्यवस्था केली. या योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रांच्या यादीचे फलक, माहितीपत्रके संबंधितांच्या छायाचित्रांसह सर्वत्र झळकत आहेत. उपरोक्त ठिकाणी अर्ज भरण्यासाठी महिलांची दररोज गर्दी उसळत आहे.

हेही वाचा : काँग्रेसचे आमदार फोडून सत्तेवर आलेल्या भाजपामध्ये धुसफूस; पुडुचेरीमध्ये काय घडतंय?

अर्ज भरण्यासाठीचे पोर्टल अद्याप नीटसे कार्यान्वित नसल्याने महिलांचे कागदोपत्री अर्ज भरून घेतले जात असल्याचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी सांगितले. नारीशक्ती दूत ॲपमधून ‘स्कॅनिंग’ला अडचणी येत आहेत. या संदर्भात आपण जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली. भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव आणि शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून महिलांना अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.

लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शहर आणि ग्रामीण भागात मोठा फटका बसला होता. अनेक विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मागे राहिले. हे चित्र बदलण्यासाठी सत्ताधाऱी पक्षांनी लाडकी बहीण योजनेतून राजकीय लाभ उठविण्याची जय्यत तयारी केली आहे. त्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा : काँग्रेसने मणिपूरमध्ये १० वेळा राष्ट्रपती राजवट लागू केल्याचे मोदींचे वक्तव्य; काय आहे इतिहास?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून योजनेसाठी अर्ज वाटप केले म्हणजे पक्षाच्या तिजोरीतून निधी देत आहेत, असा अर्थ होत नाही. माता-भगिनी संपूर्ण कुटुंब चालवतात. निवडणुकीपुरती ही योजना असेल तर, त्या चोख प्रत्युत्तर देतील.

विलास शिंदे ( महानगरप्रमुख, शिवसेना ठाकरे गट)