पालघर : खासदार राजेंद्र गावित यांना लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने त्यांच्याकडे असणाऱ्या वैयक्तिक मतांचा महायुतीच्या उमेदवाराला होणाऱ्या मतदानावर परिणाम होईल असे गृहीत धरून त्यांना तातडीने भाजपामध्ये पुनर्प्रवेश देण्यात आला. मात्र असे करताना स्थानीय नेत्यांना विश्वासात न घेतल्याने जिल्ह्यातील शिवसेना तसेच भाजपाच्या वर्तुळात नाराजीचे वातावरण पसरले आहे.

पालघर लोकसभेची जागा भाजपाकडे गेल्यानंतर विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी नाकारून डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर प्रसार माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्यामध्ये भाजपच्या या निर्णयामुळे आपण व्यथित असल्याचे राजेंद्र गावित यांनी जाहीर वक्तव्य केले होते. राजेंद्र गावित यांच्या वैयक्तिक प्रभावाखाली असणाऱ्या मतांचा फटका महायुती उमेदवाराला बसू नये म्हणून त्यांना भाजपामध्ये पुनर्प्रवेश देण्यात आला.

हेही वाचा : ५,७०५ कोटींची संपत्ती, ब्रँडेड गाड्या अन् बरंच काही! कोण आहेत लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार?

शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश करताना राजेंद्र गावित यांनी त्यापूर्वी दोन दिवस प्रचारात खांद्याला खांदा लावून एकत्र फिरणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, वसंत चव्हाण व इतर पदाधिकारी यांना पक्षांतराबाबत किंचितशी माहिती दिली नव्हती. डहाणू व पालघर येथील प्रचार सभेमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार गावित यांनी अंधारात ठेऊन विश्वासघात केल्याचे आरोप केली व प्रचार सभेत जाहीर नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी राजेंद्र गावित यांना आमच्या पक्षाने पाच वर्षे सांभाळले असे सांगून पुढील पाच वर्ष सांभाळण्याची जबाबदारी भाजपाने घ्यावी असे डहाणू येथील सभेत जाहीर व्यक्तव्य केले. ही मंडळी महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार करत असली तरीही मनातील खदखद जाहीर पणे व्यक्त होत असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्मण होऊ लागला आहे.

भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला विरोध करणारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत तसेच तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता तसेच माहिती न देता वरिष्ठ पातळीवरून पुनर्प्रवेश देण्यात आला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पर्यंत जाहीर विरोध करणाऱ्या मंडळींना त्यांच्या शेजारी बसून प्रचारात सहभागी व्हावे लागत आहे. स्थानिक नेतृत्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच गटागटांमधील समतोल ठेवण्यासाठी पक्षप्रवेश दिल्याचे सांगण्यात येत असून या निर्णयाविरुद्ध कोणतीही प्रक्रिया देण्यास स्थानिक भाजप नेते सध्या तरी तयार नाहीत. खासदार गावित यांच्या प्रवेशाचा विद्यमान महायुतीच्या उमेदवाराला फटका बसेल अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू असून याबाबत निवडणूक झाल्यानंतर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : यंदा काँग्रेस लढवतेय सर्वात कमी जागा; ‘इतक्या’ जागा दिल्या मित्र पक्षांना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयातही महायुती चे पदाधिकारी एकत्र झटत असताना महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांचे व लोकप्रतिनिधींचे पक्षांतर करून घेणे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे यांनी व्यक्त केली आहे. राजेंद्र गावित यांनी शिवसेनेचे पदाधिकारी व त्यांच्या निकटवर्ती यांचा विश्वासात न घेता पक्षांतर केल्याचे आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री यांच्याकडे मत मांडणार असून महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : बसपा अध्यक्ष मायावती यांचा पुतण्या आकाश आनंद नेमका कोण?

विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या पोटात गोळा

भाजपा पुनर्प्रवेश करताना राजेंद्र गावित यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून पुढे आल्याने भाजपा त्यांना पालघर अथवा विक्रमगड येथून उमेदवारी देईल अशी शक्यता आहे. पालघर विधानसभेची जागा शिवसेनेकडे असून भाजप या जागेसाठी पुन्हा जोर लावेल का अशी शक्यता पाहता या क्षेत्रातून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या पोटात गोळा आला आहे. तर विक्रमगड विधानसभा क्षेत्रात भाजपा मधून यापूर्वीच दोन- तीन उमेदवार इच्छुक असून विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी सुरू केली आहे. अशा वेळी गावित यांचे विक्रमगड मध्ये पुनर्वसन केले जाईल या शक्यतेपोटी भाजपामधील इच्छुक उमेदवारांमध्ये देखील चिंतेचे वातावरण पसरले आहे.