पिंपरी : विधानसभेचे २१ मतदारसंघ असलेल्या पुणे जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या भाजपला महायुतीमुळे विस्तारण्यास मर्यादा आल्या आहेत. कार्यकर्त्यांनी आग्रह करूनही मावळ लोकसभा मतदारसंघात कमळ चिन्ह देता आले नाही. केवळ पुणे शहरात कमळ चिन्हावर लढणारा भाजपचा उमेदवार असून शिरूर, बारामतीत मित्र पक्षाच्या घड्याळाला तर मावळमध्ये धनुष्यबाणाला भाजप कार्यकर्त्यांना मतदान करावे लागणार आहे. जिल्ह्यातील चारपैकी केवळ एका मतदारसंघात भाजपचा उमेदवार आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख राहिली. २०१४ नंतर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भाजपची ताकद वाढली. पण, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजही राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसते. २०१७ मध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता मिळविण्यात भाजपला यश आले. पण, जिल्हा परिषदेतील सत्तेपासून दूरच रहावे लागले. जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जालिंदर कामठे यांना भाजपात घेऊन जिल्ह्यात विस्तारण्यास सुरुवात केली. त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्न सुरू होते. राज्यातील सत्तेमुळे जिल्ह्याच्या राजकारणातील विस्तार भाजपला खुणावत होता. परंतु, केंद्रात भाजपचे पुन्हा सरकार आणण्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून देण्याकरिता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सरकारमध्ये सोबत घेतले. त्यामुळे भाजपच्या ग्रामीण भागातील विस्ताराला खीळ बसल्याचे लोकसभेच्या उमेदवारीवरून स्पष्ट दिसते.

हेही वाचा : रायगडामध्ये तटकरेंच्या कोंडीसाठी ‘बारामती पॅटर्न’

गेल्या वेळी बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या कांचन कुल लढल्या होत्या. आता महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे मतदारसंघ राहणार असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तिथे कमळ चिन्ह नसेल. तर, शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा सुरुवातीला रंगली पण, ही चर्चाच राहिली आणि डॉ. कोल्हे हे शरद पवार यांच्यासोबतच राहिले. शिरूरची जागा राष्ट्रवादीला गेल्याने शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तिथे अनेक वर्षे युतीमुळे आणि आता महायुतीमुळे कमळ चिन्ह नाही.

हेही वाचा : सांगलीतील वादात जयंत पाटील यांचे मौन संशयास्पद

पुणे आणि रायगड जिल्ह्याचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी कमळासाठी तीव्र आग्रह धरला होता. उमेदवारी कोणालाही द्या, पण कमळ चिन्ह असावे, अशी भूमिका घेतली होती. सुरुवातीला कमळावर लढणार, अशी चर्चा असलेले मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा धनुष्यबाणावरच लढणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मावळात पुन्हा कमळ चिन्ह नसून कार्यकर्त्यांची निराशा झाली. पुणे शहरात मात्र भाजपचे मुरलीधर मोहोळ उमेदवार असून, कार्यकर्त्यांना कमळावर मत करण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा : शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने लातूरमधील राजकीय गणिते बदलली

भाजप कार्यकर्त्यांना घड्याळाला मतदान करावे लागणार

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भाजप असा आजवर संघर्ष राहिला आहे. आता अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत आहे. शिरूर, बारामतीत त्यांचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे वर्षांनुवर्षे राष्ट्रवादीच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पहिल्यांदाच घड्याळाला मतदान करावे लागणार आहे.