सांंगली : गेली दोन वर्षे भाजप विरोधातील जनमत जागते ठेवत मतदारापर्यंत पोहचलेली आणि कधी नव्हे ती एकसंघता दर्शवणारी काँग्रेस यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रणांगणावर जिंकण्याची चिन्हे दिसत असताना महाविकास आघाडीच्या तहात मात्र हरली. याचे परिणाम जिल्ह्याच्या राजकीय क्षितीजावर दीर्घकाळ परिणामकारक ठरण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात सांगली व नंदूरबार हे दोनच लोकसभेचे मतदार संघ काँग्रेसचे पारंपारिक मतदार संघ म्हणून ओळखले जातात. मात्र, मागील दोन निवडणुकामध्ये झालेली काँग्रेसची पीछेहाट काँग्रेसच्या पतनाला कारणीभूत ठरलेली आहे. आता याचे परिणाम तोंंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देशपातळीवर काँग्रेसची अधोगती सुरू असताना तडजोडीच्या राजकारणात जर हक्काच्या आणि पारंपारिक जागा आंदण देण्याचा प्रघात जर पडला तर पक्ष निष्ठा काय कशासाठी असा सवाल सामान्य कार्यकर्त्यांने उपस्थित केला असेल तर तो वावगा का म्हणायचा? कालपरवा पर्यंत काँग्रेसचे नेते सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळणार असे सांगत होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसापासून मविआमधील शिवसेनेने उमेदवार जाहीर करून प्रचारही सुरू केला आहे. मविआच्या संयुक्त उमेदवार यादीची प्रतिक्षा न करता ठाकरे शिवसेनेने कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा सेनेलाच आहे असा ठाम आत्मविश्‍वास व्यक्त केला होता. खासदार संजय राउत यांनी सांगलीत येउन पक्ष बांधणीपेक्षा काँग्रेसच्या हेतूबद्दलच संशय व्यक्त करून माजी राज्यमंत्री आमदार विश्‍वजित कदम यांच्या भाजप प्रवेशाची शंका उपस्थित करून कालचा गोंधळ कमी होता की काय म्हणून नव्याने वात लावली. एवढेच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नौटंकी बंद करून ठाकरे शिवसेनेचा प्रचार सुरू करावा असा आग्रहही धरला. सामान्य शेतकर्‍याच्या पोराला केवळ शिवसेनाच उमेदवारी देऊ शकते असे सांगत प्रस्थापित राजकारण्यांची मयतेदारी कथन करत भाजप विरोधापेक्षा उमेदवारीसाठी चालू असलेला अंतर्विरोधच प्रकर्षाने कथन केला.

हेही वाचा : पीडीपीनंही काश्मीरमधून तीन उमेदवार उतरवले निवडणुकीच्या रिंगणात; नॅशनल कॉन्फरन्सशी थेट होणार टक्कर

खासदार राऊत यांनी केलेली टीका काँग्रेसला जबर जखमा करून गेली आहे. आता मविआची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बूथवर बसायला, मतदार घराबाहेर काढण्यासाठी लागणारी कार्यकर्त्यांची फौज मुंबईतून आणून चालणार आहे का याचीही विचार मविआच्या नेते मंडळीनी अथवा ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी केला नाही. काही झाले तरी काँगे्रेस आघाडी धर्म पाळेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण वरिष्ठ पातळीवर सहमती दर्शवणारे नेते प्रत्यक्ष मैदानात सैन्य पुरविणार नाहीत. हीच भूमिका जर सामोपचाराची असती तर गोष्ट वेगळी. इथं तर मैदानही तुमचं, सैन्य तुमच आणि विजयाचा मान मात्र आमचा ही भूमिका फारशी लाभदायी ठरण्याची चिन्हे दिसत नाहीत. उमेदवार तर उपराच आहे. मूळचा शिवसैनिक असता तर एकवेळ खपून गेले असते. केवळ आठ दिवसापुर्वी भाजप, वंचित बहुजन आघाडीची दारे ठोठावून आलेल्यांना खांद्यावर घेण्यास सांगणार असतील तर ऐकण्याची मनस्थिती काँग्रेस कार्यकर्त्यांची कशी असेल?

हेही वाचा : काशी-मथुरा, समान नागरी कायदा आणि मतदार संघांची पुनर्रचना; नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास काय निर्णय घेऊ शकतात?

मविआचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याबाबत फारसा आकस कोणाचा नाही. मात्र, ज्या पध्दतीने उमेदवारी मिळाली, त्या पध्दतीलाचा कार्यकर्त्यांचा विरोध आहे. गेल्या १६ निवडणुका काँग्रेसने जिंकल्या तरीही या ठिकाणी काँग्रेसला न विचारता उमेदवारी जाहीर करून आघाडी धर्म पालनाचे डोस पाजला जात असेल तर कोण ऐकून घेणार आहे?

हेही वाचा : मुस्लीम गुलाम व्हावेत ही धर्मनिरपेक्ष पक्षांची इच्छा – ओवैसी

काँग्रेसमध्येही गटतट आहेत. मात्र, यावेळी कधी नव्हे ती काँग्रेस एकसंघ झाल्याचे ेचित्र पाहण्यास मिळाले होते. उमेदवार म्हणून विशाल पाटील यांच्या एकमेव नावाची शिफारस जिल्हा व प्रदेश पातळीवरून करण्यात आली होती. अखेरच्या तहात मात्र हक्काची जागा गमावावी लागल्याची वेदना सच्च्या कार्यकर्त्याच्या मनात राहिली आहे. यामुळे महाविकास आघाडीने अंतिम उमेदवार जाहीर केला असला तरी सांगलीतला संघर्ष मिटला असे म्हणता येणार नाही. कदाचित अपक्ष म्हणून विशाल पाटील यांना आखाड्यात उतरविण्यासाठी जनरेटा तयार होउ शकतो. याचाही विचार मविआच्या नेते मंडळींना करावा लागणार आहे.