सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशाच होण्याचे राज्यस्तरावर संकेत मिळत असताना सांगलीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांच्यातील दरी रूंदावत असल्याचे दिसत आहे. आमदार पाटील यांनी खासदार अपक्ष असल्याने त्यांचे फारसे मनावर घेण्याची गरज नसल्याचे सांगत काँग्रेस नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे कथन केले. यावरून नजीकच्या काळात खासदार विशाल पाटील यांची समजूत काढण्याची आणि त्यांना निवडणुकीमध्ये आघाडीच्या प्रचारात सक्रिय करण्याची जबाबदारी आमदार डॉ. कदम कशी पार पाडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्ह्यात विटा, ईश्वरपूर, तासगाव, पलूस, जत आणि आष्टा या नगरपालिकांच्या आणि शिराळा व आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ईश्वरपूर व आष्टा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील जिल्हा पातळीवरील कोँग्रेस नेत्यांचा आग्रह मान्य करतील असे नाही. ईश्वरपूरमध्ये त्यांनी काँग्रेसच्या कोणत्याच स्थानिक नेत्यांशी चर्चा न करता नगराध्यक्ष पदासाठी आनंदराव मलगुंडे यांचे नाव जाहीर केले. तर आष्ट्यात स्व. विलासराव शिंदे यांच्या गटाबरोबर आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विशाल शिंदे यांचे नाव जाहीर केले.
ईश्वरपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असतानाच पक्ष कार्यालयाच्या इमारतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे वाळवा तालुक्यात कांँग्रेसच्या मताला आमदार पाटील फारसे महत्व देत नसल्याचेच अधोरेखित होते. तीच गत शिवसेना ठाकरे गटाची आहे. यामुळे काँग्रेसचे नेते आमदार डॉ. कदम यांना वाळवा तालुक्यात हस्तक्षेप करण्याची संधीच मिळणार नाही. खासदारांचा तर प्रश्नच उरत नाही.
आता अन्य नगरपालिका क्षेत्रात म्हणजे विटा, तासगाव, जत व पलूस या चार नगरपालिका खासदार पाटील यांच्या मतदार संघात आहेत. या ठिकाणी राजकीय स्थिती स्थानिक पातळीवर वेगळी आहे. खासदार पाटील यांना या ठिकाणी चांगले मतदानही झाले असले तरी ते अपक्ष म्हणून मैदानात होते. हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभेला लोकासमोर गेलेले नाहीत. यामुळे त्यांच्या मताला फारसे महत्व द्यावे असे वाटत नसल्याचे जयंत पाटलांचे म्हणणे असावे. विट्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर विरूध्द भाजपचे वैभव पाटील यांच्यात नगरपालिकेसाठीचा संघर्ष अटळ आहे. तर आटपाडी नगरपंचायतीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप असा संघर्ष पाहण्यास मिळणार असला तरी आमदार बाबर यांच्या पेक्षा जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. भाजपमध्येही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख आणि आमदार पडळकर यांच्यात फारसे सख्य नाही. यामुळे या ठिकाणी तिरंगी होते की दुरंगी याकडे लक्ष राहणार आहे.
जत, पलूस या ठिकाणी काँग्रेसला आपले अस्तित्व दाखवावे लागणार आहे. कारण पलूस पालिका डॉ. कदम यांच्या मतदार संघात आहे. तर जत हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांच्या मतदार संघात आहे. यामुळे जयंत पाटील यांचा कितपत हस्तक्षेप काँग्रेस मान्य करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या ठिकाणी खासदार पाटील यांचाही गट कार्यरत आहे. जयंत पाटील यांच्यासोबत हातमिळवणी करण्यास खासदार पाटील फारसे इच्छुक नाहीत. मात्र, याबाबत अंतिम निर्णय डॉ. कदमच घेतील असे सांगत असले तरी त्यांच्या मनात वेगळेच काही तरी असावे अशी शंकास्पद स्थिती आजच्या घडीला आहे. कारण त्यांचा जयंत पाटलांच्यावर विश्वास नाही. त्यांनी काही दिवसापुर्वीच आमदार पाटील यांच्याकडून कधीही आमचा कार्यक्रम होउ शकतो असे भाकित वर्तवले होते.
तासगावमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असून त्यांच्यासोबत जतचे माजी आमदार विलासराव जगताप, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख हे राहतील अशी मोर्चेबांधणी सध्या दिसत आहे.
