सांंगली : वारं फिरलया, आमचं ठरलया म्हणत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा वसंतदादा घराण्याचे वारसदार विशाल पाटील यांनी सलग दोन दिवस तीन उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीत बंड होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मंगळवारी सांगलीत दादा घराण्याकडून झालेले जोरदार शक्तीप्रदर्शन आणि जिल्ह्यातून विशाल पाटलांना मिळत असलेला पाठिंबा पाहता यामागे काँग्रेसला डावलण्यापेक्षा वसंतदादांच्या वारसदारांनाच राजकीय क्षितीजावरून हद्दपार करण्याचा डाव असल्याचा वास येतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केलेला खुलासा आणि मेळाव्यात विशाल पाटील यांनी केलेली वक्तव्ये पाहता जिल्हा नेतृत्व स्पर्धेत आमदार पाटील आणि डॉ. विश्‍वजित कदम यांच्यात स्पर्धा तर नाही ना अशी शंका निर्माण होत आहे.

विशाल पाटील लोकसभेसाठी गेल्या तीन वर्षापासून प्रयत्न करत आहेत. करोनाचे संकट असो वा सांगलीला वेढणारा महापूर असो अशा संकट काळात टीम विशाल नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरली होती. गेल्या एक वर्षापासून तर डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर पदयात्रा काढून जागृती करण्यात काँग्रेस आघाडीवर होती. गावपातळीपासून ते महापालिकेपर्यंत काँग्रेसचे अस्तित्व आहे. थेट सरपंच निवडणुकीत याचे प्रतिबिंब पाहण्यास मिळाले होते. ग्रामीण भागात आजही भाजप फारसा विस्तारला असे न म्हणता आयात नेतृत्वावर पोसवला. यामुळेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सत्तेपर्यंत पोहचला. मात्र, झेंडा, तोंडावळा भाजपचा असला तरी मूळ पिंड काँग्रेस-राष्ट्रवादीचाच आहे हे भाजपही मान्य करेल.

हेही वाचा : Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट

अशी स्थिती असताना सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा नैसर्गिक अग्रहक्क असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला दिली गेली. शिवसेनेनेही चंद्रहार पाटील यांना पक्षात घेउन उमेदवारीही जाहीर केली. यानंतरच खर्‍या अर्थाने विशाल पाटील यांना उमेदवारीपासून वंचित ठेवण्यामागे काही शक्ती कार्यरत असल्याची चर्चा जोरदारपणे सुरू झाली. यात समझोता करण्याऐवजी शिवसेना नेते संजय राउत यांच्या बोलण्यांने आगीत तेल ओतण्याचेच काम केले. जुळू पाहणारे स्नेहबंध पुन्हा विस्कटले. आणि त्या चिडीतून विशाल पाटील यांच्यावर उमेदवारी दाखल करण्यासाठी दबाव आला. आताही त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल करत असताना अपक्ष म्हणूनही उमेदवारी दाखल केली आहे. जर शिवसेनेने जागा सोडलीच नाही, आणि काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढतीला सहमती दर्शवली नाही तर मैदानात उतरायचेच या हेतूने अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे सांगलीत कोणत्याही स्थितीत विशाल पाटील मैदानात असणार हे स्पष्ट आहे. यामुळे शिवसेनेवरही दबाव वाढणार असून काँग्रेसला कितीही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तर पाटलांची उमेदवारी मागे घेतली जाणार नाही. यामुळे निवडणुकीत गोची होण्याची चिन्हे असल्याने शिवसेना अडचणीत आली आहे.

हेही वाचा : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचार सुरू, तीन टर्म खासदार राहिलेल्या हरसिमरत कौर बादल यांना लोकसभेचे तिकीट मिळणार का?

विशाल पाटलांच्या शक्तीप्रदर्शनावेळी भाजप, राष्ट्रवादीतील काही मंडळी सहभागी झाल्याने हा एकप्रकारचा इशाराच आहे असे म्हणावे लागेल. यावेळी केलेल्या भाषणात विशाल पाटलांनी काँग्रेसचे चिन्ह आणि घराणे संपविण्याचा घाट या निमित्ताने घालण्यात आल्याचा आरोप करत या शक्ती कोण आहेत, निवडण्ाुकीनंतर जाहीर करणार असल्याचे सांगत गूढ वाढविले. मात्र हे सांगत असताना दादा-बापू हा राजकीय वाद राजारामबापू पाटील यांच्या निधनावेळीच मिटला असल्याचे सांगत अप्रत्यक्ष आमदार पाटील यांच्याकडे रोख असल्याचे दिसून आले. तत्पुर्वी आमदार पाटील यांनीही सांगलीच्या जागेवरून अकारण बदनामी केली जात असून यामध्ये आपला संबंध नसल्याचा खुलासा केला असला तरी हातकणंगलेमधून मैदानात उतरलेले राजू शेट्टी यांनीही वसंतदादा घराणे राजकीय विजनवासात जावे असे काही शक्ती प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. तर डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली एक संघ काँग्रेस झाल्याचे चित्रही सध्या पाहण्यास मिळत आहे. म्हणजे सांगलीतील लढा हा वरकरणी महायुती-महाआघाडी असला तरी जिल्हा नेतृत्वाच्या स्पर्धेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा तर नाही ना अशी शंका वाटत आहे.