देशात सध्या निवडणुकीचा उत्साह आहे. लोकसभेच्या निवडणुका १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत पार पडणार आहेत. पहिल्या टप्प्यातील नामांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी २१ राज्यांतील १०२ जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या शपथपत्रांचे विश्लेषण केले आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १६२५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी १६१८ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करण्यात आले आहे. सात उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे स्पष्ट नसल्यामुळे त्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण होऊ शकले नाही. सोमवारी जारी केलेल्या विश्लेषणात ADR ने सांगितले की, पहिल्या टप्प्यातील १६१८ उमेदवारांपैकी २५२ (१६ टक्के) गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत. तर ४५० (२८ टक्के) उमेदवार करोडपती आहेत, तर उमेदवारांची सरासरी संपत्ती ४.५१ कोटी रुपये आहे.

उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय?

१६१८ उमेदवारांपैकी २५२ (१६ टक्के) उमेदवारांनी स्वत:वर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे सांगितले आहे. १६१८ उमेदवारांपैकी १६१ (१० टक्के) उमेदवारांनी स्वतः विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली आहे. १५ उमेदवारांनी स्वत: विरुद्ध दोषी ठरलेले खटले प्रतिज्ञापत्रात सांगितले आहेत. सात उमेदवारांवर खुनाशी संबंधित गुन्हे (आयपीसी ३०२) घोषित केले आहेत. महिलांवरील अत्याचाराशी संबंधित खटले जाहीर केलेले १८ उमेदवार आहेत. या १८ पैकी एका उमेदवारावर बलात्काराचा गुन्हा (आयपीसी ३७६ ) दाखल असल्याचं समजलं. याशिवाय एकूण ३५ उमेदवार आहेत, ज्यांच्यावर भडकाऊ भाषणाशी संबंधित गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचाः भाजपाशी हातमिळवणी करण्याचं जयंत चौधरींनी कार्यकर्त्यांना सांगितलं कारण; म्हणाले, “भारतरत्न हा…”

पक्षनिहाय आकडेवारी काय?

पहिल्या टप्प्यात बिहारमधील आरजेडी पक्षाच्या चारही उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तसेच द्रमुकचे २२ पैकी १३, सपाचे सातपैकी तीन, तृणमूल काँग्रेसचे पाचपैकी दोन, भाजपाचे ७७ पैकी २८, अण्णाद्रमुकचे ३६ पैकी १३, काँग्रेसचे ५६ पैकी १९ आणि बसपाचे ८६ पैकी ११ उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. आरजेडीचे चारपैकी दोन उमेदवार, डीएमकेचे २२ पैकी सहा उमेदवार, सपाचे सात पैकी दोन उमेदवार आणि तृणमूल काँग्रेसच्या पाच पैकी एका उमेदवाराने स्वत:वर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगितले आहे. भाजपाच्या १४, अण्णाद्रमुकच्या सहा, काँग्रेसच्या आठ आणि बसपाच्या आठ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

उमेदवारांची संपत्ती किती?

१६१८ पैकी २८ टक्के म्हणजेच ४५० उमेदवार करोडपती आहेत. भाजपाचे ७७ पैकी ६९, काँग्रेसचे ५६ पैकी ४९, आरजेडीचे चारपैकी चार, एआयएडीएमकेचे ३६ पैकी ३५, डीएमकेचे २२ पैकी २१, तृणमूल काँग्रेसचे पाचपैकी चार आणि बसपाचे ८६ पैकी १८ उमेदवार करोडपती आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात या उमेदवारांनी एक कोटीहून अधिक संपत्ती जाहीर केली आहे.

प्रत्येक उमेदवाराची सरासरी संपत्ती ४.५१ कोटी रुपये

लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक उमेदवाराकडे सरासरी ४.५१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. पक्षनिहाय आकडेवारी पाहिल्यास AIADMK च्या ३६ उमेदवारांची सर्वाधिक सरासरी संपत्ती ३५.६१ कोटी रुपये आहे. यानंतर २२ द्रमुक उमेदवारांची सरासरी संपत्ती ३१.२२ कोटी रुपये, काँग्रेसच्या ५६ उमेदवारांची सरासरी संपत्ती २७.७९ कोटी रुपये, भाजपाच्या ७७ उमेदवारांची सरासरी संपत्ती २२.३७ कोटी रुपये, आरजेडीच्या चार उमेदवारांची सरासरी संपत्ती ८.९३ कोटी रुपये आहे. सात सपा उमेदवारांची सरासरी संपत्ती ६.६७ कोटी रुपये आणि तृणमूल काँग्रेसच्या ५ उमेदवारांची सरासरी संपत्ती ३.७२ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

नकुल नाथ हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत

पहिल्या टप्प्यात सर्वाधिक संपत्ती जाहीर करणारे उमेदवार मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ आहेत. छिंदवाडा येथील काँग्रेस उमेदवाराने एकूण ७१६ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. या बाबतीत अण्णाद्रमुकचे अशोक कुमार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तामिळनाडूच्या इरोड मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या कुमार यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात ६६२ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार भाजपाचे देवनाथन यादव आहेत. तामिळनाडूच्या शिवगंगाई मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या देवनाथन यांच्याकडे ३०४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. काँग्रेसचे नकुल नाथ यांची संपत्ती ७१६ कोटी, एआयएडीएमकेचे उमेदवार अशोक कुमार यांची सरासरी संपत्ती ६६२ कोटी, भाजपाचे देवेंद्रनाथ यादव यांची संपत्ती ३०४ कोटी, भाजपाचे एम आर लक्ष्मी शाह यांची संपत्ती २०६ कोटी, बसपाचे माजिद अली यांची संपत्ती १५९ कोटी, भाजपाच्या एसी शानमुगन यांची संपत्ती १५२ कोटी, एआयएडीएकमेच्या जयप्रकाश व्ही यांची संपत्ती १३५ कोटी, काँग्रेसच्या व्हिंसेट पाला यांची संपत्ती १२५ कोटी, भाजपाच्या ज्योती मिर्धा यांची संपत्ती १०२ कोटी, काँग्रेसच्या पी कार्ती चिंदबरम यांच्याकडे ९६ कोटींची संपत्ती आहे.

३९ टक्के उमेदवारांनी ५वी ते १२वी दरम्यान शिक्षण घेतले

सर्व उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास ६३९ (३९ टक्के) उमेदवारांनी ५वी ते १२वी दरम्यान शिक्षण घेतले आहे. ८३६ (५२ टक्के) उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदवीपर्यंत आहे. ७७ उमेदवार पदवीधारक आहेत. ३६ उमेदवार साक्षर आहेत तर २६ उमेदवार निरक्षर आहेत. चार उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता जाहीर केलेली नाही. जर आपण उमेदवारांच्या वयाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ५०५ (३१ टक्के) उमेदवार हे २५ ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. ८४९ (५२ टक्के) उमेदवार ४१ ते ६० वर्षे वयोगटातील आहेत. २६० (१६ टक्के) उमेदवार हे ६१ ते ८० वयोगटातील आहेत. चार उमेदवारांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे. निवडणुकीतील महिलांचे प्रतिनिधित्व पाहिल्यास पहिल्या टप्प्यात १३६ म्हणजेच केवळ ८ टक्के महिला उमेदवार आहेत.