चंद्रशेखर बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदर्भ राज्याची निर्मिती करणे अवघड नाही, असे सांगत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विदर्भाच्या राजधानीत म्हणजे नागपुरात येऊन स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचे मिशन हाती घेतले खरे. पण राजकीय पक्षांना निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती ठरवून देणे वेगळेआणि मृतप्राय झालेली, नेत्यांच्या धरसोडी वृत्तीमुळे संकुचीत झालेली चळवळीला नव्याने उभे करणे वेगळे. प्रशांत किशोर यांची ‘कार्पोरेट’ कार्यशैली आणि त्यांच्या पहिल्या बैठकीला काही कट्टर विदर्भवाद्यांची अनुपस्थिती लक्षात घेतली तर वातानुकुलीत चिटणवीस सेंटरमध्ये सुरू झालेली ही मोहीम पुढे लोकचळवीत रुपांतरित होईल का , याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

प्रशांत किशोर यांचा विदर्भ चळवळीत सहभाग हा सर्वांचा लक्ष वेधून घेणारा ठरला. कारण किशोर यांची ओळख ही विविध राजकीय पक्षांना निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती तयार करून देणारे तज्ज्ञ अशी आहे आणि या चळवळीतील त्यांचा प्रवेश हा तिला उभारणी देण्यासाठी आहे, असे सांगितले जात. निवडणुका जिंकणे वेगळे आणि चळवळीला उभारणी देणे, तिला आकार देऊन उदिष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी दिशा दाखवणे या भिन्न बाबीआहेत. राजकीय पक्षाच्या गावोगावातील कार्यकर्त्यांचे नेटवर्क वापरून निर्धारित राजकीय यश पदरी पाडता येत. त्यात किशोर निपुण असल्याचे सिद्ध झालेआहे. पण चळवळ उभारणीचा किंवा चालवण्याचा अनुभव किशोर यांच्या गाठीशी किती आहे? चळवळीला उभारी देण्यासाठी लोकसहभाग लागतो. सध्या विदर्भाच्या आंदोलनाला लोकांचाच पाठींबा मिळत नाही. चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांच्या धरसोड वृत्तीमुळे लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला. आता ज्यांच्या आग्रहावरून प्रशांत किशोर यांनी या चळवळीची सुत्रे हाती घेतली त्या नेत्यांचा राजकीय इतिहास हा धरसोडीचाच आहे. त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न उरतोच आहे. याच कारणामुळे नेटाने ही चळवळ अनेक वर्षापासून पुढे नेणारे काही कट्टर विदर्भवादी किशोर यांच्या पहिल्या बैठकीपासून दूर राहिले.

हेही वाचा : शिवसेनेने पहिली कायदेशीर लढाई जिंकली

दरम्यान, किशोर यांनी मात्र विदर्भ आंदोलनाचा अभ्यास करूनच यात उडी घेतल्याचे त्यांच्या उद्बबोधनातून स्पष्ट होते. प्रत्येकाला स्वतंत्र विदर्भ कशासाठी? हे आधी पटवून द्यावे लागेल आणि सर्वांना राजकारण आणि राजकारण्यांपासून दूर राहावे लागेल, असे त्यांनी बैठकीत सांगितले. विविध राज्यात सत्ता परिवर्तनासाठी रणनीती आखणाऱ्या किशोर यांनी विदर्भात मात्र व्यवस्था परिवर्तनाची गरज व्यक्त केली. मात्र त्यांना नेमकी कोणती व्यवस्था बदलायची आहे याचे सुतोवाच केले नाही. व्यवस्था बदलाचे माध्यम राजकारण आहे आणि त्यांनी राजकीय नेत्यांना या चळवळीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मुळात किशोर यांना निमंत्रित करणाऱ्यांचा हेतूच राजकीय आहे. त्यामुळे त्यांना किशोर यांची भूमिका मान्य असणार आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो. केवळ जय विदर्भ म्हणून राज्य वेगळे होणार नाही, त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील, त्यासाठी निधी कमी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ ते निधी कोठून आणणार ? तो गोळा करायचा असेल तर प्रस्थापित राजकीय नेत्यांची किंवा उद्योगपतींची मदत घ्यावी लागेल. यापूर्वी राजकीय नेत्यांमुळेच चळवळीची हानी झाल्याचा इतिहास आहे व वेगळ्या राज्याची मागणी ही व्यापारी व उद्योगपतींची आहे, असा ठपकाही या आंदोलनावर बसला आहे. त्यामुळे या बाबी वगळूनच आंदोलनाला उभारी द्यावी लागेल. मात्र चिटणवीस सेंटरच्या वातानुकुलीत सभागृहात बैठका घेऊन चळवळ खरेच लोकचळवळ होऊ शकेल का ? याबाबत साशंकता आहे.

हेही वाचा : शिवसेनेमागे लागणार चौकशांचे शुक्लकाष्ठ ; मुंबईसाठी भाजपची निवडणूक रणनीती

सध्या सहा वेगवेगळ्या संघटना विदर्भासाठी आंदोलन करीत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने तब्बल एक महिन्याच्या आंदोलनाचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर केला. लोकांच्या सहभागाची तमा न बाळगता ते आंदोलन करतात. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा तोंडवळा सर्वसामान्यांचा आहे. प्रशात किशोर यांनी आयोजित केलेल्या बैठकीचा चेहरा कार्पोरेट होता.प्रशांत किशोर यांच्या बैठकीला अनुपस्थित असणारे कट्टर विदर्भवादी माजी आमदार वामनराराव चटप म्हणाले, प्रशांत किशोर यांच्या चळवळीतील सहभागाचे स्वागत आहे. सर्वांचे धेय एकच आहे. त्यामुळे त्यांची आम्हाला मदतच होईल. मात्र त्यांची बैठक आयोजित करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचा इतिहास हा धरसोडीचा आहे. पुन्हा विश्वासघात होऊ नयेम्हणून आम्ही त्यांच्यापासून दूर राहीलो.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It was the staunch vidarbhavadi turned their backs on prashant kishor meeting seperate vidarbha nagpur print politics news tmb 01
First published on: 24-09-2022 at 11:33 IST