कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठ्या मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे (JDS) नेते आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे काही काळ विरोधकांची आघाडी ‘इंडिया’ आणि भाजपाप्रणीत युती ‘एनडीए’पासून अंतर राखून होते. मात्र, आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाशी हातमिळवणी करण्यासाठी जेडीएसचे नेते तयार झाले आहेत. जेडीएसचे मुख्य नेते देवेगौडा किंवा त्यांचे पुत्र आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी सांगितले की, भाजपा जेडीएससह युती करणार असून २८ लोकसभा मतदारसंघांपैकी चार लोकसभा मतदारसंघ जेडीएसला दिले जातील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येडियुरप्पा पुढे म्हणाले की, भाजपा आणि जेडीएस युती करणार आहे. अमित शाह यांनी यासाठी हिरवा कंदील दाखवला असून लोकसभेच्या चार जागा जेडीएसला दिल्या जातील. यामुळे आमची ताकद आणखी वाढणार आहे. ही युती कर्नाटकमधील २५ ते २६ जागा जिंकू शकते. देवेगौडा आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीबाबतच्या अटकळीबाबत बोलताना येडियुरप्पा म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच देवेगौडा आणि कुमारस्वामी यांची भेट घेऊन युतीची चर्चा पुढे नेतील.

चर्चा सुरू असतानाच भाजपाकडून युतीची घोषणा

देवेगौडा यांनी ४ सप्टेंबर रोजी दिल्लीचा दौरा केला असता अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचेही बोलले जाते. जेडीएसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युतीची चर्चा प्राथमिक स्तरावरच सुरू आहे. पक्ष पातळीवर काही बाबतीत आणखी स्पष्टता येणे बाकी आहे. जेडीएसने पक्षातील नेते आणि पदाधिकारी यांची १० सप्टेंबर रोजी बैठक बोलावली असून त्यात चर्चा होईल आणि १३ सप्टेंबर रोजी भाजपाच्या सोबतच्या युतीची घोषणा केली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

जेडीएसच्या सूत्रांनी पुढे सांगितले की, काही बाबी विचाराधीन असून अजून युती झालेली नाही, त्याआधीच बातमी कशी बाहेर आली, याची आम्हाला कल्पना नाही. भाजपाशी उघड युती करण्याऐवजी अंतर्गत युती करावी (मैत्रीपूर्ण लढत), यावर चर्चा सुरू आहे. ही चर्चा अद्याप अपरिपक्व पातळीवरच आहे.

येडियुरप्पा यांनी जाहीर केलेल्या युतीच्या घोषणेवर देवेगौडा आणि कुमारस्वामी यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. ९० वर्षीय देवेगौडा हे दिल्ली येथे राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी जी-२० शिखर परिषदेनिमित्त आयोजित केलेल्या सहभोजनाला प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सोशल मीडियावरून जाहीर केले आहे. जेडीएसच्या कोअर समितीचे प्रमुख आणि माजी मंत्री जी. टी. देवेगौडा यांनी सांगितले की, भविष्यात दीर्घकाळासाठी पक्षाला तग धरून राहायचे असेल तर भाजपाशी युती केली पाहिजे, असा विचार पक्षातील अनेक नेत्यांच्या मनात आहे.

दुसरीकडे भाजपाचे वरिष्ठ नेते प्रल्हाद जोशी आणि सी. टी. रवि यांनी मात्र जेडीएसशी प्रस्तावित युतीच्या चर्चांना फेटाळून लावले. मंड्या लोकसभा मतदारसंघाच्या अपक्ष खासदार सुमलथा अंबरीश या भाजपाच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या, त्यांनीही युतीबाबत काहीच कल्पना नसल्याचे म्हटले. जेडीएस २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जे चार मतदारसंघ मागत आहे, त्यात मंड्या या जागेचा समावेश होतो. मंड्या येथे भाजपाच्या पाठिंब्यावर खासदार झालेल्या सुमलथा अंबरीश यांना भाजपाने दुसऱ्या टर्मसाठीही पाठिंबा देऊ केलेला आहे. मंड्या मतदारसंघ हा जेडीएसच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो. जेडीएस पक्षाला ज्या वोक्कलिगा समाजाचा पाठिंबा आहे, त्यांची या मतदारसंघात लक्षणीय संख्या आहे.

इतर तीन जागांवर फारसा वाद होणार नाही, असे सांगितले जाते. चिकबल्लापूर, बंगळुरू ग्रामीण आणि हसन हे तीन मतदारसंघ जेडीएस मागण्याची शक्यता आहे. जेडीएस मागणार असलेले चारही मतदारसंघ कर्नाटकाच्या दक्षिण भागातील आहेत. या ठिकाणी देवेगौडा आणि कुमारस्वामी यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे.

धर्मनिरपेक्ष विचारांचे काय? काँग्रेसचा सवाल

जेडीएस-भाजपाच्या संभाव्य युतीच्या चर्चेवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “त्यांनी युतीमध्ये निवडणूक लढवावी किंवा एकट्याने लढवा, त्याचा आमच्यावर काहीही फरक पडणार नाही. आम्ही लोकांकडे आमच्यासाठी मते मागू. जे लोक काँग्रेसच्या बाजूने आहेत, ते नक्कीच आम्हाला मतदान करतील.” कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, जेडीएसच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेचे काय झाले, याबाबत मला कल्पना नाही. त्यांनी विचारधारेच्या आधारावर पक्षाची स्थापना केली होती. मात्र, त्यांच्या आमदार आणि माजी आमदारांना काय झाले आहे हे कळायला मार्ग नाही.

२०१९ – लोकसभेचा निकाल

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ५३ टक्के मते मिळवली होती. तसेच २८ लोकसभा मतदारसंघांपैकी २५ लोकसभा मतदारसंघात विजय मिळविला होता. मोदींच्या बाजूने वातावरण झालेले असताना त्या लाटेवर स्वार होण्याचे काम भाजपाने केले. तर काँग्रेस पक्षाला ३२ टक्के मतदान आणि एक जागा जिंकता आली, तर दुसऱ्या बाजूला जेडीएसला केवळ १० टक्के मतदान आणि एक जागा जिंकण्यात यश आले. मंड्याची जागा अपक्ष खासदाराने जिंकली.

२०२३ – विधानसभेचा निकाल

याचवर्षी संपन्न झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ४३ टक्के मतदान मिळवत २२४ विधानसभेच्या जागांपैकी १३५ जागा जिंकल्या, तर भाजपाने ३६ टक्के मतदान मिळवत ६६ जागांवर विजय मिळविला. जेडीएसच्या मतदानाच्या टक्केवारीत यंदाच्या निवडणुकीत घट झाली. त्यांनी १३ टक्के मतदान मिळवत, केवळ १९ जागा जिंकल्या. १९९९ पासून झालेल्या निवडणुकांपैकी यंदाची जेडीएसची कामगिरी सर्वात खराब होती.

भाजपा-जेडीएसच्या युतीने काय साधणार?

कर्नाटक राज्यात काँग्रेस आणि भाजपा हातपाय पसरत असताना जेडीएस पक्षालाही प्रादेशिक पक्ष म्हणून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे. यासाठी भाजपाशी युती करणे हा त्यांना उत्तम मार्ग दिसतो. कर्नाटकाच्या दक्षिण प्रांतात जेडीएसचा चांगला प्रभाव आहे. या ठिकाणी असलेल्या वोक्कलिगा समुदायाची मतपेटी जेडीएसच्या ताब्यात आहे. तसेच या ठिकाणी भाजपाकडे मजबूत नेतृत्व नाही. त्यामुळे जेडीएसशी युती करून या प्रांतात भाजपालाही निश्चित फायदा मिळू शकतो.

दक्षिण कर्नाटकमधील वोक्कलिगा समुदायाची लोकसंख्या अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये हिंदुत्वाचा आधार निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्नही विफल ठरले असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आता लोकसभेसाठी त्यांना जेडीएसच्या मतदानाची गरज लागणार आहे.

जेडीएस आणि भाजपाने या आधी कर्नाटकमध्ये २००६-२००७ सालापर्यंत सत्ता स्थापन करण्यासाठी युती केली होती. पण, निवडणुकीसाठी त्यांची कधीही उघड युती झाली नाही. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेही सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात भाजपा-जेडीएसने अंतर्गत समजुतीने निवडणूक लढवली. मात्र, निवडणुकीच्या निकालात कुणालाही बहुमत प्राप्त झाले नाही. कालांतराने काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला, ज्यामुळे कमी जागा असलेले कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले. मात्र, २०१९ साली सत्तेमध्ये असलेल्या जेडीएस-काँग्रेसच्या आमदारांना फोडून भाजपा सत्तेवर आला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janata dal secular and bjp alliance for 2024 hint from bs yeddyurappa kvg
First published on: 09-09-2023 at 16:34 IST