कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर महायुती आणि महाविकास आघाडीसह तिसऱ्या आघाडीतील बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे. निवडणूक लढणारच असा निर्धार बंडखोरांनी केल्याने त्यांची समजूत तरी कशी काढायची याचा पेच त सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना पडला आहे.

गेली काही वर्षे राज्यांमध्ये एकीकडे काँग्रेस – राष्ट्रवादी आणि दुसरीकडे भाजप – शिवसेना असे दोन्हीकडे दोन दोन प्रमुख पक्ष होते. यावेळीच्या निवडणुकीत महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन प्रमुख पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांनी निवडणुकीच्या आधी काही महिने मुलाखती घेतल्याने इच्छुकांच्या अपेक्षाही वाढल्या होत्या. आता उमेदवारी न मिळाल्याने अनेक मतदारसंघात बंडखोरीला उत आला आहे. प्रभावी बंडखोरांची बंडखोरांबाबत कोणती मात्रा लागू करायची याचा पेच नेत्यांसमोर निर्माण झाला आहे.

हेही वाचा – बंडखोरीमुळे गडचिरोलीत महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ, गडचिरोलीतील तीन विधानसभेत काँग्रेसकडून ७ तर भाजपचे दोघे अपक्ष लढण्यावर ठाम

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसने राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांना विरोध झाल्याने मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी घोषित केली. संतप्त झालेल्या लाटकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. चंदगडमध्ये बंडखोरांचे पेव फुटले आहे. येथे अजित पवार राष्ट्रवादीचे राजेश पाटील हे आमदार पुन्हा रिंगणात असताना त्यांच्या विरोधात भाजपचे शिवाजीराव पाटील यांनी बंडखोरी केली आहे. जनस्वराज्य शक्ती पक्षाचे मानसिंग खोराटे यांची उमेदवारी ही येथे महायुतीची डोकेदुखी बनली आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने नंदिनी बाभुळकर यांना उमेदवारी दिली असताना येथे काँग्रेसचे गोपाळराव पाटील, गतवेळचे उमेदवार विनायक पाटील यांनी अर्ज भरले असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

हेही वाचा – राजकारणातील बड्या चेहऱ्यांची यंदा वंचितकडे पाठ

करवीरमध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेने चंद्रदीप नरके यांना उमेदवारी दिली असली तरी भाजपच्या सहयोगी पक्ष असलेल्या जनस्वराज्य शक्तीचे संताजी घोरपडे यांनी बंडखोरी केली आहे. यामुळे नरके समर्थकांनी पन्हाळ्यात विनय कोरे यांना धडा शिकवण्याची भाषा चालवली आहे. इचलकरंजीत दोन्ही ठिकाणी बंडाचे झेंडे लागले आहेत. भाजपचे राहुल आवाडे यांच्या विरोधात अजित पवार राष्ट्रवादीचे विठ्ठल चोपडे यांनी बंडाचा झेंडा रोवला आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे यांना भाजप हिंदुराव शेळके यांनी पाठिंबा दिला असताना येथे माजी आमदार पुत्र सुहास अशोक जांभळे यांनी बंडाचे निशाण रोवले आहे. राधानगरीत पुन्हा उद्धव ठाकरे शिवसेनेचे के. पी. पाटील यांच्या विरोधात त्यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांनी पुन्हा बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी पेच निर्माण झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वाभिमानीतही कोंडी

शिरोळमध्ये महायुतीतून राजेंद्र पाटील यांनी अपक्ष शाहू आघाडीच्या माध्यमातून अपक्ष अर्ज भरला असताना येथे भाजपचे विजय भोजे, मुकुंद गावडे यांचे अर्ज दाखल केल्याने डोकेदुखी वाढले आहे. काँग्रेसचे गणपतराव पाटील यांच्यासोबत राहिलेले उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी ऐनवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करून अर्ज भरला आहे. स्वाभिमानीच्या उमेदवारीमुळे हातकणंगलेतही कोंडी निर्माण झाली आहे. येथे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांना उमेदवारी दिली होती. मात्र उद्धव ठाकरे शिवसेनेतून स्वाभिमानीत प्रवेश केल्यानंतर डॉ. सुजित मिणचेकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याने येथेही स्वाभिमानी समोर बंडाचे आव्हान निर्माण झाले आहे.