कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढली जाणार हे पुनःपुन्हा स्पष्ट केले जात असले तरी तिन्ही पक्षातील जागावाटप हा कळीचा मुद्दा बनला आहे. भाजपने थोरल्या भावाच्या अविर्भावात येत सर्वाधिक जागांवर दावा केला आहे. गेल्यावेळी यथातथा असित्व असलेल्या शिवसेनेने थेट ३० जागांवर दाव्याची मांड ठोकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आकड्यांच्या शर्यतीत तूर्तास नसली तरी ते या बाबतीत कुठे मागे राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे निवडणुकीकरिता जागावाटपाचा सर्वमान्य तोडगा काढण्याचे आव्हाने जिकिरीचे बनत चालले आहे.

कोल्हापूर महापालिकेमध्ये गेल्या दोन-तीन सभागृहामध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी यांचे बहुमत राहिले आहे. राज्यात आता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडे प्रमुख तीन पक्ष विभागले गेले आहेत. या पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांची ही पहिलीच निवडणूक. अशावेळी कोल्हापुरात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या सामना रंगणार हे स्पष्ट आहे. तशा हालचाली गतिमान झाल्या आहेत.

निवडणुकीला सामोरे जाण्याआधी जागावाटप हा वादाचा विषय असल्याचे वारंवार दिसत आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी मावळत्या सभागृहात भाजप व ताराराणी आघाडीचे ( महाडिक यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीची आघाडी. आता ती भाजपमध्ये विलीन झाल्यात जमा आहे) मिळून ३४ सदस्य होते. या जागा भाजपकडे कायम राहतील ,असे अधिकारवाणीने सांगायला सुरुवात केली आहे.

काँग्रेसकडे असलेल्या २९ जागांचे वाटप कसे करायचे याबाबत मित्रपक्षांनी काय ते बोलावे असा या थोरल्या भावाचा रोख आहे. मुद्दा इतक्यावरच थांबत नाही. मागील सभागृहात कोणत्या पक्षाला किती जागा होत्या; त्याची टक्केवारी काढूनच जागावाटप होऊ शकते, असा त्यांचा रोकडा सवाल आहे. महाडिक यांची ही रोखठोक भूमिका शिवसेनेला कितपत पचनी पडणार हा खरा प्रश्न आहे.

नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष,शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी ३० जागांवर हक्क सांगितला आहे. मागील सभागृहात शिवसेनेचे चार सदस्य असताना शिवसेनेने जागा वाटपासाठी इतकी मोठी दावा उडी घेतली आहे. तथापि, महाडिक यांच्या सूत्रानुसार सेनेच्या वाघाला अधिकतर डझनभर जागाही मिळणे कठीण जाईल असे दिसते आहे. ही बाब शिवसेना आणि क्षीरसागर मान्य करणार का हा वादाचा प्रश्न उरतोच. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपातील दरी आणखीन रुंदावत जाताना दिसत आहे.

राष्ट्रवादीची टोकदार भूमिका

महायुतीतील तिसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने अद्याप जागा वाटपाबाबत ठामपणे अधिकार सांगितला नाही. पक्षाचे नेते हसन मुश्रीफ हे सध्या लंडनवारीवर आहेत. त्यांनी यापूर्वीच महापालिकेमध्ये राष्ट्रवादी हा वर्षानुवर्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. त्यामुळे त्याप्रमाणात तोलामोलाच्या जागा मिळाल्या पाहिजेत, असे टोकदार विधान केले आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या जागा पदरात पाडून घेण्यात आपण कोठे मागे राहणार नाही असा इशाराच जणू मुश्रीफ यांनी मित्रपक्षांना दिला होता. आधीच भाजप – शिवसेना यांच्यात जागा वाटपावरून फटाके फुटत असताना राष्ट्रवादीचा तिसरा कोन जागा वाटपाची धग आणखी वाढवू शकतो. परिणामी महायुतीमध्ये जागावाटप हे निवडणुकीपेक्षाही खरे आव्हान ठरणार असल्याचे दिसत आहे.