कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांच्या वाघनखांचे प्रदर्शन आणि उद्घाटन सोहळ्यातील निष्काळजीपणावरून राजकीय तोफा डागल्या जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची जपमाळ ओढत सत्ताशकट हाकणारे जिल्ह्यातील मंत्री, खासदार ,आमदार अशा लोकप्रतिनिधींनी या प्रदर्शनाकडे पाठ फिरवल्यामुळे ते टिकेचे धनी होत आहेत. तर, हा सुरुवातीचा औपचारिक कार्यक्रम असल्याची सारवासारव करून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यापुढील काळात हे प्रदर्शन अधिक उठावदार करण्याचे आश्वासन देत टीकेची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्य शासनाकडून लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून तीन वर्षांसाठी करार तत्त्वावर आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे राज्यात विविध ठिकाणी प्रदर्शनाद्वारे सादर केली जात आहेत. याबाबतची घोषणा शासनाकडून झाली तेव्हा वाघनखावरून वाद निर्माण झाला होता. शासन ज्या वाघनखांचे प्रदर्शन भरवीत आहे; ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाच्या वधावेळी वापरलेली नव्हती, अशा प्रकारची मांडणी काही इतिहास अभ्यासकांनी केली होती. कोल्हापुरातूनही असाच सूर उमटलेला होता.
त्यामुळे वाघनखांचे आकर्षण एकीकडे असताना त्याबद्दल कोल्हापूरकरांच्या मनात काहीशी साशंकता आधीच निर्माण झाली होती. यामुळे प्रदर्शनाला प्रतिसाद कसा मिळेल याबाबत संयोजकांना जाणीव नसल्याचे दिसून आले. अशातच या प्रदर्शनाचे नियोजन ढिसाळ पद्धतीने झाले.
सातारा, नागपूर येथे या प्रदर्शनाची सुरुवात वाजत गाजत करण्यात आली होती. त्याला मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित होते. कोल्हापुरात सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचा शुभारंभ करण्याचे नियोजन होते. ऐनवेळी त्यात बदल होवून सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तेही या कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी ऑनलाईन उपस्थित राहून चालत्या वाहनातून प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.
खरे तर कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य, मराठी शाहीचा इतिहास याबाबत कोणताही कार्यक्रम असला की त्याला भरगोस प्रतिसाद मिळत असतो. परंतु त्यासाठी नेटके नियोजन गरजेचे असते. वाघनखांच्या बाबतीत सुरुवातीपासून सावळा गोंधळ दिसून आला. हे प्रदर्शन गेल्या महिन्यात सुरु होणार असल्याचे जाहीर केल्याने काही शाळांतील शिक्षक, विद्यार्थी प्रदर्शन स्थळी जमले होते. परंतु प्रदर्शन नंतर सुरू होणार असल्याचे सांगितल्यानंतर या सर्वांना आल्या पावली भर पावसात परतावे लागले होते. बेजबदारपणाचे दर्शन घडले असतानाही मंगळवारच्या प्रदर्शन शुभारंभावेळी पुरेशी काळजी घेतली जाणे अपेक्षित होते. पण ते घडले नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनाही निमंत्रण दिले नसल्याने त्यांनी कार्यक्रमास येण्याची टाळले. त्यामुळे या कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आबिटकर वगळता जिल्ह्यातील अन्य मंत्री, खासदार, आमदार यांनी पाठ फिरवली होती. ही संधी साधून उद्धव ठाकरे शिवसेनेने टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य याचे नाव घेऊन महायुती शासन कारभार करीत आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे प्रदर्शन स्वराज्याची राजधानी असलेल्या कोल्हापुरात होत असतान
विधानसभा निवडणुकी वेळी महायुतीला पाठिंबा दिलेले मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनीही या प्रकारावर तीव्र नापसंती व्यक्त केली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रदर्शनस्थळी भेट घेऊन मुळीक यांनी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्या ढिसाळ नियोजनावरून टीकेचा भडिमार केला. त्यावर पालकमंत्री आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल,असे आश्वासन दिले. प्रदर्शन शुभारंभ म्हणजे औपचारिकता आहे. पुढील आठ महिन्याच्या काळात विविध कार्यक्रम घेऊन प्रदर्शनाला उठावशीरपणा आणण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
हे कमी की काय म्हणून या प्रदर्शनाच्या शुभारंभवेळी एका शाळेचे विद्यार्थी आणले गेले होते. विद्यार्थ्यांची उपस्थिती वगळता प्रदर्शन शुभारंभ रिकामा खुर्चीच्या साक्षीने पार पडला. अशा वादग्रस्त पद्धतीने प्रदर्शनाची सुरुवात झाल्याने एका अर्थाने सत्ताधाऱ्यांना हा एक धडाच मिळाला.
