छत्रपती संभाजीनगर : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेला प्रतिसाद बघूनच राज्यात काँग्रेसच्या वतीने सप्टेंबरमध्ये लोकसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. फोडाफोडीच्या राजकारणासाठी सक्त वसूली संचालनालयाचा उपयोग, खोट्या आश्वासनांबरोबर महागाई, बेराेजगारी या प्रश्नी लोकसंवाद पदयात्रा घडावी म्हणून काँग्रेसच्या वतीने ३ ते ९ स्पटेंबर या कालावधीमध्ये लोकसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठवाडा विभागाची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यावर देण्यात आली आहे. लोकभावना जाणून घेण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली असल्याने त्याच्या नियोजनाबाबत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच घेण्यात आली. विभागातील आठ जिल्ह्यांतून पदयात्रा जाईल व त्यात कोणते मुद्दे चर्चेत येतील, पदयात्रा ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना वाहने वापरायची का, याचे नियोजन आता केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील मरगळ आता दूर झाल्यासारखे चित्र दिसून येत आहे. अलिकडेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आंदोलनातही काँग्रेसचे बहुतांश नेते सहभागी झाले होते. एरवी एखाद्या कार्यक्रमास हजेरी लावून निघून जाणारे कार्यकर्तेही मणिपूर हिंसाचाराच्या आंदोलन कार्यक्रमात रस्त्यावर उतरले दिसून आले.

हेही वाचा – जिल्हा आणि तालुका निर्मितीचे पुन्हा राजकारण आणि आंदोलने

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर निर्माण झालेल्या पोकळीत काँग्रेसने आता प्रत्येक मतदारसंघात कार्यक्रम जाहीर केले आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुका व जिल्हा स्तरावरील कार्यकर्ते कामाला लागतील असे काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. राजकारणात भाजपने केलेल्या फोडाफोडीवर आता प्रश्न निर्माण करता येणे शक्य असल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे म्हणाले, लोकांमध्ये आम्हाला आता असंतोष दिसू लागला आहे. विविध प्रश्नांवर लोक भाजपविरोधी मत व्यक्त करू लागले आहेत. काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही आता उत्साह जाणवू लागला आहे. त्यामुळे ही लोकसंवाद यात्रा पोषक वातावरण निर्माण करेल.

हेही वाचा – अपयशी सरकारी योजनांची शिवसेनेच्या वतीने ‘होऊ दे चर्चा’

राज्यातील लोकसंवाद यात्रांसाठी आता समन्वयकही निवडण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली असून काेकणातील यात्रेसाठी प्रत्येक जिल्ह्यास एक नेत्याची जबाबदारी देण्याता आली आहे. लोकसंवाद यात्रेतून केंद्र सरकारच्या विरोधात किती रोष आहे, त्याचे मतांमध्ये किती रुपांतर होऊ शकते याची चाचपणी करण्यासाठी काँग्रेसकडून हा उपक्रम आखण्यात आला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksamvad yatra has been organized in maharashtra on behalf of congress in september print politics news ssb
First published on: 12-08-2023 at 15:50 IST