पुणे : एके काळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि पुरोगामी विचारांना साथ देणारा म्हणून ओळखला जाणारा पश्चिम महाराष्ट्राचा टापू महायुतीने या निवडणुकीत अक्षरश: काबीज केला आहे. हिंदुत्वाचा मुद्दा येथे चालल्याचे दिसले. महाविकास आघाडीतील काही दिग्गजांचा पराभव आणि केवळ दोन जागांपुरती उरलेली काँग्रेस ही दोन पश्चिम महाराष्ट्राच्या निकालांची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली.

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी पुणे शहरावर भाजपचे वर्चस्व असल्याचे, तर ग्रामीण भागावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्राबल्य असल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले. काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार झाली असून, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला अवघी एक जागा मिळाल्याने नामुष्की पत्करावी लागली आहे. शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) या पक्षांनी प्रत्येकी एक जागा घेऊन अस्तित्व टिकविले आहे. मनसेला मात्र मतदारांनी साफ नाकारले.

हेही वाचा : महायुतीची ‘सत्ता’वापसी; लोकसभेत पराभूत झालेल्या १०५ जागांवर विजयी

जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमध्ये भाजपने नऊ जागा जिंकून ताकद दाखवून दिली आहे. त्यामध्ये पुणे शहरात सहा, पिंपरी-चिंंचवडमध्ये दोन आणि जिल्ह्यात एक जागा मिळविली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने सहा ठिकाणी जिल्ह्यात, एक पुण्यात आणि एक पिंंपरी-चिंंचवड शहरात अशा आठ जागा जिंकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यावरील ‘दादागिरी’ दाखवून दिली. खेड-आळंदी आणि जुन्नरमधील जागा मात्र या पक्षाला गमवाव्या लागल्या. या जागा अनुक्रमे शिवसेना (ठाकरे) आणि अपक्षाला मिळाल्या. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला वडगाव शेरी या एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना (शिंंदे) या पक्षाला एक जागा मिळाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडे आठ, काँग्रेसकडे तीन होत्या. ‘राष्ट्रवादी’कडे असलेल्या दहापैकी नऊ आमदार अजित पवार यांच्याकडे, तर एक शरद पवार यांच्याकडे गेला.

विखेंमुळे महायुतीनगर!

● काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, गेल्या आठ निवडणुकांत सलगपणे विजय मिळवणारे बाळासाहेब थोरात यांच्यासह खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना बसलेला पराभवाचा धक्का हे अहिल्यानगर जिल्ह्यातील निकालाचे वैशिष्ट्य ठरले.

● जिल्ह्यात महायुतीला मिळालेले यश पाहता, राधाकृष्ण विखे यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. एका अर्थाने विखे यांचा तिहेरी विजय समजला जातो. ते स्वत: तर विजयी झालेच, शिवाय त्यांचे कट्टर परंपरागत विरोधक बाळासाहेब थोरात व सहा महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांचा पराभव करून विजय मिळवणारे नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पारनेरमधून झालेला पराभव, असा तिहेरी विजय विखे यांना लाभल्याचे मानले जाते. सुजय विखे यांच्या पराभवासाठी थोरात यांनी नगर लोकसभा निवडणुकीत जीवाचे रान केले होते. नीलेश लंके यांना सर्व प्रकारची मदत केली होती. पण, थोरात यांचा पराभव घडवून आणून विखे यांनी वचपा काढल्याचे मानले जाते.

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का; महाराष्ट्रात निराशा अन् झारखंडमध्येही पक्ष कमकुवत, कारण काय?

● ‘लाडकी बहीण’, ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ या मुद्द्यांसह प्रामुख्याने स्थानिक पातळीवर गटातटाचे राजकारण यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक रंगली होती. तब्बल सहा माजी आमदारांनी बंडखोरी केली होती. मात्र, त्यातील कोणालाही विजय मिळाला नाही. माजी मंत्री शंकरराव गडाख यांनाही नेवासा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. किमान सात मतदारसंघांतून बंडखोरी झाली होती. कोणत्याही बंडखोराला विजय मिळवता आला नाही.

शरद पवारांचा प्रभाव कमी

प. महाराष्ट्रातील हे चारही जिल्हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारे आहेत. पक्षफुटीनंतर त्यांनी या चारही जिल्ह्यांत मोठे आव्हान निर्माण केले होते. मात्र, सोलापूर वगळता त्यांच्या पक्षाला फारसा प्रभाव दाखवता आला नाही. सोलापुरात मात्र चार जागा जिंकून पवारांनी आपला दबदबा आजही कायम असल्याचे दाखवून दिले. इतर जिल्ह्यांत मात्र शरद पवार यांना प्रभाव दाखविता आला नाही.

प्रमुख विजयी उमेदवार

●शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा (भाजप)

●सुधीर गाडगीळ, सांगली (भाजप)

●विश्वजित कदम, पलूस कडेगाव, काँग्रेस

●हसन मुश्रीफ, कागल (राष्ट्रवादी काँग्रेस)

●महेश शिंदे, कोरेगाव (शिवसेना, एकनाथ शिंदे)

हेही वाचा : विधानसभेचे ७० लाख वाढीव मतदान

प्रमुख पराभूत उमेदवार

●पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस, कराड दक्षिण)

●बाळासाहेब थोरात (काँग्रेस, संगमनेर)

●बाळासाहेब पाटील (काँग्रेस, कराड उत्तर)

●हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी (शरद पवार), इंदापूर)

●शहाजीबापू पाटील (शिवसेना (शिंदे), सांगोला)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

●प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी (शरद पवार), राहुरी)