ठाणे : शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या ठाणे जिल्ह्यातील आमदारांचा गद्दार असा उल्लेख करत त्यांना निवडणुकीत पराभूत करण्याची भीमगर्जना करणारे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जिल्ह्यात एकही जागा जिंकता आलेली नाही.

भिवंडी ग्रामीण, अंबरनाथ, कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीण या जागांवर उमेदवार विजयी होतील, असा ठाकरे गटाचा दावाही प्रत्यक्षात फोल ठरला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जिल्ह्यात एकूण दहा जागांवर निवडणूक लढवली असून या सर्वच जागांवर त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. यामुळे जिल्ह्यात ठाकरे गटाचे ‘पानिपत’ झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – ‘हे’ मतदारसंघ जातीय समीकरणापलीकडे आणि पक्षीयप्रेमाच्या वस्तूपाठाचे

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी घराघरात शिवसेना पोहचवली. त्यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे अस्तित्व कायम ठेवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यामुळेच शिवसेनेतील बंडानंतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्वच आमदारांनी शिंदे यांना समर्थन दिले. यामध्ये आमदार प्रताप सरनाईक, शांताराम मोरे, विश्वनाथ भोईर, डॉ. बालाजी किणीकर या आमदारांचा समावेश होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांचा गद्दार असा उल्लेख करत त्यांना निवडणुकीत पराभूत करण्याची भीमगर्जना उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी केली होती.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीणमध्ये महादेव घाटाळ, कल्याण पश्चिममध्ये सचिन बासरे, अंबरनाथमध्ये राजेश वानखेडे, कल्याण पूर्वमध्ये धनंजय बोडारे, डोंबिवलीमध्ये दीपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीणमध्ये सुभाष भोईर, ओवळा माजिवडामध्ये नरेश मणेरा, कोपरी पाचपाखाडीमध्ये केदार दिघे, ठाणे शहरामध्ये राजन विचारे, ऐरोलीमध्ये मनोहर मढवी अशा दहा जणांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली होती. त्यातील पाच उमेदवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, शांताराम मोरे, विश्वनाथ भोईर, डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरोधात उभे केले होते. मात्र, यासह उर्वरित पाच जागांवर ठाकरे गटाचा पराभव झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात त्यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उद्धव यांनी उमेदवारी दिली होती. येथे शिंदे विरुद्ध दिघे कुटुंबीय अशी लढत करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केला होता, मात्र त्यात ठाकरे गटाला फारसे यश मिळाले नाही.

लोकसभा निवडणुकीत ठाणे आणि कल्याण मतदारसंघात शिंदे गटाने ठाकरे गटाचा पराभव केला. या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले होते. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला धूळ चारत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले आहे. भिवंडी ग्रामीण, अंबरनाथ, कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीण या जागांवर उमेदवार विजयी होतील, असा ठाकरे गटाचा दावा होता. प्रत्यक्षात या जागांवरही ठाकरे गटाचा पराभव झाला. जिल्ह्यात लढविलेल्या दहा जागांवर पराभव झाल्याने ठाकरे गटाचे पानिपत झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – Eknath Shinde Resignation : मुख्यमंत्रीपदावरून शिंदे यांची माघार? शिवसेनेचा आक्रमकपणा मावळला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यात वर्चस्व असून शिवसेनेतील फुटीनंतरही त्यांनी जिल्ह्यातील वर्चस्व कायम ठेवले आहे. यामुळेच शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे शिंदे यांना सातत्याने त्यांच्याच जिल्ह्यात आव्हान देताना दिसत होते. यातूनच ‘मुख्यमंत्र्यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात निवडणूक लढवेन’ अशी घोषणा करत आदित्य यांनी पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत आदित्य यांनी जिल्ह्यातील प्रचाराकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले होते.