भंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून सर्वांनी ‘थांबा आणि वाट पाहा’चे धोरण अवलंबिले आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावांत उमेदवारीसंदर्भात चर्चांचे फड रंगले आहेत. कुणाला उमेदवारी मिळणार, कोण कोणत्या पक्षाकडून लढणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. इच्छुकांनी मात्र मतदारसंघांवर दावे करून तूर्त हात वर केल्याचे दिसून येत आहे.

भंडारा मतदारसंघात रस्सीखेच

भंडारा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. हा मतदार संघ २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला गेला होता. नंतर २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले. या जागेसाठी महायुतीत प्रचंड रस्सीखेच आहे. ही जागा शिंदे गटाला मिळाल्याच्या वावड्या उठल्या आहेत, तर भाजपनेही संपूर्ण ताकतीनिशी येथून लढण्याची तयारी चालवली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत काँग्रेसनेही येथून लढण्याची तयारी पूर्ण केली आहे, तर शरद पवार गटानेही या जागेवर दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटही या जागेसाठी आग्रही आहे. सोबतच वंचित आणि बसपचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा >>>काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर ठाकरे, शरद पवार गटांचा डोळा

साकोली विधानसभा मतदारसंघ महायुतीत भाजपच्या आणि आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला जाणार, हे निश्चित मानले जात आहे. मात्र, येथेही अनेक इच्छुक बाशिंग बांधून तयार आहेत. उमेदवारीची माळ ऐनवेळी कुणाच्या गळ्यात पडते, यावरच राजकीय समीकरण अवलंबून असतील.

तुमसरमध्ये इच्छुकांची संख्या अधिक

तुमसर मतदारसंघासाठीही अनेक जण इच्छुक आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत ही जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार, हे ठरले नसल्याने उमेदवार निश्चितीबाबत येथेही संभ्रमावस्था आहे. यामुळेच की काय, पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढण्याची तयारी अनेकांनी केली आहे.

हेही वाचा >>>शरद पवारांच्या शिलेदाराविरोधात भाजप आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाज माध्यमांवर स्पर्धा

विधानसभा उमेदवारीबाबत समाज माध्यमावर जोरदार स्पर्धा रंगली आहे. इच्छुक उमेदवारांचे समर्थक वेगवेगळ्या ‘पोस्ट’ प्रसारित करीत आहेत. कुणाला उमेदवारी मिळणार, यावरही भाष्य केले जात आहे. युती, आघाडी होणार की नाही, याबाबतही चर्चांना उधाण आले आहे. अनेक इच्छुक आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपणच कसे सर्वमान्य उमेदवार आहोत, आपला जनसंपर्क किती दांडगा आहे, हे पटवून देण्यासाठी सर्वच सरसावले आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठी कुणाला तिकीट देणार, हे सध्यातरी गुलदस्त्यातच आहे.