Chhagan Bhujbal takes charge Food and Civil Supplies : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी गुरुवारी (तारीख २३ मे) अन्न व नागरी पुरवठा खात्याचा पदभार स्वीकारला. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार असताना भुजबळांकडे याच खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, गेल्यावर्षी महायुतीचे सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत परतल्यानंतर भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्याकडे असलेलं खातं माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आलं होतं. या निर्णयामुळे छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती. आता जळपास सहा महिन्यांनंतर भुजबळांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे.

लोकसभा निवडणुकीपासून झाली होती कोंडी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दुभंगल्यानंतर शरद पवारांची साथ सोडून छगन भुजबळ हे अजित पवारांच्या गटात सामील झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून त्यांना कोंडीला सामोरं जावं लागलं. त्यावेळी राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद सुरू होता. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे भुजबळांवर टीकेचे वार करीत होते. नाशिकमधून लोकसभेच्या उमेदवारीसाठी भुजबळ आग्रही होते. मात्र, भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांनी सूचवूनही त्यांनी उमेदवारी मिळाली नाही. शिवसेनेने (एकनाथ शिंदे) शेवटपर्यंत या जागेवर आपला दावा कायम ठेवला होता. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नेतृत्वाने ऐनवेळी कच खाल्ली म्हणूनच आपल्याला लोकसभेचं तिकीट मिळालं नाही, अशी भावना त्यावेळी भुजबळांच्या मनात होती.

अजित पवारांवर केली होती टीका

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळविल्यानंतर महायुतीने राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापन केली. नाशिकच्या येवला मतदारसंघातून निवडून आलेल्या भुजबळांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी आशा होती. मात्र, नव्या सरकारच्या मंत्रिमंळातून डावलण्यात आल्याने भुजबळ आक्रमक झाले होते. त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला आव्हान देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. “मंत्रिमंडळात माझा समावेश करण्यात आला नाही. त्याआधी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा अजित पवारांच्या पत्नीला संधी देण्यात आली. नंतरही मला डावलण्यात आले. मी काही यांच्या हातचे खेळणे नाही,” अशा शब्दांत भुजबळांनी आपल्या संतापाला वाट करून दिली होती. अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकांनाही भुजबळ उपस्थित राहत नसत. याउलट ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेहमी भेटीगाठी घेत असत.

आणखी वाचा : भाजपा आमदाराविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा; कोण आहेत मुनीरत्न नायडू?

छगन भुजबळ यांना मंत्रिपद कुणामुळे?

अजित पवार आणि भुजबळांमधील दुरावा कमी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच पुढाकार घेतल्याचे सांगितलं जात आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आपल्याला संधी मिळेल याची जाणीव झाल्यानंतर छगन भुजबळांनी मवाळ धोरण स्वीकारलं होतं. राज्याच्या अर्थसंकल्पावरून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे कौतुक करुन त्यांनी सर्वांना बुचकळ्यात टाकले होते. अखेर सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर ७७ वर्षीय भुजबळांचा अखेर मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. अजित पवार व भुजबळ यांच्यातील दुरावा कमी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच पुढाकार घेतल्याचे सांगितले जात आहे.

छगन भुजबळ मंत्रिपदाबद्दल काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, “जेव्हा भाजपप्रणीत महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिसेंबर २०२४ मध्येच त्यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी इच्छुक होते. फडणवीस साहेब माझा समावेश व्हावा यासाठी उत्सुक होते आणि आता त्यांनी यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मंत्रिमंडळात पुनरागमन होण्यासाठी माझ्यासाठी प्रयत्न केले आहेत.” कल्याणकारी योजनांच्या संदर्भात बोलताना, भुजबळ यांनी स्पष्ट केले की, शिवभोजन योजना कायम ठेवण्याबरोबरच इतर योजनाही अखंडितपणे सुरू राहतील. केंद्र सरकारकडे मदतीसाठी तसे प्रस्ताव पाठवले आहेत. या योजनांचा लाभ अधिकाधिक गरजूंना मिळावा यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत.

हेही वाचा : BJP Crisis : भाजपामध्ये अंतर्गत कलह, राष्ट्रीय अध्यक्षांची निवड पुन्हा लांबणीवर? नेमकं कारण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनंजय मुंडेंसाठी मंत्रिपदाची दारं बंद?

दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश झाल्याने राष्ट्रवादीचा मंत्रीपदाचा कोटाही संपला आहे, ज्यामुळे आमदार धनंजय मुंडे यांच्यासाठी मंत्रीपदाची दारं जवळपास बंदच झाल्याचे मानले जात आहे. महायुती सरकारमध्ये आता राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नऊ मंत्री आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचे समर्थक व जवळचे कार्यकर्ते वाल्मिक कराड याच्यावर दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर मुंडे यांनी राजीनामा दिला होता. येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडेपेक्षा भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देणे राष्ट्रवादीला सोयीचे असल्याने त्यांचा समावेश झाल्याचे मानले जात आहे.