नागपूर : मतदार यादीतील घोळाच्या विरोधात मुंबईत एक नोव्हेंबर रोजी सर्व विरोधी पक्षाकडून काढण्यात येणारा मोर्चा म्हणजे आगामी निवडणुकामध्ये पराभवाची भीती वाटत असल्याने केले जाणारे ‘ कव्हर फायरिंग’ आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात केली. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार विरोधकांचा मोर्चा जर ‘कव्हर फायरिंग’ असेल तर मतघोटाळ्याची चौकशी न करता केवळ निवडणूक आयोगाची बाजू घेऊन बोलत राहणे हे सुद्दा मतदार यादीतील घोळ लपवण्यासाठी केलेले ‘कव्हर फायरिंग’च ठरते, अशी टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे. सध्या तरी मतदार यादीवरून राजकीय रणांगणात दोन्ही बाजूंनी फायरिंग सुरू झाले आहे.

कव्हर फायरिंग ही लष्करी सज्ञा आहे. युद्धभूमीवर शत्रूवर आक्रमण करताना आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी आडोसा घेऊन केलेल्या गोळीबाराला ‘कव्हर फायरिंग’ म्हंटले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चातुर्याने या शब्दाचा वापर मतदार यादीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर टीका करण्यासाठी प्रथमच केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्व प्रथम जेव्हा मतघोटाळ्याचे आरोप केले त्यात नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदार संघाचे नाव आले होते. त्यानंतर नगर पंचायतीच्या प्रारूप यादीत एकाच घराच्या पत्त्यावर दोनशे मतदारांची नोंद असल्याचे हिंगणा तालुक्यात उघडकीस आले होते. अलिकडेच कोंढाळीच्या माजी ग्रामपंचायत सदस्यांचे नाव त्याच्या नावाने बनावट अर्ज करून चक्क दुसऱ्या तालुक्यात स्थलांतरित करण्यात आले. हे सर्व प्रकार उघडकीस आले म्हणून चर्चेत आले. पण कितीतरी अशी प्रकरणे आहेत. की ज्यावर चर्चा झाली नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी खुद्द मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात एकाच मोबाईल क्रमांकावर शेकडो मतदारांची नोंदणी झाल्याची तक्रार त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी केली होतेी. या सर्व प्रक्रणात विरोधकांनी सरकारविरोधात मोर्चे व निदर्शने केली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात मतघोटाळ्याच्या संदर्भात तर खुद्द जिल्हा प्रशासनानेच पोलिसांकडे तक्रार केली, गुन्हाही दाख झाला तरी अद्याप पुढे चौकशी झाली नाही. विरोधकाच्या आरोपांवर उत्तरच सरकारकडून मिळाले नाही.

मागच्या आठवड्यात नागपुरात मुख्यमंत्र्यांचे माध्यम प्रतिनिधींसोबत दिवाळी स्नेहमिलन झाले. त्यात मतदार यादीतील घोटाळ्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी नेहमी प्रमाणे त्यांनी मुळ मुद्याला बगल देत यादीतील दुबार नोंदणीवर भाष्य केले. यादी दुरूस्त व्हायला हवी या मताचा मी स्वतः आहे. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, याकडे लक्ष वेधले. एकूणच मुख्यमंत्र्यांचा बोलण्याचा रोख यादीत घोळ कसा दूर करता येईल यापेक्षा त्यावर बोट ठेवणाऱ्या विरोधकांवर टीका करण्यावर अधिक होता. वास्तविक मतदार यादीतील घोळ विरोधकांनी सप्रमाण दाखवून दिले. पण त्यावर बोलणे टाळले. दुबार नोंदणी कशी होते हेच त्यांनी सांगितले.आता तर विरोधकांच्या आंदोलनाला ‘कव्हर फायरिंग’ म्हणत या प्रश्नाची फ्रेम बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते. एक नोव्हेंबरचा मोर्चा म्हणजे विरोधकांचे कव्हर फायरिंग आहे , पराभवाची भीती वाटत असल्याने केलेली आगाऊ बचावात्मक कारवाई, होय..फडणवीस यांचे विधान हे “रक्षणात्मक संवाद धोरणाचा एक भाग मानला जातो. “घोळ नाही” असं थेट न म्हणता, विरोधकांवर टीका करून स्वतःची बाजू मजबूत ठेवण्याचा प्रयत्न.असल्याचे दिसून येते.

विरोधकांची प्रत्युत्तर रणनीती

मतदार यादीतील घोटाळे सरकारपुढे मांडणे हे जर सरकारला कव्हर फायरिंग वाटत असेल, तर मग सरकारचं वक्तव्य हे क्रॉस फायरिंग ठरतं. सत्ताधारीही स्वतःचे पाप लपवण्यासाठी “कव्हर फायरिंग” करत आहेत.अशी प्रतिक्रिया अशी प्रतिक्रिया शहर काँग्रेसचे प्रवक्ते अभिजित झा यांनी दिली. विरोधकांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जात नाही, कारण विधानसभा निवडणुकीच्या वेळी अचानक मतदार कसे वाढले हे उघड होईल, ते होऊ नये म्हणूनच सरकारकडून आयोगाची बाजू घेतली जाते. असे करणे सुद्धा कव्हर फायरिंगच ठरते असे झा म्हणाले.

एकूणच मतदार यादीतील घोळ प्रकरणात सध्या दोन्ही बाजूंनी भाषिक ‘युद्ध’ सुरू आहे.सत्ताधारी पक्ष “कव्हर फायरिंग” करून प्रतिमानिर्मिती करत आहे. तर विरोधक “क्रॉस फायरिंग” करून प्रतिउत्तर देत आहेत. परिणामी, मुख्य प्रश्नदुय्यम ठरतो आहे.