गोंदिया : जिल्ह्यातील अनुसूचित जमातीकरिता राखीव आमगाव-देवरी मतदारसंघात एकूण ९ उमेदवार रिंगणात असले तरी महायुतीकडून माजी आमदार संजय पुराम विरुद्ध महाविकास आघाडीकडून गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांच्यात थेट लढत आहे.

भाजपने अंतर्गत विरोधाला न जुमानता तिसऱ्यांदा संजय पुराम यांना उमेदवारी दिली. यामुळे सालेकसाचे आदिवासी नेते शंकर मडावी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतली. मडावी यांना सालेकसा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. एवढेच नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे कार्यकर्तेदेखील संजय पुराम यांच्या विरोधात आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या निर्देशावरून माजी आमदार राजेंद्र जैन यांनी कार्यकर्त्यांवर भाजप उमेदवारालाच मतदान करण्याचा दबाव टाकला. मात्र, बड्या नेत्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी भाजपशी युती केली. त्यामुळे आम्ही भाजपच्या विरोधातच आहोत, असे राष्ट्रवादीतील नाराजांचे म्हणणे आहे. त्यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार मडावी यांच्याकडे मोर्चा वळवला तरच येथे तिरंगी लढत होऊ शकते. मात्र, राष्ट्रवादी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ही नाराजी दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत.

आणखी वाचा-मेळघाटात दोन माजी आमदारपुत्रांमध्‍ये पुन्‍हा लढाई

दुसरीकडे, विद्यमान आमदार सहेसराम कोरेटी यांच्याबद्दलची नाराजी आणि खासदार नामदेवराव किरसान यांचा विरोध पाहता महाविकास आघाडीने राजकुमार पुराम यांना काँग्रेसचे तिकीट देऊन रिंगणात उतरवले. यामुळे कोरेटी समर्थक नाराज आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झालेला निसटता पराभव संजय पुराम यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे ते मागील ५ वर्षे मतदारसंघात सातत्याने काम करत राहिले. त्यांची पत्नी गोंदिया जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापती आहे. याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे.

नुकतेच सेवानिवृत्त झालेले काँग्रेसचे उमेदवार राजकुमार पुराम यांच्या वर्तनातून त्यांचा अधिकारीबाणा अद्याप गेलेला नाही, असे दिसून येते. निवडणूक प्रचारात वृद्ध किंवा ज्येष्ठांना वाकून नमस्कार करावा लागतो, हे त्यांना अद्यापही कळलेलेच नाही, असे त्यांचेच सहकारी सांगतात. आमगाव, देवरी आणि सालेकसा या तीन तालुक्यांतील मतदारांसाठी ते नवीन असल्यामुळे त्यांची ओळख करून द्यावी लागते. भाजपच्या पहिल्याच यादीत नाव घोषित झाल्यामुळे संजय पुराम यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे, तर राजकुमार पुराम यांच्या उमेदवारीच्या घोषणेला विलंब झाल्याने ते अद्याप प्रचारात मागे पडल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा-ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार यांच्यासाठी सोपी लढत!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांना भाजपचे बंडखोर शंकर मडावी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजकुमार पुराम यांना विद्यमान आमदार सहेसराम कोरेटी यांची नाराजी तसेच काँग्रेसचे बंडखोर विलास चाकाटे यांच्याकडून किती मतांचा फटका बसतो, यावर येथील निकाल अवलंबून राहणार आहे.