वर्धा : जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत एकूण सरासरी ६९. २९ टक्के मतदानाची नोंद झाली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हाच आकडा ६४.८५ असा होता. जवळपास पाच टक्क्यांनी मतदानात वाढ झाल्याची ही तुलनात्मक आकडेवारी सांगते. अधिकचे मतदान कोणासाठी लाभदायी, याची चर्चा सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील वर्धा मतदारसंघात ६५. ६८ टक्के, देवळी ६८. ९६, आर्वी ७१.८६ व हिंगणघाट मतदारसंघात ७०.८७ टक्के मतदान झाले. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपेक्षा हा आकडा विक्रमी ठरतो. २०१४ मध्ये ६६.७७ व २०१९ मध्ये ६२.३५ टक्के मतदान झाले होते. तिसऱ्या फेरीपर्यंत ४५ ते ५० टक्क्यापर्यंतच मतदान झाले होते. शेवटच्या एका तासात ५ ते १० टक्क्यांनी मतदान वाढले. महिला मतदारांनी पुरुषांच्या बरोबरीने मतदान केल्याचे आकडेवारी सांगते. सर्वाधिक चर्चेत असलेल्या आर्वी मतदारसंघात सुरुवातीस संथ मतदान होत असल्याचे चित्र होते. मात्र दुपारनंतर चांगलाच वेग आला. जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद आर्वीत झाली. येथे ९९ हजार ८२१ पुरुष व ९० हजार ९१० महिलांनी मतदान केले. देवळी पुरुष ९८ हजार ८४९ व स्त्री मतदार ९० हजार ५१४, हिंगणघाट १ लाख ११ हजार ४१६ व स्त्री मतदार ९९ हजार ४५८, वर्धा पुरुष ९९ हजार २४० व स्त्री मतदार ९४ हजार ३३७, ही आकडेवारी सर्वांना थक्क करणारी ठरत आहे.

आणखी वाचा-वाढलेले मतदान कुणाच्‍या खात्‍यात? महायुती आणि महाविकास आघाडीमध्‍ये हुरहूर

वाढलेले मतदान प्रामुख्याने युवा मतदारांचे आहे, असे बोलले जाते. हा युवा मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने की महायुतीच्या, याबाबत विविध तर्क लावले जात आहेत. महिलांचे मतदान वाढल्याने टक्केवारीत वाढ झाली. ‘लाडकी बहीण’ योजनेचा हा परिणाम असू शकतो, असा काहींचा अंदाज आहे. एकूणच, विक्रमी मतदानामुळे वर्धा जिल्ह्यातील उमेदवारांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदारसंघनिहाय मतदान

आर्वी : पुरुष -७४. ७१%, महिला – ६८. ९६%
देवळी : पुरुष -७१. ३५% महिला – ६६. ५२%
हिंगणघाट : पुरुष -७३. ५२%, महिला – ६८. ११%
वर्धा : पुरुष -६७. ३२%, महिला – ६४. ०३%