कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी ७० टक्कयांपेक्षाही पुढे गेली. हसन मुश्रीफ, विश्वजीत कदम यासारखे नेते असलेल्या मतदारसंघांत ती ८० टक्क्यांपर्यंत गेली. या वाढीव मतदानाची कारणे प्रत्येकजण आपापल्या परीने देत असला तरी, मराठा आंदोलनाचा प्रभाव, ऊस, दूध दर प्रश्न, शक्तीपीठ महामार्ग, आक्रमक हिंदुत्वाची मांडणी, त्याला संविधानाचे प्रत्युतर आणि मतदानापूर्वी पैसेवाटपाचे प्रकार यांचा मतदारांवर प्रभाव पडला असण्याची शक्यता आहे.

यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असल्याने मराठा समाजातील तरुणांमध्ये एक सुप्त राग होता. तो मतदानातून व्यक्त होताना दिसून आला. ही बाब सत्ताधाऱ्यांना अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जहाल हिंदुत्वाची भाषा केल्याने हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाल्याचे प्राथमिक चित्र आहे.

हेही वाचा : काँग्रेसकडून आमदारांसाठी विशेष विमान, दगाफटका होऊ नये म्हणून आधीच खबरदारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम महाराष्ट्रात ऊस, दूध हे शेती – शेतीपूरक व्यवसाय आहेत. त्याला कोल्हापूर भागात मिळणारा चांगला दर आणि दुसरा भागात मिळणारा कमी दर यातून शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली होती. शक्तीपीठ महामार्गामुळे या भागातील सुपीक जमिनीवर नांगर फिरवला जाणार असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये होती.

शासनाच्या लाडकी बहीण योजनेतून घरोघरी गृहिणींच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा झाले. परिणामी महिला वर्गांमध्ये महायुती विषयीची सहानुभूतीचा परतावा मतदानातून केला का, हा औत्सुक्याचा मुद्दा आहे.