सांगली : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल केलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाच संचालकापैकी एक संचालक विजयी झाले असून अध्यक्ष, उपाध्यक्षासह अन्य चार संचालक पराभूत झाले. तर संंचालक अमोल बाबर यांचे बंधू सुहास बाबर हे विजयी झाले.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पैकी बहुसंख्य मातब्बरांचे जिल्हा बँकेशी नाते असल्याचे दिसून येते. जिल्हा बँकेंच्या आजी-माजी संचालकांना आमदार होण्याचे कायम वेध लागलेले असतात. यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये काही आजी, माजी संचालकांनी उमेदवारी दाखल केली होती. यामध्ये बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी शिराळा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने उमेदवारी दाखल केली होती. मात्र जिल्हा बँकेत त्यांच्याच पॅनेलमधून विजयी झालेले सत्यजित देशमुख यांनी त्यांचा पराभव करत आमदारकी पटकावली.

हे ही वाचा… महायुतीत जल्लोष, महाविकास आघाडी चिंताग्रस्त; बुलढाणा जिल्ह्यातील चित्र

सांगली विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच्यावतीने मैदानात उतरलेले पृथ्वीराज पाटील संचालक आणि अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील या उपाध्यक्ष आहेत. या दोघांचाही विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी पराभव केला. तर पलूस-कडेगाव मतदार संघात भाजपचे उमेदवार असलेले संग्रामसिंह देशमुख हे बँकेचे विद्यमान संचालक आहेत. संचालक मंडळाच्या मागील कार्यकालात ते बँकेचे उपाध्यक्ष होते. यावेळी काँग्रेसचे विश्‍वजित कदम यांच्याकडून पराभूत झाले.

खानापूर मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाकडून विजयी झालेले सुहास बाबर यांचे बंधू अमोल बाबर हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. माजी आमदार अनिल बाबर यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांची संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हे ही वाचा… Manoj Jarange Patil : मनोज जरांगे फॅक्टर का फ्लॉप ठरला? मराठवाड्यात महायुतीला ४६ पैकी तब्बल ‘एवढ्या’ जागावर मिळालं यश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी खासदार संजयकाका पाटील यांचा तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे रोहित पाटील यांच्याकडून पराभव झाला. संचालक मंडळाच्या मागील कार्यकालात ते बँकेचे संचालक होते. तर रोहित पाटील यांचे चुलते सुरेश पाटील हे विद्यमान संचालक आहेत. खानापूर मतदार संघातून पराभूत झालेले अपक्ष राजेंद्रअण्णा देशमुख यांनी जिल्हा बँकेची निवडणूक सोसायटी गटातून लढवली होती. शिवसेनेचे तानाजी पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यांचे बंधू अमरसिंह देशमुख हे बँकेचे माजी संचालक आहेत. पलूस-कडेगाव मतदार संघातून विजयी झालेले काँग्रेसचे डॉ. विश्‍वजित कदम यांचे चुलते माजी आमदार मोहनराव कदम आणि मेव्हणे महेेद्र लाड हे विद्यमान संचालक आहेत.
जिल्हा बँकेच्या कारभारात एकत्र असलेले संचालक विधानसभा निवडणुकीत मात्र परस्पर विरोधात आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारीवर रिंगणात उतरले होते. सांगलीचे खासदार विशाल पाटील हेही जिल्हा बँकेचे संचालक आहेत. तर अन्य काही इच्छुकांना राजकीय पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने आमदारकीच्या मैदानापासून दूर राहावे लागले. यामध्ये विद्यमान संचालक बाळासाहेब होनमोरे, राहूल महाडिक यांचे बंधू सम्राट महाडिक यांचा समावेश आहे.