मंगळवारी (१९ डिसेंबर) दिल्लीमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीत जागावाटप, तसेच पंतप्रधानपदाच्या उमेदवारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा, तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील या बैठकीत हजर राहण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा करू नये. निवडणुका झाल्यानंतर सकारात्मक निकाल आल्यास नेतानिवडीवर चर्चा करावी, असे त्या म्हणाल्या आहेत.
निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचा नेता ठरवावा : ममता बॅनर्जी
“जेव्हा अनेक पक्ष एकत्र आलेले असतात तेव्हा तेथे लोकशाही पद्धतीनं काम चालतं. आमच्या आघाडीत वेगवेगळ्या राज्यांतील वेगवेगळे पक्ष आहेत. या पक्षांची वेगवेगळी विचारधारा आहे; परंतु इंडिया आघाडी हा एक असा मंच आहे, जिथे आम्ही सर्व जण एकत्र लढत आहोत. भाजपाला सध्या कोणीही मित्रपक्ष नाही. आता एनडीए नामशेष झाली आहे. सध्या फक्त भाजपा आहे. आम्ही मात्र भाजपाप्रमाणे नाही. आमच्या आघाडीत वेगवेगळे पक्ष आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतरच नेता कोण असावा, यावर निर्णय व्हायला हवा, असं मला वाटतं. निकाल काय लागतो हे पाहून सर्व पक्षांनी काय ते ठरवावं,” अशी भूमिका ममता बॅनर्जी यांनी मांडली. सध्या भारतामातेला वाचवणं हाच इंडिया आघाडीतील पक्षांचा प्रमुख हेतू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशात माध्यमांची गळचेपी होतेय : ममता बॅनर्जी
“सध्या जे काही सुरू आहे, ती टोकाची एकाधिकारशाही आहे. हे कोणालाही नको आहे. माध्यमांच्या लोकांनादेखील बोलण्याची मुभा नाहीये. पक्षाच्या कार्यालयातून रोज सकाळी या विषयावर बोला आणि या विषयावर बोलू नका, असे सांगितले जात आहे. माध्यमांमध्ये विरोधकांना स्थान नाही. लोकशाही देशात न्यायपालिका, जनता व माध्यमे या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. सध्या माध्यमांकडे कोणतीही शक्ती राहिलेली नाही. मला पत्रकारांचा अनादर करायचा नाही. मात्र माध्यमांच्या मालकांना धमकावले जात आहे,” असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.
“… तेव्हा मतदारदेखील एकत्र येतील”
भाजपाला विरोध करणाऱ्या मतदारांची मते विरोधकांच्या इंडिया आघाडीला मिळतील का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना “इंडिया आघाडीतील नेते जेव्हा एकत्र आलेले दिसतील, तेव्हा मतदारदेखील एकत्र येतील,” असे त्या म्हणाल्या. तसेच मंगळवारच्या बैठकीत जागावाटपाचे सूत्र ठरेल का, असे विचारल्यावर “जागावाटपाचे सूत्र ठरवणे हे म्हणावे तेवढे सोपे नाही. धोरणात्मक निर्णय घेतल्यावर या सर्व गोष्टी सोप्या होतील,” असेही बॅनर्जी म्हणाल्या. इंडिया आघाडीत जागावाटपाला बराच उशीर झालेला आहे. याच कारणामुळे तृणमूल काँग्रेस हा पक्ष नाराज असल्याचे म्हटले जात होते. त्यावरही बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली. जागावाटपाला उशीर झाला का, असे विचारले असता, खूप उशीर झालेला नाही. काहीही न करण्यापेक्षा उशीर झालेला ठीक आहे, असे त्या म्हणाल्या.
“माझ्यात कोणतीही सूडभावना नाही”
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांकडून तृणमूल काँग्रेसला विरोध केला जातो. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या तिन्ही पक्षांत युती होणार का? असे बॅनर्जी यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना “कोणाशी युती करायची असेल, तर त्यासाठी अगोदर मानसिक तयारी असायला हवी. त्यानंतर मग युती होऊ शकते. एक किंवा दोन पक्ष एकत्र येण्यास नकार देऊ शकतात. मात्र, आघाडीतील अनेक पक्षांनी एकत्र येण्याची तयारी दर्शवल्यास आम्हीदेखील आपोआपच एकत्र येऊ. माझी कोणाबाबत काहीही तक्रार नाही. डावे पक्ष भाजपासोबत काम करतात म्हणून माझे त्यांच्याशी फक्त वैचारिक मतभेद आहेत. माझ्यात कोणतीही सूडभावना नाही. मी कोणासोबतही काम करू शकते,” असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
“निवडणुका व्हीव्हीपॅटच्या मदतीने घ्याव्यात”
नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेससह इतर पक्षांनी व्हीव्हीपॅटच्या मदतीनं निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली होती. त्यावरही ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली. ईव्हीएमबाबतच्या तक्रारी १०० टक्के खऱ्या आहेत. सर्व निवडणुका या व्हीव्हीपॅटच्या मदतीनं घ्याव्यात, अशी आमचीही मागणी आहे. त्यासाठीची संपूर्ण व्यवस्था उपलब्ध आहे. असे असताना देशात व्हीव्हीपॅटच्या मदतीने निवडणुका का घेतल्या जात नाहीत, असा प्रश्नही त्यांनी केला.
“… तर मी समजून घेतलं असतं”
हिवाळी अधिवेशनात एकूण ७८ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यावरही ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “लोकसभेतून ४६ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. सताब्दी रॉयसारख्या महिला प्रतिनिधीला निलंबित करण्यात आलं आहे. सताब्दी राय सारख्या वरिष्ठ खासदाराला कसं निलंबित केलं जाऊ शकतं. संसदेत प्रत्येकाला निलंबित केलं जातंय. एक किंवा दोन खासदारांना निलंबित केलं असतं, तर मी समजून घेतलं असतं. मात्र, प्रत्येकालाच निलंबित कसं केलं जाऊ शकतं,” असा सवाल त्यांनी केला.