छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टी बाधितांचे नुकसान किती झाले आणि राज्य सरकारने मागितलेली मदत रक्कम योग्य आहे का, याची खातरजमा करण्यासाठी केंद्रीय पथक मराठवाड्यात येणार आहे. त्याच काळात शिवसेनेचे उद्धव ठाकरे हेही मराठवाड्यात दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दौऱ्याबरोबरच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान हेही बीड जिल्ह्यातील शिरसाळा येथे शेतकऱ्यांच्या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. ७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या मेळाव्यास २५ हजारांची उपस्थिती असेल, असा दावा केला जात आहे. शेतकरी केंद्रस्थानी येत असल्याचे उपक्रम वाढले असल्याचे चित्र दिसत असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूकही जाहीर झाली आहे.
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक बुधवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहे. झालेले नुकसान आणि राज्य सरकारने मागितलेली मदत यात काही विरोधाभास नाही ना, याची तपासणी केंद्रीय पथकाकडून होईल असे सांगण्यात येते. दरम्यान याच काळात शिवसेनेचे उद्धव ठाकरे हेही शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. ‘ दगा बाज रे’ असे घोषवाक्य देऊन ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढविण्याची तयारी सुरू केलेली असताना परळी तालुक्यातील शिरसाळा येथे शेतकरी मेळावा घेण्याचे नियोजन मयंक गांधी संस्थापक असणाऱ्या ग्लोबल विकास ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या मेळाव्यास केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे ही मंडळी उपस्थित राहणार आहेत.
एका बाजूला दौरे आणि कार्यक्रमाची रेलचेल असताना निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकाची घोषणा मंगळवारी झाली आहे. त्यामुळे हे सर्व उपक्रम राजकीय चष्म्यातून पाहिले जात आहेत. त्यामुळेच उठा उठा निवडणूक आली शेतकरी कळवळ्याची वेळ आली, असे म्हटले जाऊ लागली आहे.
उद्धव ठाकरे यांनी या पूर्वीही एकदा मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत कर्जमाफीसाठी सरकारला भाग पाडू असे म्हटले होते. मात्र, विरोधी पक्षांकडून मागणीचे आवाज वाढण्यापूर्वी बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने या प्रश्नावर समिती नियुक्त केली आहे. डाव – प्रतिडावात शेतकरी केंद्रस्थानी येत असल्याचे दिसून येत आहे. सततच्या दुष्काळानंतर अतिवृष्टीच्या चक्रात अडकलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सर्वपक्षीय घाई सुरू झाली आहे. या सगळ्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना वाटप होणारी मदत मात्र ‘ केवायसी’ च्या चक्रात अडकलेली आहे.
