हिमालच प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूकही होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी क्राँस व्होटिंग केल्याने विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र घोषित केले होते. त्यामुळे या सहा जागा रिक्त झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे या सहा जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले; तर हिमाचलमध्ये मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू यांचे सरकारही धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यावरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

नुकताच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यामुळे संख्या असतानाही काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे सहा आमदार व तीन अपक्ष अशा नऊ जणांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याने हर्ष महाजन विजयी झाले. दरम्यान, २९ फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र ठरविले होते.

हेही वाचा – बलात्कार प्रकरणातील आरोपीची पाठराखण करणारा ‘हा’ भाजपाचा नेता काँग्रेसमध्ये; कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास

२०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ६८ पैकी ४० जागा जिंकल्या होत्या; तर भाजपाला केवळ २५ जागा जिंकता आल्या होत्या. अशात आता सहा आमदारांच्या अपात्रतेनंतर काँग्रेसकडे केवळ ३४ आमदार बाकी आहेl. तसेच आगामी पोटनिवडणुकीतील सहा जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले; तर भाजपाकडे एकूण ३१ आमदार होतील. अपक्ष आमदारांनी यापूर्वी भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सुखविंदर सिंह सुख्खू यांचे सरकार धोक्यात येण्याची शक्यता आहे.

काँग्रेससाठी आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे क्रॉस व्होटिंग प्रकरणानंतर काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यापैकी एका गटाचा सुखविंदर सिंह सुख्खू यांना पाठिंबा आहे; तर दुसऱ्या गटाचा प्रतिभा सिंह यांना पाठिंबा आहे. प्रतिभा सिंह या काँग्रेसचे दिवंगत नेते वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आहेत. तसेच काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांनी गेल्या महिन्यात राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देत उघडपणे बंडखोर नेत्यांना साथ दिली आहे.

बुधवारी माध्यमांशी बोलताना, प्रतिभा सिंह यांनी, पक्षाने उमेदवारी दिली, तरी प्रतिकूल परिस्थितीमुळे लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे म्हटले आहे. २०१९ मध्ये हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाने जिंकल्या होत्या; तर २०२१ मध्ये मंडीची जागा रिक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागू झाली होती. या निवडणुकीत प्रतिभा सिंह यांनी विजय मिळविला होता. अशात प्रतिभा सिंह यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने काँग्रेस हायकमांडसाठी हा धक्का मानला जात आहे. तसेच हिमाचल प्रदेशातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा – समजावादी पक्ष आणि अपना दलमध्ये जागावाटपावरून मतभेद; इंडिया आघाडीवर परिणाम होणार?

या सहा जागांसाठी अद्याप कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले नसल्याने भाजपा बंडखोर नेत्यांना तिकीट देणार का, हे अद्याप अस्पष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे पक्षातील बंडखोरीमुळे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू यांना त्यांच्याच हमीरपूर जिल्ह्यात संघर्षाचा सामना करावा लागतो आहे. कारण- अपात्र ठरविण्यात आलेले सहापैकी पाच आमदार हमीरपूर लोकसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे स्वत:च्या जिल्ह्यातील आमदारांना सांभाळण्यात सुखविंदर सिंह सुख्खू अपयशी ठरल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या सर्व जागा आणि विधानसभेच्या सहा जागा जिंकण्याचा विश्वास भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात भाजपा नेते जयराम ठाकूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. आगामी निवडणुकीत भाजपा हिमाचलमधील लोकसभेच्या सर्व आणि विधानसभेच्या सहाही जागा जिंकेल. तसेच हिमालच प्रदेशात सरकारही स्थापन करील, असे ते म्हणाले. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू यांनीही आगामी निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आगामी निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. ही निवडणूक आम्हीच जिंकू, कोणी कितीही खोटं बोललं तरी शेवटी सत्य आणि प्रामाणिकपणाचा विजय होतो, असे ते बिलासपूरमधील सभेत म्हणाले.