नवी मुंबई : भाजपच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदावर आपल्या समर्थकाची निवड करुन पहिल्या डावात सरशी मिळविलेल्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे नवी मुंबईतील पक्ष संघटनेवरही पकड मिळविण्यात यशस्वी ठरल्याचे चित्र आता पुढे येऊ लागले आहे. भाजपची नवी मुंबई कार्यकारणीची घोषणा दोन दिवसांपुर्वी करण्यात आली. या कार्यकारणीत म्हात्रे यांच्या बेलापूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची मोक्याच्या जागांवर वर्णी लागली असून वन मंत्री गणेश नाईक यांच्या कडव्या समर्थकांना निमंत्रितांच्या यादीत ढकलण्यात आले आहे. नाईक यांना मंत्रीमंडळात स्थान दिल्याने त्यांचे ठाणे जिल्ह्यातील महत्व पक्षाने आबाधित ठेवले होते. शहरातील पक्षाच्या कार्यकारणीत मात्र आमदार म्हात्रे यांना झुकते माप देत पक्षाने नवी मुंबईत सत्तेचा लोलक नाईकांच्या दिशेने झुकणार नाही याची पद्धतशीर काळजी घेतल्याचे पहायला मिळत आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना भाजपची नवी मुंबई कार्यकारणी जाहीर झाली आहे. गणेश नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात (शरद पवार) प्रवेश केल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद बराच काळ रिक्त होते. या पदासाठी यापुर्वी गणेश नाईक यांचे पुतणे आणि माजी महापौर सागर नाईक शर्यतीत होते. या शर्यतीत बाजी मारत आमदार मंदा म्हात्रे यांनी शिरवणे गावातील पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी डाॅ.राजेश पाटील यांची या पदावर नियुक्ती करण्यात यश मिळविले. डाॅ.पाटील हे मुळचे शिवसैनिक. मध्यंतरीच्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते आमदार म्हात्रे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. डाॅ.पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरही बराच काळ पक्षाची कार्यकारणी ठरली नव्हती. दरम्यानच्या काळात गणेश नाईक यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले. रविंद्र चव्हाण यांच्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे, पालघर जिल्ह्यात नाईकांच्या रुपाने पक्षाकडे एकमेव मंत्रीपद आहे. असे असले तरी नाईकांचा बालेकिल्ला असणाऱ्या नवी मुंबईत मात्र पक्ष संघटनेवर त्यांची पुर्ण पकड रहाणार नाही अशाच पद्धतीची कार्यकारणी दोन दिवसांपुर्वी जाहीर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बेलापूरला झुकते माप, ऐरोलीला दुयय्म स्थान
नवी मुंबई विमानतळाच्या उद्धाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत होते, त्याच दिवशी डाॅ.राजेश पाटील यांनी पक्षाची कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारणीत चार महामंत्री, आठ उपाध्यक्ष, आठ सचिव आणि एक खजिनदार यांच्यासह ७० कार्यकारिणी सदस्य, युवा, महिला. ओबीसी आणि अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. तर १११ विशेष निमंत्रितांची यादी जाहीर केली आहे. या कार्यकारणीत वन मंत्री गणेश नाईक यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बहुसंख्य माजी पदाधिकाऱ्यांची रवानगी निमंत्रितांच्या यादीत करण्यात आली आहे. माजी जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांची देखील विशेष निमंत्रितांच्या यादीत पाठवणी करण्यात आली आहे. चार महामंत्री पैकी ऐरोली मंडळातून अनंत सुतार एकमेव महामंत्री आहेत. मंदा म्हात्रे यांचे सुपूत्र नीलेश म्हात्रे, त्यांचे निकटवर्तीय दत्ता घंगाळे आणि कविता कटकधोंड या बेलापुर मतदार संघातील तिघांची या महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली अहो. आठ सचिवांपैकी सायली शिंदे या कोपरखैरणे मंडळातून एकमेव असून डॉक्टर प्रताप मुदलियार, पांडुरंग आमले, दीपक पवार, शार्दुल कौशिक, सुहासिनी नायडू, निलम बलवईकर, मालती सोनी हे सचिव अनुक्रमे नेरूळ पूर्व, सानपाडा, सिवूड, जुहू-बोनकोडे, नेरूळ पश्चिम, जुईनगर-सानपाडा आणि वाशी या मंडळातून घेण्यात आले आहेत. नेरूळ पूर्व मंडळातील जयश्री चित्रे यांची खजिनदार पदी वर्णी लागली आहे. यापैकी बहुसंख्य पदाधिकारी हे आमदार म्हात्रे यांच्या मर्जीतील आहेत. याविषयी भाजपचे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त महामंत्री अनंत सुतार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी आताच बोलणे योग्य होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई भाजपची कार्यकारणी जाहीर होत असताना कोणत्याही गटातटाचे राजकारण झालेले नाही. नवी मुंबई महापालिकेची निवडणुक सामोरे असताना एकदिलाने आणि एकमुखाने या निवडणुकांमध्ये विजय मिळवायचा असा आम्हा सर्वांचा निर्धार आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. अंतर्गत स्पर्धा आणि गटातटाच्या राजकारणाचा आम्ही स्वप्नातही विचार करत नाही.-निलेश म्हात्रे, महामंत्री नवी मुंबई भाजप