महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित राज ठाकरे यांच्या महासंपर्क अभियान दौऱ्यातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांना साेडवण्यासाेबतच मुलींच्या छेडछाडीविरोधात उभे राहण्याचा संघटनेचा नवा अजेंडा असल्याचे अधोरेखित झाले. तरुणांसोबतच तरुणींनाही समान प्रतिनिधित्व संघटनेत देण्याविषयीचे सूतोवाच त्यांनी केले. यातून ठाकरे यांनी तरुणाईत आपले नेतृत्व ठसवण्याचा प्रयत्न केला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा दौरा करून अमित ठाकरे हे गुरुवारी रात्री औरंगाबादेत दाखल झाले होते. त्यांच्या स्वागताला तरुणाईची गर्दी उसळली होती. दुसऱ्या दिवशी अमित ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसोबतच महाविद्यालयीन तरुण-तरुणींशी संवादाचे एक सत्र घेतले. महाविद्यालय तेथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शाखा उघडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनात्मक बांधणीत तरुणींनाही समान प्रतिनिधित्व देण्यात येणार असल्याचे सांगून अमित ठाकरे यांनी मुलींच्या छेडछाडी विरोधात मनविसे हे सुरक्षा कवच असल्याचे ठसवले. स्वच्छतेसह इतर उपक्रम राबवण्यातून सामाजिक भान जागवण्याचाही प्रयत्न त्यांनी तरुणाईत केला. 

हेही वाचा- पक्षांतर्गत कोंडीमुळे अवधूत तटकरे यांनी शिवबंधन तोडले….

विद्यार्थ्यांच्या प्रश्नासोबत मनसेने अलिकडे स्वीकारलेल्या कडव्या हिंदुत्वाच्या विचारांची ठाकरे यांनी तरुणाईपुढे मांडणी केली. प्रार्थनास्थळावरील भोंगे हटवणे ही पक्षाची भूमिका कायम असून, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे कोणत्याही धर्माविरोधात नसल्याची भूमिकाही अमित यांनी स्पष्ट केली. 

हेही वाचा- मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत बच्चू कडू राजकीयदृष्ट्या हतबल

अमित ठाकरे हे यापूर्वी वडिलांसह अथवा पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांसोबत आलेले आहेत. परंतु एकट्याने केलेला तसा हा त्यांचा पाहिलाच दौरा मानला जातो. त्यामुळे त्यांचा दौरा चर्चेत आहे. वडिलांच्या छायेत कायम वावरणारे अमित यांचे व्यक्तिमत्व स्वतंत्रपणे आणि आत्मविश्वासपूर्वक संवाद साधताना महासंपर्क दौऱ्यात तरुणाईला दिसून आले.

हेही वाचा- विश्लेषण : उद्धव ठाकरेंसाठी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक आव्हानात्मक कशी ठरणार?

मनविसेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी त्यांच्या महासंपर्क अभियान दाैऱ्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी त्यांच्या प्रश्नांवर स्वतंत्रपणे संवाद साधला. महाविद्यालयीन मुलींना सुरक्षित वातावरण देण्याला संघटनेचे प्राधान्य असल्याचे सांगितले, असे मनविसेचे जिल्हाध्यक्ष संकेत शेटे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mnvs new agenda against harassment of college girls print politics news dpj
First published on: 15-10-2022 at 17:33 IST