राजेशवर ठाकरे

नागपूर : राहुल गांधी यांची बहुचर्चिच ‘भारत जोडो’ यात्रा १५ नोव्हेंबरला विदर्भात (वाशीम जिल्हा) दाखल होत असून यात्रा यशस्वी व्हावी काँग्रेसची पक्षपातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. या निमित्ताने गेले अनेक वर्ष दिल्लीच्या राजकारणात रमलेले खासदार मुकुल वासनिक गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला भेट देत या भागातून जास्तीत जास्त कार्यकर्ते यात्रेत सहभागी कसे होतील यादृष्टीने प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा… राहुल गांधी कळमनुरीच्या मुक्कामात राजीव सातव यांच्या समाधीस्थळास भेट देणार

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारीपासून सुरुवात झाली. ती महाराष्ट्रात देगलूर येथे ७ नोव्हेंबरला दाखल होत आहे. तेथून यात्रा विदर्भातील वाशिम आणि अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यात जाणार आहे. १५ नोव्हेंबरला दुपारी साडेतीन वाजता यात्रेचे विदर्भात वाशिम जिल्ह्यातील अजंनगाव, बोरला फाटा येथे आगमन होईल. यात्रेच्या प्रत्येक ठिकाणांवर कोणत्या जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी होतील याचे काँग्रेसने नियोजन केले आहे. त्यानुसार बोरला फाटा येथे चंद्रपूर शहर आणि ग्रामीणचे तर बाळापूर येथे गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या दोन्ही जिल्ह्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते, नेते यात्रेत सहभागी व्हावे याची जबाबदारी खासदार मुकुल वासनिक यांच्यावर सोपवण्यात आली आहे.त्यासाठी वासनिक यांची सध्या पायपीट सुरू आहे. सोमवारी वासनिक यांनी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला. चंद्रपुरातून एक ते दीड हजार आणि गडचिरोलीतून एक हजारावर कार्यकर्ते यात्रेकरिता नेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी बसगाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

हेही वाचा… सचिन कल्याणशेट्टी : समाजकारण आणि राजकारणाची हुकमी गोळाबेरीज

भारत जोडो यात्रे प्रमाणेच मुकुल वासनिक यांचा दौराही सध्या काँग्रेसजणांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. त्याला कारण ठरले ते त्यांचा विदर्भाशी तुटलेला संपर्क. वासनिक हे नेहमी दिल्लीत सक्रिय असतात. स्थानिक पातळीवर ते लक्ष घालत नाही. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने का होईना ते गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत, त्यांच्याशी चर्चा करीत आहे. यावरून काँग्रेसने ही यात्रा किती गांभीर्याने घेतली हे स्पष्ट होते.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात्रेच्या प्रारंभी काँग्रेसला फार प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. परंतु जसजशी यात्रे पुढे सरकत आहे. तसा यात्रेला युवकांकडून प्रतिसाद वाढत आहे. यामुळे काँग्रेसच्या यात्रेकडून अपेक्षा उंचावल्या असून त्यात जास्तीत जास्त लोकांचा, कार्यकर्त्यांचा सहभाग वाढावा या हेतूने काँग्रेस नेते कामाला लागल्याचे सध्याचे चित्र आहे.