Mumbai High Court On Manoj Jarange Patil Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, यासह विविध मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं आहे. शुक्रवार २९ ऑगस्टपासून जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आज (सोमवार) त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतणार नाही, असा निर्धारच त्यांनी केला आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील असंख्य मराठे मुंबईत दाखल झाले आहेत. सध्या मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात फक्त मराठ्यांचंच भगवं वादळ दिसून येत आहे. दरम्यान- मराठा आंदोलन प्रकरणी सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाने जरांगे पाटील यांना उद्या दुपारपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? असा प्रश्न मराठ्यांना पडला आहे.
मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठे आझाद मैदानावर जमा झाले आहेत. दिवसभर जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायचा आणि रात्री निवाऱ्यासाठी रेल्वे स्थानक गाठायचं, अशीच योजना सध्या मराठ्यांनी आखली आहे. आंदोलनाला अनेक दिवस लागतील, हे गृहीत धरूनच मराठ्यांनी गावाकडून येताना सोबत कोरडा शिधा आणलेला आहे. तर काहीजण ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर तसेच इतर वाहनांमध्ये स्टोव्हवर स्वयंपाक करत आहेत. याशिवाय मुंबईकरही त्यांना जेवणाचे डबे, पाणी बॉटल्स देऊन शक्य तितकी मदत करताना दिसून येत आहे.
सीएसएमटी स्थानकावर मराठे ठाण मांडून
मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलेल्या आझाद मैदानाला लागूनच ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानक’ आहे. रविवारी दिवसभर मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे अनेक मराठ्यांनी विश्रांतीसाठी रेल्वेस्थानकाचा ताबा घेतला. रात्री जागा मिळेल तिथेच मराठे झोपले होते. पोलिसांनी जरांगे यांच्या आंदोलनासाठी आझाद मैदानावर फक्त पाच हजार लोकांना परवानगी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात हजारोंच्या संख्येनं मराठे आंदोलनस्थळी दाखल झाल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. आंदोलकांची संख्या जास्त असल्याने पोलिसांनी केलेल्या फिरत्या शौचकुपांची सोयही कमी पडत आहे. त्यामुळे काहींना नैसर्गिक विधीसाठी रेल्वेस्थानकापासून, रस्त्याच्या आडोशाला आणि मैदानाच्या कडेचा आधार घ्यावा लागत आहे.

आरक्षण घेऊनच माघारी फिरणार : मराठा आंदोलक
आमच्यासमोर कितीही अडचणी उभ्या राहिल्या तरी तसूभरही मागे न हटता मुंबईतून आरक्षण घेऊनच गावी परतणार, असा निर्धारच मराठ्यांनी व्यक्त केला आहे. सोमवारी हलगीच्या तालावर रेल्वे स्थानक परिसरात मराठा आंदोलक थिरकत होते. काही आंदोलक फलाटाच्या मधोमध थांबल्याने सकाळच्या वेळेस कार्यालय गाठण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना बरीच कसरत करावी लागल्याचे चित्र होते. आंदोलनाचा चौथा दिवस असतानाही सरकारने आंदोलनाची दखल न घेतलेल्या आक्रमक मराठा आंदोलकांनी रेल्वे स्थानक परिसरात चक्क सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा काढली.

मुंबईत मराठ्यांचा कबड्डी आणि क्रिकेटचा खेळ
एकीकडे सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा काढली जात असताना दुसरीकडे मात्र काही आंदोलक सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर कबड्डी आणि क्रिकेट खेळताना दिसले. त्याचवेळी काही आंदोलक तर थेट ताज हॉटेलबाहेर गोंधळ घालताना दिसून आले. पाणी द्या, पाणी द्या, आम्ही तुम्हाला पैसे देतो, असे म्हणत ते ताज हॉटेलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना डिवचत होते. सीएसएमटी स्थानक तसेच नरिमन पॉइंट परिसरातील समुद्रकिनाऱ्याजवळ पोलिसांनी मोठ्या संख्येने रस्तेरोधक लावले आहेत; पण या रस्तेरोधकाची गाडी करून अनेक मराठे त्यावर बसलेले होते. चौथ्या दिवशीही शहरात गोंधळाचे वातावरण असल्याने त्याचा फटका मात्र मुंबईकरांना बसत असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत होती.

मुंबई आमचीच आहे, फिरून घेतोय : मराठा आंदोलक
‘मुंबई आपलीच आहे, फिरून घ्या,’ असं म्हणत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांनी मुंबईत पर्यटन केलं. रविवारी आझाद मैदानावर गर्दी कमी होती. पण, शहरातील चौपाट्या, नरिमन पाईंट, मरीन ड्राइव्ह, जुहू येथील इस्कॉन मंदिर, हाजी आली दर्गा, महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, गेटवे ऑफ इंडिया आदी ठिकाणांवर मराठ्यांचे जथ्थेच्या-जथ्थे दिसून आले. हलगी आणि झांज वाजवत तसेच नाचत आंदोलकांनी मुंबई पाहण्याचा आनंद लुटला. दिवसभर फिरल्यानंतर पुन्हा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर आश्रयाला आले आणि निवांत झोपी गेले.

मुंबईत मराठ्यांच्या जेवणाची गैरसोय?
माध्यमांशी संवाद साधताना काही मराठे म्हणाले की, आमचं आंदोलन शांततेच सुरू आहे; पण सरकारने आमचे खाणे-पिणे बंद केले असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात, तसेच आझाद मैदानाजवळील कुठलीही दुकाने सुरू नाहीत. मुंबईला लागून असलेल्या आसपासच्या शहरांमधून आमच्यासाठी जेवणाची वाहने भरून येत आहेत, मात्र पोलिसांनी ती जाणीवपूर्वक अडवून ठेवली आहेत, त्यामुळे आम्ही सरकारच्या निषेधार्थ अनेक प्रकारे आंदोलन करत आहोत. सरकारने आमच्या मागणीकडे तत्काळ लक्ष द्यावे, आरक्षण द्यावे आम्ही गुलाल उधळून आपापल्या गावी जाऊ अशा प्रतिक्रियाही काही आंदोलकांनी दिल्या.

राज्यभरातून आंदोलकांना खाण्यापिण्याची रसद
मराठा आंदोलकांच्या खाण्यापिण्याची सोय करुन देण्यासाठी राज्यभरातून रसद येत आहे. भाकरी, चपाती, चटणी, लोणचे, ठेचा मुंबईबाहेरून येत असतानाच सोमवारी मराठा आंदोलकांना पेरू आणि केळी वाटपही केले जात होते. एका गावातून १० टन पेरू तर दुसऱ्या एका गावातून ३०० डझन केळी आणून त्याचे वाटप कऱण्यात आले. आपले आंदोलन सुरूच ठेवायचं आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. गावाकडील चिंता अजिबात करायची नाही, आम्ही सगळं सांभाळून घेतो. तुम्ही फक्त शांततेत आंदोलन करा आणि कुणालाही त्रास देऊ नका, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर येथून जेवणाची रसद घेऊन आलेल्या एका मराठ्यानं आंदोलकांना केलं.

जरांगे यांना उच्च न्यायालयाचा अल्टीमेटम
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी सरकारने सुरुवातीला एक दिवसांची परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतर सलग दोन दिवस (शनिवार-रविवार) त्यांना मुदतवाढ देण्यात आली. सोमवारी उच्च न्यायालयात मराठा आंदोलन प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी जरांगे पाटील यांना उच्च न्यायालयाने उद्या दुपारपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. आरक्षणाचा मागणीसाठी आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी त्यासाठी मुंबईकरांना वेठीस धरण्याचा अधिकार नाही, असं न्यायालयानं म्हटलं. “मनोज जरांगे आणि आंदोलकांनी न्यायालयाच्या आदेशाचे आणि पोलिसांनी आंदोलनासाठी दिलेल्या परवानगीचे सर्रास उल्लंघन केलं आहे. तसेच, गेल्या तीन दिवसांपासून विनापरवानगी आंदोलन केले जात असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, मुंबईकरांचे जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी जरांगे यांच्यासह आंदोलनाच्या आयोजकांना मंगळवारी दुपारी चारपर्यंत परिस्थिती सुधारावी. तसेच आझाद मैदानाचा अधिसूचित भाग वगळता सर्व रस्ते मोकळे करावे. या आदेशाचे पालन केले गेले नाही तर सरकार आंदोलकांवर कायद्यानुसार कारवाई करू शकते, असेही न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.