बदलापूर: ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी महायुतीत विसंवादाच्या घटना घडत असताना मुरबाड विधानसभा मतदारसंघातील बदलापूर शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. त्यांनी स्वतः याची माहिती आपल्या समाज माध्यम खात्यावर पोस्ट केली आहे. या भेटीनंतर अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्याविरुद्ध बंड पुकारले होते. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नसला तरी कथोरे यांच्या काही निर्णयामुळे ते अस्वस्थ आहेत. काही दिवसांपूर्वी कथोरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आता मात्र म्हात्रे यांनी थेट नार्वेकरांची भेट घेतल्याने विविध राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

मुरबाड विधानसभा मतदारसंघावर काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि इच्छुकांनी दावा केला होता. शिवसेनेचे बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुभाष पवार येथून इच्छुक होते. सुभाष पवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. तर वामन म्हात्रे यांनी अपक्ष लढण्याची संकेत दिले होते. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. याच दरम्यान विद्यमान भाजप आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेच्या एका उपशहर प्रमुखाला पक्षात प्रवेश दिल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढली होती. शहरप्रमुख वामन मात्र यांनी यावर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत स्थानिक शिवसैनिकांना वेगळा संदेश दिला होता. असे असताना स्थानिक पातळीवर मात्र शिवसेना आणि भाजपात विसंवादाचे चित्र आहे. याच दरम्यान लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचे वामन मात्रे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा >>> ठाणे-कल्याणच्या वेशीवर आगरी अस्मिता प्रभावी

म्हात्रे यांनी स्वतः आपल्या फेसबुक खात्यावरून या भेटीचे छायाचित्र आणि वर्णन विशद केले आहे. ‘दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या निमित्ताने माझे मित्र, मार्गदर्शक शिवसेना सचिव तथा विधानपरिषद सदस्य आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेत त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. नार्वेकर यांच्याबरोबर होणाऱ्या इतर भेटीप्रमाणेच आजच्या या भेटीत देखील अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. राज्यात सध्या सुरू असलेल्या अनेक राजकीय घडामोडींवर देखील दिलखुलास चर्चा झाली.’ अशी माहिती म्हात्रे यांनी फेसबुक पोस्ट करून दिली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत झालेल्या या भेटीमुळे काही वेगळी राजकीय गणिते मांडण्याचा किंवा ती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

हेही वाचा >>> नागपूरच्या देवगिरीवर फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री अडीचपर्यंत बंडखोरांची समजूत घालण्यासाठी प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिंगणात नसले तरी…

शिवसेनेचे वामन म्हात्रे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी शहरात शिवसेना वाढवणे आणि शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी म्हात्रे यांचे कायम प्रयत्न राहिले आहेत. त्यातच विधानसभेसाठी अर्ज भरण्याच्या काही दिवसांपूर्वी वामन म्हात्रे आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले पूर्वाश्रमीचे शिवसैनिक सुभाष पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. म्हात्रे आणि सुभाष पवार यांचे मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रूत आहेत. त्यामुळे या भेटीच्या माध्यमातून म्हात्रे स्थानिक शिवसैनिकांना काही संदेश देऊ पाहत आहेत का अशी ही चर्चा रंगली आहे.