नागपूर : महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा इशारा देत असले तरी सत्ताधारी भजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचा अपवाद सोडला तर दोन्ही राष्ट्रवादी व दोन्ही शिवसेनेकडे सर्व जागांवर उमेदवार देण्या इतकेही राजकीय बळ आहे का? असा सवाल केला जात आहे.

महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक घोषित झाल्यापासून सर्वपक्षीय निवडणूक मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. नागपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होत आली. कधी अपक्ष तर कधी बहुजन समाज पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेतिसरी मोठी ताकद म्हणून पुढे आली. पण सध्या तशी स्थिती नाही, बहुतांश अपक्ष भाजपकडे झुकले, बसपावर मर्यादा आल्या आणि सेना व राष्ट्रवादीत फूट पडल्याने त्यांची शक्ती विभाजित झाली. त्यामुळे भाजप व काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष सोडले तर इतर एकाही पक्षाचा शहरात सार्वत्रिक राजकीय प्रभाव नाही. मात्र निवडणुका युती वा आघाडी करून लढवाव्यात अशी चर्चा सुरू झाली आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीत सेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आहे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीत प्रतेकी सेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या दोन्ही गटाची ताकद मर्यादित स्वरुपाची आहे. तरीही ते स्वबळावर निवडणुका लढण्याची भाषा करीत आहे. महापालिकेत सध्या १५१ वॉर्डस आहेत. स्वबळावर लढायचे म्हणजे १५१ उमेदवार उभे करावे लागणार, तेवढे या पक्षांना मिळतील किंवा नाही हा प्रश्न आहे. अशीच स्थिती महाविकास आघाडीतील सेना आणि राष्ट्रवादीची आहे. दोन्ही पक्षाचे प्रत्येकी एक नगरसेवक बरखास्तमहापालिकेत होते. यावरून हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू शकतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

भाजप, काँग्रेसकडून स्वबळाचा नारा

मित्र पक्षाची मर्यादित राजकीय ताकद आणि अवास्तव जागांची मागणी लक्षात घेऊन भाजप व काँग्रेस या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षानी स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी सुरू केली आहे. ‘मित्र पक्षांनी पांघरून पाहून पाय पसरावे’ असा दम भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी महायुतीतील स्थानिक घटक पक्षाच्या नेत्यांना दिला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनीही स्वबळाची भूमिका घेतली आहे. आम्ही पाच वर्षापासून प्रयत्न करीत आहोत, त्यामुळे मित्र पक्षांसाठी जागा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इच्छुकांची संख्या अफाट

केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडे महापालिका निवडणूक लढण्यास इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा पक्ष कार्यकर्त्यांना नाराज करून मित्र पक्षासाठी जागा सोडण्यास तयार नाही, भाजपकडे महापालिकेत १५१ पैकी १०८ जागा होत्या. ४९ ठिकाणी विरोधी पक्षाचे नगरसेवक निवडून आले होते. भाजपला आता त्या जागाही लढवायच्या आहेत.काँग्रेस विरोधी पक्षात असली तरी भाजप विषयी असलेली जनमानसातील नाराजी लक्षात घेता या पक्षाकडूनही निवडणूक लढण्यासाठी चढाओढीचे चित्र आहे