नागपूर: नागपुरात सरत्या आठवड्यात राजकीय क्षेत्रात दोन मुद्दे प्रकर्षाने गाजले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने ‘ मोदींची ११ वर्ष हे अभियान प्रभावीपणे राबवणे सुरू केले तर त्याला तोडीस तोड कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीतील मत चोरीच्या आरोपाला नव्याने फोडणी देत या मुद्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले.
ज्या पध्दतीने वरील दोन्ही मुद्यांची मांडणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून केली जात आहे त्यावरून तरी हे मुद्दे आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत प्रचाराचे प्रभावी ठरणार असे दिसते.
स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका तीन वर्ष टाळणा-या महायुती सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या निवडणुका घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. या निवडणुकांची तारीख अद्याप ठरली नसली तरी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील निवडणूक आयोगाचा सरकार धर्जीणेपणा लक्षात घेतला तर या निवडणुकांची तारीख सरकारच्या सोयीने ठरवली जाण्याचीच शक्यता अधिक आहे. खरच या निवडणुका होतील का? अशी शंकाही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे. असे असले तरी भाजपने निवडणूक तयारी सुरु केली आहे
मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला ११ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने केंद्राच्या योजनांच्या प्रचाराची व्यापक मोहीम हाती घेतली. संवाद सभा, जनता दरबार, नेत्यांच्या मुलाखती आणि बरेच काही असे त्याचे स्वरूप आहे. यामुळे कार्यकर्तांना काम मिळाले, त्याचा फायदा भाजपला निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे कॉंग्रेसने पुन्हा विधानसभा निवडणुकीतील मत चोरीचा मुद्दा पुढे केला आहे. त्याला कारण ठरले ते अलिकडेच केंद्रीय निवडणूक आयोगाने काढलेले पत्र. निवडणुकीनंतर ४५ दिवसात मतदानाच्या संदर्भातील सर्व सीसीटीव्ही फुटेज नामशेष करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. चणाक्ष कॉंग्रेसने ही बाब हेरून त्यांनी केलेल्या मत घोटाळ्याच्या आरोपाशी या पत्राची सांगड घालून मत चोरी लपवण्यासाठीच नियमावली बददली, असा थेट आरोप केंद्रीय निवडणूक आयोगावर केला. यासाठी प्रदेश कॉंग्रेसने नागपूरची निवड केली. प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरला येऊन पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग आणि पर्यायाने भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली.
यापूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधीं यांनी वाढीव मतदार नोंदणीवर आक्षेप नोंदवताना जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले होते. या मतदारसंघातून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. येथून पराभूत झालेले कॉंग्रेस उमेदवार सुरेश भोयर यांनी तर मतदानाच्या तीन दिवसापर्यंत कशी मतदार नोंदणी सुरू होते हे सांगितले होते. त्यावर भाजपने प्रतिउत्तर दिले. निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नाला भाजप नेते उत्तर देऊ लागल्याने ते अडचणीत सापडले. त्यामुळे यावेळी भाजपने ही चूक केली नाही.पटोलेंनी गंभीर आरोप केल्यानंतर अद्याप भाजप नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र यामुळे मत चोरीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. भाजपच्या बलाढ्य प्रचार यंत्रणेला तोंड कसे द्यायचे, असा प्रश्न काँग्रेसपुढे होता. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नव्या आदेशाने या पक्षाचे काम हलके केले.