Narendra 1, Narendra 2, and Football : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधीच भाजपा आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय सामना रंगला आहे. दोन्ही पक्षांमधील वर्चस्वाची लढत फुटबॉलच्या मैदानापर्यंत गेली आहे. ११ सप्टेंबर रोजी भाजपाने हावडा जिल्ह्यात ‘नरेंद्र कप’ या आठवडाभर चालणाऱ्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले. शिकागो येथे १८९३ मध्ये झालेल्या विश्वधर्म परिषदेतील स्वामी विवेकानंदांच्या ऐतिहासिक भाषणाच्या वर्धापन दिनानिमित्त ही स्पर्धा सुरू करण्यात आल्याचे भाजपाच्या नेत्यांनी सांगितले. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्ता होते. ‘नरेंद्र कप’ या स्पर्धेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी (१७ सप्टेंबर) होणार आहे.
भाजपाने सुरू केलेल्या फुटबॉल स्पर्धेला प्रत्युत्तर म्हणून ममता बॅनर्जी सरकारने त्याहूनही मोठ्या ‘स्वामी विवेकानंद कप’ स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेत तब्बल १,३०० पेक्षा अधिक संघ सहभागी होणार आहेत. विशेष बाब म्हणजे ही स्पर्धा मार्च २०२६ पर्यंत म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येपर्यंत सुरू राहणार आहे. पश्चिम बंगालमधील तरुणांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक फुटबॉल स्पर्धेचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करताना दिसून येत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत १८ ते १९ वयोगटातील पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांची टक्केवारी २.०२ इतकी होती.
२०११ च्या जनगणनेनुसार, बंगालच्या लोकसंख्येपैकी १८.२% लोकसंख्या २० ते २९ वयोगटातील आहे. त्यामुळे या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दोन्ही पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. बंगालमधील अनेक फुटबॉल क्लब हे त्यांच्या परिसरातील सदस्यांच्या राजकीय निवडी निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. या क्लब्समध्ये ३० आणि ४० वर्षे वयोगटातील पुरुषदेखील सक्रिय असतात. त्यामुळे फुटबॉलची लोकप्रियता फक्त युवकांपुरती मर्यादित नसून, प्रौढ मतदारांनाही या खेळाची आवड आहे.
आणखी वाचा : PM Modi Birthday : भाजपा नेत्यांच्या आठवणीतले मोदी; अमित शाह ते देवेंद्र फडणवीस कोण काय म्हणाले?
अनेक वर्षांपासून फुटबॉल क्लब्स बंगालच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावत आले आहेत. १९७७ मध्ये डाव्या आघाडीने सत्ता मिळविल्यानंतर राज्यात मोठा सामाजिक-राजकीय बदल झाला आहे. राजकीय विश्लेषक द्वैपायन भट्टाचार्य यांनी ‘Government as Practice : Democratic Left in a Transforming India’ या पुस्तकात पक्ष आणि समाज या संकल्पनेवर भाष्य करण्यात आले आहे.‘पक्ष-समाज’ ही अशी व्यवस्था आहे, जिथे राजकीय पक्ष सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू असतो. गाव पातळीवरील कारभार हा पक्षाच्या माध्यमातून चालतो आणि सामाजिक नातेसंबंधांची मांडणीही पक्ष ठरवतो, असे त्यांनी लिहिले आहे. १९९० च्या दशकात देशाने खुल्या बाजारपेठेची अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर ग्रामीण भागातील डाव्यांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची जागा ‘छोट्या उद्योजकांनी’ घेतली. भट्टाचार्य लिहितात की, स्थानिक भाषेत ज्यांना ‘प्रमोटर्स’ म्हटले जाते, अशा लोकांनी हळूहळू सत्तेचे केंद्रबिंदू असलेल्या सहकारी संस्था, शाळा मंडळे, क्रीडा क्लब, पंचायत संस्था व पक्ष समित्या ताब्यात घेतल्या.
फुटबॉल क्लब्सच्या माध्यमातूनच सीपीआय (एम) आणि डाव्या पक्षांनी बंगालवर वर्चस्व गाजवले. मात्र, सिंगूर व नंदीग्राममधील जनआंदोलनानंतर डाव्यांचे वर्चस्व ढासळले आणि २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाकडे सीपीआय (एम)सारखी शिस्तबद्ध आणि नियंत्रित संघटना नव्हती. या संदर्भात राजकीय विश्लेषक भट्टाचार्य लिहितात की, संघटनात्मक पक्षाची कमतरता भरून काढण्यासाठी तृणमूल काँग्रेसने स्थानिक क्लब व सामुदायिक नेत्यांसोबत युती केली आणि त्यांना सरकारी निधीचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे ‘पक्ष-समाज’ व्यवस्थेचे रूपांतर फ्रँचायजी राजकारणात झाले. तरीही तृणमूल काँग्रेसच्या व्यवस्थेत फुटबॉल क्लबनी महत्त्वाची भूमिका बजावणे सुरूच ठेवले.
दरवर्षी दुर्गापूजेदरम्यान तृणमूल काँग्रेस पक्षाकडून या फुटबॉल क्लब्सना अनेक सवलती देण्यात येतात. २०११ पासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून काही राजकीय संदेश दिले आहेत. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या ‘खेला होबे’ या घोषवाक्याला मोठी लोकप्रियता मिळाली होती. अनेकदा ममता बॅनर्जी सार्वजनिक कार्यक्रमांत फुटबॉलला ‘किक’ मारताना दिसल्या आहेत; तर त्यांचे पुतणे व डायमंड हार्बर मतदारसंघाचे खासदार अभिषेक बॅनर्जी हे डायमंड हार्बर एफसी या संघाचे मुख्य संरक्षक आहेत. या वर्षीच्या डुरंड कपमध्ये या संघाने उपविजेतेपद मिळवले होते.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींना घडवणारे लक्ष्मणराव इनामदार कोण होते? मोदी त्यांना राजकीय गुरु का मानतात?
दरम्यान, मागील आठवड्यात भाजपाने हायमंड हार्बर मतदारसंघात नरेंद्र कप फुटबॉल स्पर्धेला सुरुवात केली. स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले. मात्र, तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी असा दावा केला की, भाजपाच्या या स्पर्धेचे आयोजन दुसऱ्याच नरेंद्रसाठी करण्यात आले आहे. त्यांनी ‘अलिपूर बॉम्ब प्रकरणात’ ब्रिटिशांसाठी माफीचा साक्षीदार झालेल्या आणि नंतर क्रांतिकारकांनी गोळ्या घालून ठार केलेल्या नरेंद्र गोसाई यांचे नाव घेतले. तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेली स्पर्धा ही स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ असल्याचा दावाही घोष यांनी केला. सीपीआयएमचे नेते शतरूप घोष यांनी याच मुद्द्याला हाताशी धरून भाजपा आणि तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले. दोन्ही पक्ष फुटबॉलच्या खेळावरूनही राजकारण करीत आहेत. स्वामी विवेकानंद यांचे नाव घेऊन, ते जनतेची फसवणूक करीत आहेत. बंगालमधील मतदारांनी आगामी निवडणुकीत या दोन्ही पक्षांना धडा शिकवायला हवा, असे शतरूप घोष म्हणाले.